Skip to main content
x

वाहनवटी, गुलाम एसनजी

गुलाम एसनजी वाहनवटी यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयामधून बी.ए.(ऑनर्स) आणि शासकीय विधि महाविद्यालयातून एलएल.बी. या पदव्या प्रथम वर्गात प्राप्त केल्या. विधि महाविद्यालयात एलएल.बी. करीत असताना ते सेंट झेवियर्स आणि सोफिया महाविद्यालयात विविध विषय शिकवीत असत. १९७२ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीस सुरुवात केली. त्याबरोबरच १९७६ पर्यंत शासकीय विधि महाविद्यालयामध्ये अर्धवेळ प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी कायद्याच्या विविध विषयांचे अध्यापन केले. अठरा वर्षांच्या अनुभवानंतर १९९० मध्ये त्यांना वरिष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली. १९९९ पर्यंत त्यांनी वकिली केली. या काळात त्यांनी मुंबई व इतर उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालय व विविध न्यायाधिकरणांसमोर कायद्याच्या सर्व शाखांमधील विविध प्रकारचे खटले लढविले.

डिसेंबर १९९९ मध्ये त्यांची नियुक्ती महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट-जनरलम्हणून झाली. त्यानंतर जून २००४ मध्ये ते भारताचे सॉलिसिटर-जनरलआणि जून २००९ मध्ये अ‍ॅटर्नी-जनरलझाले. या नात्यांनी त्यांनी अनुक्रमे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणांत युक्तिवाद केले. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वेळोवेळी भारताचे प्रतिनिधित्व केले. सप्टेंबर २००३ ते जून २००४ पर्यंत ते महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष होते.  

- शरच्चंद्र पानसे

वाहनवटी, गुलाम एसनजी