Skip to main content
x

मंडलिक, विश्वनाथ नारायण

रावसाहेब मंडलिक

रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड येथे झाला. त्यांचे आजोबा धोंडदेव हे दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे सासरे होते. पेशव्यांनी सांगितल्याने त्यांनी कुवेशीकर परांजपे घराण्यातील मोरूभाऊ परांजपे यांचा मुलगा दत्तक घेतला. दत्तकविधानानंतर त्याचे नाव नारायण असे ठेवण्यात आले. या नारायण मंडलिकांच्या आठ अपत्यांपैकी विश्वनाथ हे तिसरे होत.

वयाच्या नवव्या वर्षापर्यंत विश्वनाथ यांचे घरीच शिक्षण झाले. नंतर १८४५ ते १८४७ अशी दोन वर्षे इंग्रजी शिक्षणासाठी त्यांना रत्नागिरीस पाठविण्यात आले. त्यानंतर सुमारे सव्वाचार वर्षे त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये त्यावेळी उपलब्ध असलेले उच्च शिक्षण घेतले.(मुंबई विद्यापीठाची स्थापना अजून व्हावयाची होती.) पहिल्या वर्षापासून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. शेवटच्या परीक्षेत ते अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र, साहित्य, इतिहास, रसायनशास्त्र आणि देशी भाषा या सर्व विषयांत वेगवेगळे आणि एकंदरीत परीक्षेतही पहिले आले. शिक्षण संपल्यावर लगेच मंडलिकांना सरकारी नोकरी मिळाली. १८५२ ते १८५४ या काळात ते भुज येथे कच्छच्या पोलिटिकल एजंटच्या कचेरीत मुख्य हिशेब तपासनीस होते. तेथील हवा न मानवल्याने त्यांनी तेथून बदली मागितली, त्यामुळे कराची येथे सिंधच्या कमिशनरचे खासगी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जुलै १८५४ ते सप्टेंबर १८५५ पर्यंत ते कराचीला होते. या अवधीत त्यांनी फारसी आणि सिंधी भाषांचा अभ्यास केला. सप्टेंबर १८५५ पासून ते ठाणे येथे शाळा खात्यात डेप्युटी इन्स्पेक्टर किंवा व्हिजिटर म्हणून काम करू लागले. याचवेळी त्यांना रावसाहेब हा किताब देण्यात आला. नंतर १८५८ मध्ये सहा महिने वसईला मुन्सिफ, १८५९ मध्ये सरकारी बुक डेपोचे क्युरेटर आणि १८६० ते १८६३ पर्यंत इन्कम टॅक्स कमिशनरचे सहायक, अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यानंतर मतभेद व  गैरसोयींमुळे रावसाहेबांनी नोव्हेंबर १८६२मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा दिला; तो फेब्रुवारी १८६३मध्ये मंजूर झाला. राजीनामा दिल्याबरोबरच त्यांनी वकिलीच्या परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला होता. एप्रिल १८६३मध्ये ते वकिलीची म्हणजे हायकोर्ट प्लीडरची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिलीस सुरुवात केली. यादरम्यान थोडे दिवस त्यांनी कापूसबाजारात आणि शेअर बाजारात व्यापार करून पाहिला.

अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता, कमालीची सचोटी आणि प्रामाणिकपणा, काटेकोर शिस्त आणि वक्तशीरपणा या रावसाहेबांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे ते अल्पावधीतच अपील शाखेतील बिनीचे वकील बनले. एकीकडे त्यांच्या अशिलांमध्ये अनेक जहागिरदार, सरदार, एवढेच नव्हे तर कोल्हापूर, सातारा, बडोदा आणि म्हैसूर संस्थानांचे राजे असत; तर दुसरीकडे एखाद्या गरीब अशिलासाठी ते एखादे अपील मोफतही लढवीत. १८७६मध्ये अपील शाखेकडील सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सरकारी वकील म्हणूनही त्यांचा व्यवहार अत्यंत सचोटीचा असे.

अशा प्रकारे वकिली उत्तम प्रकारे चालत असतानाच रावसाहेबांचे विविध स्वरूपाचे सार्वजनिक कार्य आणि विविध विषयांवरील विविध प्रकारचे लेखनही अविरतपणे चालू असे. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटच्या स्टूडन्टस् लिटररी अँड सायन्टिफिक सोसायटीया संस्थेशी ते पहिल्यापासूनच संबंधित होते. या सोसायटीसमोर रावसाहेबांनी अनेक विषयांवर निबंध वाचले. त्यातला एक पेशव्यांच्या राज्यपद्धतीवर होता. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिली. त्यात काही भाषांतरेही होती. त्यात तुकोबांच्या गाथेपासून यंगच्या बीजगणिताचे सिंधी भाषांतर आणि किंडर्स्लीच्या पुराव्याच्या कायद्याच्या भाषांतरापर्यंत अनेक पुस्तकांचा समावेश होता. परंतु हिंदू कायद्यासंबंधी त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मराठीतील हिंदुधर्मशास्त्रआणि म्हैसूर संस्थानातील दत्तक प्रकरणाच्या संदर्भातील दत्तकाचा अधिकार विरुद्ध संस्थाने खालसा करण्याचा अधिकारही त्यांची पुस्तके महत्त्वाची होती. मात्र त्यांच्यापेक्षाही जास्त महत्त्वाची म्हणजे, व्यवहारमयूख आणि याज्ञवल्क्यस्मृती यांचे प्रस्तावना व पुरवणीसह इंग्रजी  भाषांतर आणि मानवधर्मशास्त्र म्हणजे मनुस्मृतीची, मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लुक, राघवानंद, नंदन आणि रामचंद्र यांच्या टीकांसह त्यांनी काढलेली आवृत्ती, यामुळे धर्मशास्त्राचे आधुनिक भाष्यकार आणि न्यायविद म्हणून मंडलिकांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्या काळात हिंदू कायद्याचे अनेक प्रश्न न्यायालयांसमोर सातत्याने येत असल्याने मंडलिकांचे हे कार्य  महत्त्वाचे होते. त्याबरोबरच व्यावहारिकदृष्ट्या गरजेचे आणि उपयोगाचेही होते. त्यांनी सुरुवात करून दिलेले हे कार्य नंतर एकीकडे महामहोपाध्यायपां.वा.काणे व दुसरीकडे प्रा.ज.र. घारपुरे यांनी पूर्णत्वास नेले, असे म्हणता येईल.

वर म्हटल्याप्रमाणे, एवढे सगळे लेखन आणि वकिली, याबरोबरच रावसाहेबांचे विविध स्वरूपाचे सार्वजनिक कार्यही अविरत चालू असे. १८६४मध्ये त्यांनी लोकजागृती करण्याच्या उद्देशाने नेटिव्ह ओपिनियनहे स्वत:चे वृत्तपत्र चालू केले. सुरुवातीस ते फक्त इंग्रजीत होते, परंतु १८६६ पासून ते इंग्रजी आणि मराठी, दोन्ही भाषांत निघू लागले. १८७१मध्ये रावसाहेबांनी त्याची मालकी सोडली, पण ते १९०६ पर्यंत चालू राहिले. १८६७मध्ये मंडलिकांनी बॉम्बे असोसिएशनचे पुनरुज्जीवन केले. (तिचे कार्य पुढे जवळजवळ वीस वर्षे चालले.) १८६५मध्ये पुनर्विवाहोत्तेजक सभास्थापन झाली. तिच्याशी रावसाहेबांचा संबंध होता. १८६९मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची मुंबई शाखा स्थापन झाली. त्याचप्रमाणे प्रार्थनासमाजाचीही स्थापना झाली. या दोन्ही संस्थांशी त्याचप्रमाणे अन्य संस्थाशीही मंडलिकांचा घनिष्ठ  संबंध होता. १८५७मध्ये मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यावर लवकरच त्यांचा विद्यापीठाशीही संबंध आला. १८६१मध्ये मराठीचे परीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८६२मध्ये ते विद्यापीठाचे फेलो आणि मराठी व सिंधीचे परीक्षक झाले. १८६८ पासून सलग पंधरा वर्षे ते एलएल.बी. परीक्षेत होेते. १८९३मध्ये ते मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्य झाले आणि नंतर उपाध्यक्षही झाले. सोसायटीत त्यांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण निबंध वाचले.

१८६३मध्ये मंडलिकांची नियुक्ती जस्टिस ऑफ पीस’ (जे.पी.) म्हणून झाली. तेव्हापासून त्यांचा तत्कालीन मुंबई नगरपालिकेशी संबंध आला. १८७४ ते १८७७ आणि नंतर पुन्हा १८८० ते १८८४ या काळात मंडलिक मुंबई कायदेमंडळाचे सदस्य होते. दरम्यान १८७९ मध्ये ते मुंबईचे महापौर होेते. या काळात विविध विषयांवर महत्त्वाचे कायदे झाले. १८८४मध्ये त्यांची नियुक्ती केंद्रीय कायदेमंडळावर झाली. तेथेही त्यांनी स्वत:ची छाप पाडली.

त्या काळी सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा व स्वातंत्र्य आधी, हा वादाचा मुद्दा होता. याविषयी मंडलिक मध्यममार्गी होते. अनेक सुधारणांना त्यांचा सरसकट पाठिंबा नसला, तरी सुधारकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर साधकबाधक विचार करण्यास ते तयार असत. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व व बहुपेडी कर्तृत्व असलेल्या मंडलिकांचे सूत्ररूपाने वर्णन करावयाचे झाल्यास, एकोणिसाव्या शतकात भारतात घडलेल्या पाश्चात्त्य-पौर्वात्य संस्कृतिसंगमाचे एक उत्कृष्ट उदाहरण असे करता येईल.

- शरच्चंद्र पानसे

 

 

 

संदर्भ
१. शिरगांवकर, वर्षा; ‘सोशल रिफॉर्म इन महाराष्ट्र अ‍ॅण्ड व्ही. एन. मंडलिक’; नवरंग प्रकाशन, नवी दिल्ली, १९८९.
मंडलिक, विश्वनाथ नारायण