Skip to main content
x

जयकर, मुकुंद रामराव

मुकुंद रामराव जयकर यांचा जन्म मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय पाठारे प्रभू कुटुंबात झाला. त्यांचे वडील मुंबई सरकारच्यासचिवालयात एक दुय्यम अधिकारी होते. मुकुंदरावांचे शालेय शिक्षण मुंबईच्या प्रसिद्ध एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये झाले. नंतर त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि १८९५मध्ये बी.ए.ची पदवी  घेतली. त्यानंतर ते एम.ए. करण्यासाठी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी इंग्रजी व संस्कृत हे वैकल्पिक विषय म्हणून घेतले. त्यात त्यांना धर्मशास्त्र, वेगवेगळ्या स्मृती आणि पूर्वमीमांसा यांचा अभ्यास करावयास मिळाला. १८९७मध्ये गटे आणि कालाईल यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून त्यांनी एम.ए. पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एलएल.बी.चे एक वर्ष पूर्ण केले. कायद्याचे पुढचे शिक्षण घेण्यासाठी १९०१मध्ये ते इंग्लंडला गेले, पण प्रकृती बिघडल्याने त्यांना परत यावे लागले. आईच्या उत्तेजनामुळे त्यांनी १९०२ मध्ये एलएल. बी. पूर्ण केले. नंतर एप्रिल १९०३मध्ये ते पुन्हा इंग्लंडला गेले. ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या बेलियल कॉलेजमधून कायद्याची बी.सी.एल. ही पदवी घेण्याची त्यांची इच्छा होती, पण तेथे त्यांना प्रवेश मिळाला नाही. मात्र सुदैवाने मार्क रोमर या वकिलाच्या चेंबरमध्ये काम मिळाले. ते दोन वर्षे इंग्लंडमध्ये राहिले. या वास्तव्यात त्यांना कायद्याच्या असंख्य गोष्टी अवगत झाल्या. १९०५मध्ये ते बॅरिस्टर झाले आणि मुंबईला परत येऊन त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. सुरुवातीची काही वर्षे त्यांना त्यांचे आजोबा (आईचे वडील) वासुदेव जगन्नाथ कीर्तीकर यांचे मार्गदर्शन लाभले. कीर्तीकर तेव्हा सरकारी वकील होते. याच काळात जयकरांवर न्या.रानडे आणि नामदार गोखले यांचा प्रभाव पडला. लोकमान्य टिळकांबद्दलही त्यांना नितांत आदर होता.

जयकरांची अभ्यासाची व मननाची भूक दांडगी होती. तत्त्वज्ञानातील षड्दर्शनांपैकी पूर्वमीमांसेचे अध्ययन त्यांनी सुमारे बारा वर्षे केले. १९१६मध्ये मुंबई उच्च न्यायालयातील तरुण वकिलांनी सोप्या खटल्यांची कामे त्यांच्याकडे यावीत यासाठी एक योजना तयार केली. त्यांना जयकरांनी मार्गदर्शन केले. १९२०पर्यंत जयकर मुंबईत प्रमुख वकील म्हणून मान्यता पावले.

हिंदू दत्तकविधानांचे खटले लढविणे हे जयकरांचे वैशिष्ट्य होते. अशा खटल्यांतील बहुतेक निर्णय त्यांच्या पक्षकारांच्या बाजूने होत. गाजलेल्या ताईमहाराज खटल्यात मुंबई उच्च न्यायालयात जयकरांनी लोकमान्य टिळकांविरुद्ध युक्तिवाद करून विजय मिळवला. लोकमान्यांचे स्थान लक्षात ठेवून जयकरांनी आपला युक्तिवाद अत्यंत काळजीपूर्वक केला होता. आपल्याबद्दल एवढी कळकळ दाखविल्याबद्दल लोकमान्यांनी त्यांची स्तुती केली. नंतर लोकमान्यांनी प्रिव्ही काउन्सिलमध्ये अपील केले आणि त्यात ते जिंकले, हा भाग वेगळा. जयकरांनी वेळोवेळी अनेक  राजकीय खटलेही चालविले. त्यांना वक्तृत्वाचे चांगले वरदान होते.

वकील व कायदेपंडित म्हणून जयकरांची योग्यता सर्वदूर मानली जाई. अनेक संस्थानिक मंडळी त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येत. मात्र जयकर संस्थानिकांचे खटले तारतम्याने स्वीकारीत. संस्थानातील न्यायव्यवस्थेचा दर्जा सुधारण्याचा सल्ला ते संस्थानिकांना देत. १९२४ च्या संस्थान परिषदेच्या (स्टेट्स् कॉन्फरन्स) अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी संस्थानात प्रजेला मोफत शिक्षण देण्याचा सल्ला संस्थानिकांना दिला. १९२६मध्ये त्यांना मुंबई उच्च  न्यायालयाचे न्यायाधीशपद देऊ करण्यात आले होते. परंतु ते त्यांनी नाकारले. नंतर १९३७मध्ये फेडरल कोर्टाचे न्यायाधीश म्हणून जयकरांची नियुक्ती झाली. १९३९मध्ये त्यांची नियुक्ती प्रिव्ही काउन्सिलवर झाली. पण नंतर एकामागून एक क्षोभकारक घटना घडू लागल्या व त्यातून देशाचे भविष्यच ढवळून निघणार असे स्पष्ट झाले. तेव्हा त्यानंतर राजकारणाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा निर्णय जयकरांनी घेतला व मार्च १९४२मध्ये त्यांनी प्रिव्ही काउन्सिलचा राजीनामा दिला. त्यानंतरची तीन-चार वर्षे जयकर आणि सप्रू राजकारणात सक्रीय होते.

कायद्याप्रमाणे राजकारणही जयकरांना प्रिय होते. वर उल्लेखिल्याप्रमाणे काँग्रेसची स्थापना करणार्‍या थोर नेत्यांच्या प्रभावळीचा प्रभाव मनावर विद्यार्थीदशेपासून होता. न्या. रानडे, ना.गोखले, लो. टिळक हे त्यांचे आदर्श होते. याखेरीज देशातील बहुतेक ज्येष्ठ नेत्यांशी जयकरांचे संबंध होते. बॅ.जिना होमरूल लीगच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष असताना जयकर उपाध्यक्ष होते. रौलट अ‍ॅक्टच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्षांनी नेमलेल्या समितीवर पं.मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल इत्यादींबरोबर जयकरांनी काम केले होते. सहा महिने पंजाबमध्ये असताना त्यांचा महात्मा गांधींशी निकटचा परिचय झाला. महात्माजींबद्दल त्यांच्या मनात परस्परविरोधी भावना होत्या. १९२१-१९२२मध्ये गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जयकरांनी काही काळ आपली वकिली स्थगित ठेवली होती. तथापि, गांधी जे करतील ते सारेच योग्य असे जयकरांनी कधी मानले नाही. न्यायालये, कायदेमंडळ यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा काँग्रेसचा कार्यक्रम त्यांना मान्य नव्हता. ते स्वराज्य पक्षात सामील झाले. नेमस्तपणा हा त्यांचा धर्म बनला. १९२८साली स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची तत्त्वे निश्चित करण्यासाठी जी सर्वपक्षीय समिती निर्माण झाली तिचे ते सदस्य होते.

१९२४मध्ये जयकरांनी विद्यापीठ मतदारसंघातून मुंबईच्या विधिमंडळात प्रवेश केला. विरोधी स्वराज्य पक्षाचे नेते या नात्याने त्यांनी ठळक कामगिरी बजावली. १९२७मध्ये जयकरांनी हिंदू बालविवाह प्रतिबंधक विधेयकाचा जोरदार पुरस्कार केला. ब्रिटिशांच्या सैन्यविषयक नीतीविरुद्ध ते खवळून उठत. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळातील संरक्षण खाते हिंदी माणसाकडे सोपवावे असा त्यांचा आग्रह होता. भारताला वसाहतीचा दर्जा (डोमिनियन स्टेटस्) देण्याची मागणी ते करीत असत. सायमन कमिशनला त्यांनी ठाम विरोध केला. तीनही गोलमेज परिषदांना जयकर हजर होते. त्यानंतरच्या महात्मा गांधींच्या प्राणांतिक उपोषणातून त्यांना वाचविण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांत जयकर प्रमुख होते. सप्रू-जयकर समितीने नंतर खूप परिश्रम करून इंडिया बिलतयार केले. क्रिप्स आयोगापुढेही त्यांनी भारताची मागणी समर्थपणे मांडली.

शिक्षणाविषयी जयकरांना अपार आस्था होती. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलची स्थापना १८९७मध्ये झाली; त्यात जयकर सहभागी होते. त्यावेळी ते नुकतेच एम.ए. झाले होते आणि त्यांचे वय जेमतेम चोवीस होते.  नंतर आपल्या आजोबांप्रमाणेच त्यांनीही शासकीय विधि महाविद्यालयामध्ये सहा वर्षे हिंदू कायद्याचे अध्यापन केले. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचेही ते काही काळ सदस्य होते. महाराष्ट्राला एक विद्यापीठ असावे या मागणीला त्यांचा पाठिंबा होता. मुंबई विद्यापीठाच्या कारभारात सुधारणा सुचविण्यासाठी मुंबई सरकारने नेमलेल्या चिमणलाल सेटलवाड समितीचे जयकरही एक सदस्य होते. समितीने महाराष्ट्रासाठी वेगळ्या विद्यापीठाची शिफारस केली. आपल्या वेगळ्या टिपणात जयकरांनी महाराष्ट्राबरोबरच गुजरातसाठीही वेेगळ्या विद्यापीठाची शिफारस केली. महाराष्ट्रासाठीचे विद्यापीठ पुण्याला असावे, असेही समितीने म्हटले, परंतु हे स्वप्न साकार होण्यास दोन दशकांहून अधिक काळ जावा लागला. अखेर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १० फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे विद्यापीठ अस्तित्वात आले. जयकर या नव्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले. त्यावेळी कुलगुरुपद हे पगारी नसून मानसेवी (ऑनररी) होते. सात वर्षांच्या आपल्या धवल कारकिर्दीत जयकरांनी पुणे विद्यापीठाचा सर्वार्थांनी पाया घातला. १९५६मध्ये ते कुलगुरुपदावरून निवृत्त झाले. आपल्या ग्रंथालयाला जयकरांचे नाव देऊन विद्यापीठाने त्यांचे नाव अजरामर केले.

- सविता भावे

 

 

 

संदर्भ
१.कुलकर्णी व्ही. बी.; ‘एम. आर. जयकर’; प्रकाशन विभाग, १९७३.
जयकर, मुकुंद रामराव