Skip to main content
x

मोरवंचीकर, रामचंद्र श्रीनिवास

     प्रशाला शिक्षक, व्याख्याता, प्रपाठक, प्राध्यापक तथा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद असा शिक्षणाच्या व संशोधनाच्या क्षेत्रातील चढता आलेख असणार्‍या डॉ. रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर यांचा जन्म चिंचोली (काटी), ता. मोहोळ जि. सोलापूर येथे झाला. बी.ए. ऑनर्स (इतिहास) आणि एम.ए. (इतिहास) असे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. प्रशाला शिक्षक (१९५९ ते १९६८) म्हणून काम केल्यानंतर व्याख्याता तथा विभाग प्रमुख, प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण, येथे अध्यापनाचे व संशोधनाचे काम केले. इ.स. १९७८मध्ये मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादकडून त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. ‘झरळींहरि ींर्हीिीसह ींहश रसशी’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. इ.स.१९८० ते १९९७ या दरम्यान प्रपाठक, प्राध्यापक, इतिहास तथा पर्यटनशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे ते कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा छात्रांनी पीएच.डी. पदवीसाठी आणि एकोणीस छात्रांनी एम.फीलसाठीचे संशोधन पूर्ण केले आहे.

      त्यांच्या संशोधनाची व प्राविण्याची विशेष क्षेत्रे म्हणून प्राचीन भारतीय इतिहास-संस्कृती तथा भौतिक संस्कृती, नाणकशास्त्र, ऐतिहासिक पुरातत्त्व, दुर्ग व दुर्गव्यवस्थापन, नगररचना, प्राचीन व मध्ययुगीन जलव्यवस्थापन, काष्ठशिल्प, पर्यटन आदींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. पैठणच्या वास्तव्यात प्रतिष्ठान या प्राचीन नगरीच्या व्यक्तिमत्त्वाचे आडवे-उभे पदर त्यांनी उजागर केले. सातवाहनपूर्व व सातवाहनकालीन साधनांच्या साहाय्याने पैठणचे व सातवाहनाचे संबंध काय होते, त्यांच्या उदयात व विकासात प्रतिष्ठानचे किती, कसे व काय योगदान होते हे मोरवंचीकरांनी अधोरेखित केले आहे. सातवाहन आणि पैठण यांच्या संदर्भातच प्रामुख्याने मोरवंचीकरांनी संशोधन केले आहे. सारे पैठण आणि पैठणाचा परिसर त्यांनी पिंजून काढला. पैठणमधील वाडे, शस्त्रे आणि अस्त्रे, पाषाणशिल्पे, काष्ठशिल्पे, पैठणी, दस्तऐवज, पुरातत्त्व, पोथ्या, प्रथा आणि परंपरा यांचा त्यांनी धांडोळा घेतला आणि पैठण बोलू लागले.

      सातवाहनपूर्व पैठणच्या अस्तित्वाच्या अनेक कथा, काही शिलालेखांतून त्याचा उल्लेख, मूलकची राजधानी म्हणून पैठणच्या बाबरीच्या कथांतील उल्लेख या सगळ्या गोष्टी पैठणचे ऐतिहासिकत्व जातक काळापर्यंत मागे नेतात. त्यांच्या मते इ.स.पूर्व सहाव्या शतकापासून आजपर्यंत कधी नायकाच्या, कधी उप-नायकाच्या कधी प्रेक्षकाच्या, तर कधी साक्षीदाराच्या भूमिकेतून पैठणचे वेगळेपण इतिहासाच्या पृष्ठावरती साकार होत गेले. इ.स.पूर्व सहाव्या शतकापासून पैठणला वजन प्राप्त झाले. व्यापार, उद्योग आणि दळणवळण यांचे केंद्र या दृष्टीकोनातून पैठण क्रमाने प्रगत होत गेले. निसर्गाच्या अनुकूल प्रतिसादामुळे ही वसाहत कायम राहिली आणि विकसित होत गेली. वसाहतकारांचे प्रयत्न आणि निसर्गाची साथ यांमुळे पैठणच्या वसाहतीला आकार प्राप्त होत गेला. इ.स.पूर्व पाचवे शतक ते इ.स. पाचवे शतक यांमधील पर्यावरण हे जागतिक संस्कृतिसंवर्धनासाठी अत्यंत अनुकूल होते. या अनुकूलतेमुळे पैठणची वसाहत वेगाने वाढली. एका छोट्या केंद्राचे रूपांतर मोठ्या व्यापारीपेठेमध्ये, प्रशासकीय केंद्रामध्ये, कलाकेंद्रामध्ये, शिक्षण आणि संस्कृतीच्या सर्वांगाचा विचार करणार्‍या केंद्रामध्ये झाले. सातवाहनांच्या, मोठ्या सत्तेच्या राजधानीचे शहर म्हणून पैठणला आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि दर्जा मिळाला. पैठणचे आंतरराष्ट्रीय महत्त्व, वाढता व्यापार या संदर्भातील सप्रमाण सैद्धान्तिक मांडणी आपल्या संशोधनातून मोरवंचीकरांनी केली आहे.

      सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, मुस्लीम आणि मराठे यांच्या कालखंडातील म्हणजे दोन-अडीच हजार वर्षांतील पैठणची विविध रूपे मोरवंचीकरांच्या संशोधनातून उजागर झाली आहेत. राजधानीचे शहर, एक आहार, एक भुक्ती म्हणून, एक आध्यात्मिक केंद्र, शैक्षणिक केंद्र, व्यापारी केंद्र अशा बहुपेडी, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे एकमेव सांस्कृतिक केंद्र पैठण असल्यामुळे या बहुविध क्षेत्रांत विखुरलेले अनेकविध धागे मोरवंचीकरांनी एकत्र गुंफले. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पैठणचे योगदान मोरवंचीकरांच्या संशोधनामुळे ठळकपणे अधोरेखित झाले. पैठणच्या संपन्न इतिहासाच्या अनेक पदरांना उलगडून दाखवणार्‍या ‘दक्षिण काशी पैठण’ या मोरवंचीकरांच्या ग्रंथास इ.स. १९८९चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

      मोरवंचीकरांच्या ‘सातवाहनकालीन महाराष्ट्र’ या ग्रंथास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोरवंचीकरांचे संशोधन प्रामुख्याने सातवाहनाकालापासून सुरू होते. पैठणच्या परीसरात सातवाहनकालाचे भौतिक पुरावे फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत. सातवाहन कालखंड हा भारतीय पातळीवरती अत्यंत महत्त्वाचा आणि वेगळा कालखंड मानला जातो. जागतिक संस्कृतिसंवर्धन आणि संस्कृति विकास यांसाठी अत्यंत अनुकूल असणार्‍या या कालखंडात पैठण येथील एका छोट्या केंद्राचे रूपांतर सर्व अंगोपांगानी मोठ्या केंद्रामध्ये झाले. मोरवंचीकर यांच्या सैद्धान्तिक विवेचनामधून सातवाहनांचा आणि महाराष्ट्राचा अतूट अशा प्रकारचा संबंध अत्यंत प्रभावी पद्धतीने स्पष्ट होतो. त्यांच्या प्रतिपादनामध्ये सातवाहन कुठले आहे, त्यांचा कालखंड कोणता, यापेक्षा सातवाहनांचे योगदान काय, याची त्यांनी प्रामुख्याने चर्चा केली आहे. सातवाहनांच्या योगदानाचा महाराष्ट्राला इतका लाभ झाला आहे की, सातवाहन कालखंड महाराष्ट्राचे ‘सुवर्णयुग’ ठरावे अशी मांडणी ते करतात. सुवर्णयुगाची पर्यायाने समृद्धीची लक्षणे कोणती, हा मुद्दा स्पष्ट करताना ते असे म्हणतात की; एकंदर जनजीवनामध्ये कुठल्याही प्रकारची सामाजिक अथवा आर्थिक विषमता आढळून न येणे याला आपण समृद्धी मानायला हरकत नाही. सातवाहनांचा कालखंड अनुकूल पर्यावरणाचा कालखंड होता. संपूर्ण जगाचा विचार केल्यास इ.स.पूर्व पाचशे ते इ.स.पाचशे या हजार वर्षांच्या कालावधीमध्ये मानवाच्या सुदृढ वाटचालीसाठी पोषक असे वातावरण निर्माण झाले. पोषक पर्यावरणाच्या या अनुकूल पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर दोन साम्राज्ये निर्माण झाली होती. त्यांपैकी एक रोमन साम्राज्य आणि दुसरे सातवाहनांचे साम्राज्य. सातवाहन सम्राटांच्या संदर्भामध्ये मोरवंचीकरांनी मांडलेला पहिला सिद्धान्त असा आहे की, रोमन साम्राज्याशी आपण जवळीक साधू शकलो, आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करू शकलो, तर आपलीही उन्नती होईल. आपला समाजसुद्धा समृद्ध आणि संपन्न असे जीवन जगू शकेल, असा विचार करणारे भारतातील सातवाहन हे अपवादात्मक एकमेव राजघराणे आहे. दुसर्‍या सिद्धन्तामध्ये मोरवंचीकर असे म्हणतात की, उपयुक्त भूमिकेला पोषक असे वातावरण निर्माण करण्याची नैतिक आणि भौतिक जबाबदारी सातवाहनांनी स्वीकारली होती. नैतिक या अर्थाने की, जिथे राजाश्रयाची गरज आहे, तिथे त्यांनी राजाश्रय उपलब्ध करून दिलेला आहे. भौतिक या दृष्टीकोनातून  व्यापारवाढीला त्यांनी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. रस्ते तयार करणे श्रेण्यांना नाणी पाडण्याचे स्वातंत्र्य देणे, स्वत:च्या नाण्यावर देखरेख करणे, चोरी, लबाडी, दरोडे यांपासून रक्षण करणे. सुदृढ समाज-संघटना निर्माण करणे त्याचप्रमाणे या संघटनांना धार्मिक जोड देता आली, तर तीही देणे असे कार्य सातवाहनांनी केले आहे. सातवाहनांचा कालखंड बौद्ध धर्माच्या महाराष्ट्रातील उत्कर्षाचा कालखंड आहे. त्याचप्रमाणे व्यापारवादाच्या उदयाचा आणि विकासाचा हा कालखंड आहे. सातवाहनांनी या दोघांमध्ये समन्वयाची भूमिका पार पाडली आहे. बौद्ध धर्मामुळे व्यापाराचा प्रसार झाला. त्याचप्रमाणे बौद्ध धर्मप्रचारकांनी व्यापारातील तंत्रज्ञान, नाण्यांमधले तंत्रज्ञान, लेण्यांमधले तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, पाणी साठवण्यामधील तंत्रज्ञान यांचा प्रसार केला. या प्रसारामुळे आणि व्यापारवाढीमुळे सातवाहनांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राभर संपन्न अशी शहरे निर्माण झालेली दिसतात. या विवेचनामधून महाराष्ट्राचे खरे नागरीकरण सातवाहनांच्या कालखंडामध्ये झाले आहे असा निष्कर्ष मोरवंचीकर काढतात. सातवाहन कालखंडाच्या संदर्भात मोरवंचीकर या सर्वांच्या पाठीमागची मूलभूत बैठक व्यापारवादावर आधारित आहे असे म्हणतात. व्यापारवाद म्हणजे आयात कमी आणि निर्यात जास्त. सातवाहनांनी रोमनांच्या गरजा समजून घेतल्या आणि त्याप्रमाणे व्यापारी चळवळीला त्यांनी उत्तेजन दिले. त्यामुळे आयात कमी आणि निर्यात जास्त अशी स्थिती निर्माण करण्यामध्ये सातवाहन यशस्वी ठरले. सातवाहनांच्या संदर्भामध्ये गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र या प्रदेशामध्ये उपलब्ध अवशेषांच्या आधारे मोरवंचीकर असे म्हणतात की, सातवाहनांचे जास्तीतजास्त अवशेष महाराष्ट्रात मिळालेले आहेत. त्यामुळे त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र होती. प्रोटो महाराष्ट्रियन म्हणजे मराठीला जवळची अशी प्राकृत भाषा त्यांनी प्रामुख्याने वापरलेली आहे. महाराष्ट्राची अस्मिता, जडणघडण सातवाहनांच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे.

     ‘सेवानिवृत्तीनंतर खर्‍या अर्थाने माझ्या संशोधनाला प्रारंभ झाला’, असे ‘भारतीय जलसंस्कृती स्वरूप आणि व्याप्ती’ या ग्रंथाच्या मनोगतात त्यांनी नमूद केले आहे. या ग्रंथात पाणी आणि समाज, विभिन्न पातळीवरील त्यांचे नाते, नदी आणि समाज, सरोवर आणि समाज, पर्जन्य आणि समाज त्याचप्रमाणे विशेषत्वाने स्त्री, आदिम समाज, भटका समाज या सर्वांचे पाण्याशी असणार्‍या नात्याचे धागे त्यांच्या हाती आले आहेत. पाणी व लोकधारा, पाणी व साहित्यधारा, जलव्यवस्थापन पद्धतीचे भारतभर विखुरलेले अवशेष, त्यामध्ये कालानुक्रमे व विभागनिहाय झालेली स्थित्यंतरे, आदींचा शोध ‘भारतीय जलसंस्कृती: स्वरूप आणि व्याप्ती’ या ग्रंथातून त्यांनी घेतला आहे. जल हे त्यांच्या चिंतनांचे मूलभूत सूत्र असून ते इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन ठरू शकते, असा त्यांनी दावा केला आहे. मागील काही काळात त्यांनी भारतभर प्रवास करून शेकडो स्थळांना भेटी देऊन भारतीय इतिहासाच्या भिन्न कालखंडांतील जलसंस्कृतींचा व त्यांच्या भौतिक पुरावशेषांचा सर्वांगीण अभ्यास केला. त्याचप्रमाणे यूनेस्को पुरस्कृत जागतिक जल सहयोगितेच्या आंतरराष्ट्रीय जल परिषदेच्या व्यासपीठावरून भारतीय जल-संस्कृतीच्या विभिन्न पैलूंना उजागर केले आहे. वरील ग्रंथांच्या बरोबर मोरवंचीकरांचे -

     च झरळींहरि ढर्हीिीसह ींहश असशी (१९८५);

     च ऊर्शींसळीळ-ऊर्रीश्ररींरलरव, ईलहरशश्रिसिळलरश्र र्जींर्शीींळशु (१९९३);

     च झरळींहरिू ठिारलिश ळि इीलिरवशी (१९९३);

     च थिवि ुिीज्ञ षि ुशीींशीि खविळर (१९९४)

      ‘शुष्क नद्यांचा आक्रोश’ (सुमेरू प्रकाशन), ‘येई परतोनी ज्ञानदेवा’, ‘भीष्म’, ‘जैनांचे सांस्कृतिक योगदान’, ‘युगानुयुगे चांदवड’ आदी ग्रंथ आणि जवळपास दोनशे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

       अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, खानदेश इतिहास परिषद, मराठवाडा इतिहास परिषद, पुणे विद्यापीठ, इतिहास अध्यापक परिषद, जल साहित्य परिषद, (नागपूर अधिवेशन), बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद अशा अनेक परिषदांची मोरवंचीकरांनी अध्यक्षपदे भूषवली आहेत. विद्यापीठ अनुदान मंडळाच्या विद्यमाने सांस्कृतिक आदान-प्रदान योजनेतर्गत इ.स.१९८७मध्ये युरोप, सायप्रस, इस्रायल आदी देशांस भेटी दिल्या आहेत. वैश्विक जल-सहभागिते अंतर्गत भारत सरकारच्या समन्वयात नेपाळला आणि बांगला देशाला त्यांनी भेटी दिल्या आहेत.

—  प्रा. ओमप्रकाश समदाणी

संदर्भ
१. डॉ. रा. श्री. मोरवंचीकर गौरवग्रंथ, २००८.

२. डॉ. मोरवंचीकर रा. श्री., भारतीय जलसंस्कृतीः स्वरूप व व्याप्ती, सुमेरू प्रकाशन, २००६.
मोरवंचीकर, रामचंद्र श्रीनिवास