Skip to main content
x

जागीरदार, गजानन जनार्दन

     चित्रपट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, व्यवस्थापक, फिल्म इन्स्टिट्यूटचे प्राचार्य व शालेय शिक्षक असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणजे गजानन जनार्दन जागीरदार! त्यांचा जन्म अमरावती येथे झाला. वडील जनार्दन जागीरदार शिक्षक असल्याने गजानन यांनाही शिक्षणाची मुळातच आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण अमरावती, कानपूर व नंतर बनारस येथे पुढील शालेय शिक्षण झाले. नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिकत असतानाच जागीरदार लेखन, नाटकात काम करीत असत. बी.ए.ची पदवी मिळाल्यावर त्यांनी १९३० मध्ये कोल्हापूर येथे शिक्षकी पेशा स्वीकारला. नोकरीत असतानाच नटवर्य बाबूराव पेंढारकर यांनी त्यांच्याकडे प्रभात फिल्म कंपनीच्या मूकपटांची उपशीर्षके लिहिण्याचे काम सोपवले व तेव्हापासून जागीरदार यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्यानंतर १९३० मध्येच बाबूराव पेंढारकर यांच्या कंपनीमध्ये भालजी पेंढारकर ‘राणी रूपमती’ या मूकपटाचे दिग्दर्शन करत होते. त्या वेळी जागीरदार यांना पेंढारकरांचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून नेमण्यात आले. पुढे इंग्रजीमधून पत्रव्यवहार करणे, वृत्तपत्रांना पाठवण्यासाठी वार्तापत्र करणे व शांतारामबापूंना दिग्दर्शनात साहाय्य करणे या कामासाठी प्रभात फिल्म कंपनीमध्ये चाळीस रुपये पगारावर त्यांना नोकरीवर ठेवण्यात आले. याच काळात त्यांनी प्रभातच्या ‘अग्निकंकण’ (मराठी) व ‘जलती निशानी’ (हिंदी) या चित्रपटांत भूमिका केल्या.

     १९३३-३४ च्या दरम्यान कोल्हापूर येथे श्याम सिनेटोन नावाची चित्रसंस्था स्थापन झाली. त्यांच्यातर्फे ‘पार्थकुमार’ या हिंदी व मराठी या दोन्ही भाषांत तयार होणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन भालजी पेंढारकर करत होते. परंतु काही कारणांमुळे भालजींनी हा चित्रपट सोडला. त्यामुळे श्याम सिनेटोनच्या निर्मात्यांनी गजानन जागीरदार यांच्याकडे दिग्दर्शन सोपवल्यामुळे त्यांचे दिग्दर्शनक्षेत्रात पाऊल पडले. त्यानंतर त्यांनी ‘सिंहासन’ (१९३४) व ‘होनहार’ (१९३६) हे चित्रपट दिग्दर्शित केले व त्यात भूमिकाही केल्या.

     अभिनय व दिग्दर्शन या दोन्ही आघाड्यांवर जागीरदार यांचे नाव सर्वतोमुखी झाले. यानंतर मिनर्व्हा मुव्हीटोनच्या सोहराब मोदी यांनी त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले. या कंपनीत ते तीन वर्षे होते. येथे त्यांनी ‘मै हारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करून अभिनयही केला.

     १९४० च्या सुमारास प्रभात फिल्म कंपनीने जागीरदार यांना पुन्हा बोलावून घेतले व त्यांना ‘शेजारी’ (मराठी) व ‘पडोसी’ (हिंदी) या चित्रपटांत भूमिका दिल्या. या दोन्ही चित्रपटांत जागीरदार यांनी ‘मिर्झा’ या मुस्लीम शेजाऱ्याची भूमिका उत्कृष्टपणे अभिनित केली. या भूमिकेची व चित्रपटाची सर्व हिंदुस्थानभर खूप चर्चा झाली. याच भूमिकेसाठी जागीरदारांना बेंगॉल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे १९४१ मध्ये पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर अत्रे पिक्चर्ससाठी ‘पायाची दासी’ व ‘वसंतसेना’ हे दोन चित्रपट करून ते पुन्हा प्रभात फिल्म कंपनीत दाखल झाले. येथे त्यांनी ‘रामशास्त्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व त्यातील भूमिका अशा दोन्ही आघाड्या सांभाळल्या. या चित्रपटासाठी जागीरदार यांना बेंगॉल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून गौरवले.

     यानंतरच्या काळात गजानन जागीरदार यांनी ‘बेहराम खान’, ‘उमाजी नाईक’ असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले व त्याच बरोबर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांतून भूमिकाही केल्या. त्यातील अनेक भूमिका गाजल्याही.

      १९६० मध्ये पुणे येथे फिल्म इन्स्टिट्यूटची स्थापना झाली आणि या संस्थेचे पहिले प्राचार्य म्हणून गजानन जागीरदार यांची नेमणूक झाली. काही वर्षे प्राचार्यपद सांभाळल्यावर पुन्हा चित्रपट क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी ही संस्था सोडली. पण ते मानद प्राध्यापक म्हणून तेथे अधूनमधून काम करत असत. यानंतर त्यांनी जागीरदार प्रॉडक्शन या नावाने स्वत:ची संस्था सुरू केली. ‘उमाजी नाईक’ या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन व अभिनय ही तिन्ही सूत्रे त्यांनी सांभाळली. वास्तविक १९३८ मध्ये याच नावाचा मराठी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. यानंतर ‘वैजयंता’ हा मराठी चित्रपट त्यांनी सादर केला. यातही भूमिका, निर्मिती व दिग्दर्शन या तिन्ही आघाड्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले. त्यानंतर त्यांना ‘शाहीर परशुराम’ या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिके मिळाले. त्यानंतर ‘छोटा जवान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे ‘विशेष अभिनेता’ म्हणून गौरवण्यात आले. नंतर ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा बहुमान पुन्हा मिळाला.

        १९८१ मध्ये भारतीय बोलपटांच्या सुवर्णजयंती महोत्सवात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते जागीरदार यांना सुवर्णपदक देऊन गौरवले.

        जागीरदार यांनी ‘संध्याकाळ’ व ‘पाऊलखुणा’ ही दोन आत्मचरित्रे व ‘अभिनय कसा करावा’ व ‘दि मॅजिक सर्कल’ अशी एकूण चार पुस्तके लिहिली आहेत. मुंबईत वार्धक्याने त्यांचे निधन झाले.

- शशिकांत किणीकर

जागीरदार, गजानन जनार्दन