Skip to main content
x

कुळकर्णी, उमा विरूपाक्ष

     उमा विरूपाक्ष कुलकर्णी यांचा जन्म बेळगावला झाला. प्राथमिक शिक्षण बेळगावच्या सरस्वती मंदिरात, माध्यमिक शिक्षण ठळकवाडी हायस्कुलात, महाविद्यालयीन शिक्षण राणी पार्वतीबाई महाविद्यालयात झाले. पुण्याच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठातून १९८३ मध्ये त्या एम.ए. (आर्ट अ‍ॅन्ड पेन्टिंग) झाल्या व ‘भारतीय मंदिर शिल्प शास्त्रातील  द्रविड शैलीची उत्क्रांती, विकास आणि तिची कलात्मक वैशिष्ट्ये’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली.

     ज्ञानपीठसारख्या सर्वश्रेष्ठ साहित्यिक पुरस्काराच्या मानकरी असणार्‍या कन्नड-मधील श्रेष्ठ कृतींचा व इतर दर्जेदार साहित्याचा मराठीत अनुवाद करून मराठी सारस्वतात भरघोस भर घालणार्‍या उमा विरूपाक्ष कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत २१कादंबर्‍या, ३ कथासंग्रह, ५ नाटके, २ आत्मचरित्रे ह्यांचा अनुवाद केला असून  सध्या कन्नड लेखक अग्नी श्रीधर यांच्या ‘जिगर’ व एस.एन. भैरप्पा यांच्या ‘आवरण’ ह्या पुस्तकांच्या अनुवादाची भर त्या घालीत आहेत. याखेरीज त्यांचे स्वतंत्र लेखन प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर व दूरदर्शनवर प्रसारणासाठीही लेखन चालू आहे. श्रेष्ठ कन्नड साहित्याचा मराठी अनुवाद करून उमाताई त्यांच्या लोकप्रियतेचे क्षेत्र वाढविण्यासोबत राष्ट्रीय एकात्मतेची कामगिरीसुद्धा करीत आहेत. ‘कुणाशीही मोकळेपणाने, आपलेपणाने बोलणार्‍या’ उमाताईंचे घर ‘साधे, स्वच्छ, सुंदर’ आहे, असे त्यांची मुलाखत घेणार्‍या आशाताई साठे म्हणतात.

     बेळगावच्या सुषमा भगवंतराव कुलकर्णी ह्या विवाहानंतर उमा विरूपाक्ष कुलकर्णी झाल्या व परिणामी पति-पत्नी परस्पर साहाय्याने मराठी-कानडी अनुवादाचे उपयुक्त कार्य करीत आहेत. उमाताईंच्या वीणा मिरजे नावाच्या मैत्रिणीला फक्त कानडी येत असे. तिच्याशी बोलून-बोलून उमाताईंचा कानडीचा सराव झाला, समज वाढली, आत्मविश्वासही येऊ लागला. एक्सप्लोसिव्ह फॅक्टरीत काम करणारे पती विरूपाक्ष इंजिनिअर असून उत्तम वाचक आहेत. कानडीतील उत्तम साहित्याच्या वाचनाबरोबरच ते उमाताईंनी लिहिलेल्या कथाही वाचत. पति-पत्नींमध्ये साहित्यिक संवाद होत असे आणि त्यातूनच उमाताईंचा अनुवादाच्या दालनात प्रवेश झाला.

     १९७८-१९७९ पर्यंत कानडीतल्या साहित्याला तीन वेळा तर मराठीतल्या साहित्याला एकदा ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले होते. विरूपाक्ष वाचन करीत व उमाताई अनुवाद करीत! दोघांना एकत्र आणणारा हा विषय रमणीयता वाढवीत गेला. १९८० साली दोघांच्या सहकारातून शिवराम कारंथांच्या ‘तनमनाच्या भोवर्‍यात’ कादंबरीच्या मराठी अनुवादाच्या प्रकाशनाचा शुभारंभ झाला आणि अनुवादाची वाटचाल सुरू झाली. आयुष्याच्या गुंतागुंतीची उकल करणार्‍या, प्रगत विचार मांडणार्‍या साहित्यकृतींची निवड दोघांच्या सहमतीने झाली. विरूपाक्ष हेही अनुवादपटू आहेत.

     उमा कुलकर्णी यांनी ‘एका वेगळ्या लग्नाची गोष्ट’, ‘मावशीचा सल्ला’, ‘केतकर वहिनी’ ही स्वतंत्र ग्रंथनिर्मिती केली आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये ‘साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार’, ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’, ‘महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा पुरस्कार’, महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कारांपैकी ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

अनुवादित ग्रंथसंपदा (कादंबर्‍या) अशी आहे -

     ‘तनमनाच्या भोवर्‍यात’ (डॉ. शिवराम कारंथ), ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’ (डॉ. एस. एन. भैरप्पा), ‘कर्वालो आणि गूढ माणसं’ ‘चिदंबर रहस्य’ (पूर्णचंद्र तेजस्वी), ‘महाश्वेता’ (सुधा मूर्ती), ‘अवस्था’ (यू.आर. अनंतमूर्ती), ‘फ्लॉरिस्टन बंगला’ (नरसिंह मळगी) इत्यादी. कथासंग्रहांमध्ये ‘अनंतमूर्ती यांच्या कथा’ (यू.आर.अनंतमूर्ती), ‘अंतरीची पाने’ (वैदेही), व इतर उल्लेखनीय आहेत. गिरीश कर्नाड लिखित ‘नागमंडल’, ‘ययाती’ व इतर नाटके; ‘गानयोगी मल्लिकार्जुन मन्सूर’ आणि ‘माझं नाव भैरप्पा’ ही आत्मचरित्रे; ‘वंशवृक्ष’ नभोनाट्य-१४ भाग व इतर लेखन त्यांच्या नावावर जमा आहे.

     उमा कुलकर्णी यांना महाराष्ट्र सरकार तसेच कर्नाटक सरकार यांच्याकडून पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. 

- वि. ग. जोशी

कुळकर्णी, उमा विरूपाक्ष