Skip to main content
x

खाडिलकर, विनायक धुंडिराज

          लिंबा गणेश हे पाच हजार वस्तीचे बीड जिल्ह्यातील खेडे आहे. खाडिलकर कुटुंबाचे लिंबा गणेश येथे काही दशके वास्तव्य आहे. त्यांच्याकडे पंचधातूची गणेश मूर्ती आहे. या गणेश मूर्तीच्या पूजनासाठी पेशव्यांनी त्यांना १५ एकर जमीन इनाम म्हणून दिलेली आहे. ती ‘तीर्थाचा मळा’ म्हणून प्रसिद्ध आहे.

           विनायक धुंडिराज खाडिलकर यांचा जन्म व बालपणही लिंबा गणेश या गावातच गेले. ते पहिल्या महायुद्धात (१९१४-१८) सहभागी झाले होते. ते ब्रिटिश फौजेबरोबर  मेसापोटेमियाला गेले होते. तेथून परत आल्यावर त्यांनी आपल्या शेतीत लक्ष घातले. त्या काळात या भागात द्राक्ष लागवड प्रचलित नव्हती. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या शेतात द्राक्ष बाग फुलवली. तयार मालाला स्थानिक बाजारपेठ नव्हती. म्हणून खाडिलकर आपली द्राक्षे हैदराबादला पाठवत. तेथे त्यांना चांगली किंमत मिळे. द्राक्ष शेतीत अनेक धोके होते. लागवड, मशागत, औषध फवारणी, पॅकिंग, वाहतूक या सर्व गोष्टी जोखमीच्या होत्या. त्यासाठी लागणारे श्रमिक त्यांनी प्रशिक्षण देऊन तयार केले. अडीअडचणीला लक्ष देण्यास अनुभवी तज्ज्ञ नव्हते. वादळवारे, रोगराई यांमुळे नुकसान झाल्यास मदत करण्यास कोणी नव्हते, अशा स्थितीत त्यांनी हिमतीने द्राक्षबाग विकसित केली. हैदराबाद संस्थानातील ही पहिली द्राक्षबाग होती. त्याची बातमी हैदराबादमधील ब्रिटिश रेसिडेंटपर्यंत पोहोचली व त्याचा एक प्रतिनिधी  कॉलिन्स हैदराबादहून द्राक्षबाग पाहण्यासाठी लिंबा गणेश या गावाला भेट देऊन गेला.

           खाडिलकर युद्धानिमित्त अनेक देशांत फिरून आले होते. त्यामुळे त्यांची दृष्टी विशाल झाली होती. त्यांची ज्ञानसाधना मोठी होती. त्यांना शिक्षणाबद्दल फार आस्था होती. ते विज्ञाननिष्ठ होते. त्यांचे शेतीतील प्रयोग पाहून त्या भागातील अनेक शेतकर्‍यांनी आपापल्या शेतातही त्याची अंमलबजावणी केली.

           विनायकरावांच्या मृत्यूनंतर पुत्र दिनकर हे शिक्षण सोडून लिंबा येथे वास्तव्यास आले. दिनकररावांना शिक्षणाची आत्यंतिक आवड होती. त्यांच्या गावात शाळा नव्हती. त्यांनी १९४८मध्ये एक शाळा स्थापन केली व त्या शाळेचे ते मुख्याध्यापक झाले. ते व्यवसायाने शिक्षक होते, पण त्यांना शेतीतही तेवढाच रस होता. हवामानातील बदलामुळे पाऊसमान कमी झाले. त्यामुळे त्यांना द्राक्षबाग मोडावी लागली व धान्यपिके घ्यावी लागली, पण त्यातही त्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. त्यांनी गहू व ज्वारीचे सीड प्लॉटस् घेतले. हरितक्रांतीचे ते दिवस होते. हायब्रीड सीडस् व सुधारित बेणे यांचा शासनामार्फत जोरदार प्रचार होऊ लागला. दिनकररावांनी त्याला योग्य प्रतिसाद दिला व ते सीड प्लॉटस्द्वारे नव्या तंत्रज्ञानाला सामोरे गेले. कापसाचे क्षेत्र वाढवले. त्यांनी गावरान कापसाऐवजी कंबोडिया, एच. फोर यांसारख्या नव्या जाती स्वीकारल्या व त्याची यशस्वीरीत्या लागवड केली. ते २०१०मध्ये कालवश झाले. त्यांचे पुत्र सतीश हे गावात स्थायिक आहेत व ते आपली शेती सांभाळतात. बीटी वाणामुळे कापूस शेती पुष्कळच फायदेशीर ठरली आहे. ते धान्यपिकातील गहू व ज्वारीची लागवड करतात. बन्सी व नं. २८९ या वाणांना त्यांची पसंती आहे. ज्वारीचे दगडी वाण परंपरेने येथे घेतले जाते. त्यांनी पेरूसारख्या अन्य फळबागाही विकसित केल्या आहेत. शेताच्या भोवती बांधावर २५ चिंचेची झाडे चांगले उत्पन्न देतात. नव्या काळाला अनुसरून खाडिलकर कुटुंबाने शेतीचे यांत्रिकीकरण केले. शेतीची मशागत करण्यासाठी ते ट्रॅक्टरचा उपयोग करतात. तसेच विहिरीतून पाणी उपसण्यासाठी इंजिन, पंपसेट व ड्रीप यांचा उपयोग करतात. हंगामापुरते पाणी उपलब्ध असल्यामुळे काकडीसारखे पीकसुद्धा ते घेतात.

- डॉ. निळकंठ गंगाधर बापट

खाडिलकर, विनायक धुंडिराज