Skip to main content
x

मांगुरकर, बाळकृष्ण रामचंद्र

       शु-संवर्धन, विशेषत: दुग्ध व्यवसाय, हाच ग्रामीण विकासाचा मूलमंत्र आहे हे धोरण निश्‍चित करून भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान (बाएआयएफ) या स्वयंसेवी संस्थेची उभारणी करणाऱ्या पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई यांनी सुरुवातीला आपल्यासमवेत ध्येयासक्त पशुवैज्ञानिकांची जी फळी उभी केली त्यातील एक प्रमुख म्हणजे संकरित गो-पैदासकार आणि या गायींचा सर्वांगीण अभ्यास करून सर्वसामान्य पशुपालकांमध्ये संकरित गायीविषयी निश्‍चित स्थान निर्माण करणारे डॉ.बाळकृष्ण रामचंद्र मांगुरकर!

       कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे जन्मलेल्या डॉ. मांगुरकर यांनी मुंबई पशु-पैदास महाविद्यालयातून बी.व्ही.एस्सी.एच. पदवी (१९६४) प्रथम क्रमांकाने आणि मुंबई विद्यापीठाच्या सोराब कुरसेदजी नरीमन सुवर्णपदकासह प्राप्त केली. तेथूनच पशु-जनन, पशु-पैदास आणि पशु-प्रजनन या विषयांत पदव्युत्तर शिक्षण (१९६७) पूर्ण करून त्यांनी गोविंद वल्लभपंत कृषी विद्यापीठातून पशु-जनन, पशु-पैदास आणि संख्याशास्त्र विषयांत पी.एचडी. पदवी प्राप्त केली. अल्प काळासाठी (१९६४-१९६८) महाराष्ट्र शासनाच्या पशु-संवर्धन विभागात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर नवनिर्मित महाराष्ट्र कृषी विद्यापीठांतर्गत मुंबई आणि नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात व्याख्याता व साहाय्यक प्राध्यापक म्हणून डॉ.मांगुरकर यांनी अध्यापन कार्य केले. भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठानच्या ग्रामविकासासाठी दुग्ध व्यवसाय या धोरणाला तरुण पशुवैज्ञानिकांनी हातभार लावावा, या डॉ. मणीभाई देसाई यांच्या आवाहनाला प्रतिसाद देेत विद्यापीठ सेवेतून मुक्त होऊन डॉ. मांगुरकर यांनी १९७०मध्ये उरळीकांचन येथील बायफच्या गो-पैदास प्रक्षेत्रावर व्यवस्थापक व शास्त्रज्ञ म्हणून पदभार स्वीकारला व पुढील तीस वर्षांच्या (१९७०-२००१) काळात संशोधन निमंत्रक, संशोधन संघटक, मध्यवर्ती संशोधक केंद्र प्रमुख, संस्थेचे उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष या पदांवर कार्य करत बायफची ध्येयधोरणे राबवताना संकरित गो-पैदाशीची बीजे महाराष्ट्रात नुसती रुजवली नाहीत, तर या वृक्षाच्या शाखा देशाच्या इतर राज्यांतही पसरवल्या. संकरित गो-पैदासीचा, त्यांच्या आहार पोषणाचा, संगोपनाचा, आरोग्यरक्षणाचा सर्वांगीण अभ्यास करताना आपल्या संशोधनाच्या शिफारसी सर्वसामान्य पशुपालकापर्यंत पोहोचवल्या आणि दुग्ध व्यवसाय हा निव्वळ शेतीपूरक व्यवसाय न राहता मुख्य व्यवसाय होऊ शकतो हे ग्रामीण जनतेला पटवून दिले. भारतात झालेल्या श्‍वेतक्रांतीला भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठानच्या संकरित गो-पैदास कार्यक्रमाचा प्रचंड हातभार लागला आणि या सार्‍या कार्यक्रमाचे जनक म्हणून डॉ. मांगुरकर यांचेच नाव घ्यावे लागेल.

       कृत्रिम रेतन हा संकरित गो-पैदाशीचा पाया आहे. कृत्रिम रेतन करावयाचे असल्यास माजावर आलेल्या गाईला शासकीय केंद्रावर न्यावे लागे. यात वेळ, श्रम आणि कधी गायीचा माजही वाया जात असे. यासाठी गोपालकाच्या गोठ्यात कृत्रिम रेतन ही संकल्पना डॉ. मांगुरकर यांनी मांडली आणि या धर्तीवर गोठित वीर्यमात्रा वापरून कृत्रिम रेतन करण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्रात आठ केंद्रे प्रस्थापित केली. यथावकाश महाराष्ट्रासह तर ८ राज्यांत अशी १६५० गो-पैदास केंद्रे स्थापन करण्यात आली. ही गो-पैदास केंद्रे पदवीधर पशुवैद्याकडूनच चालवली जावीत ही सुरुवातीची संकल्पना पशुवैद्यांच्या अनुपलब्धेमुळे विस्तारीकरणात बाधा आणते आहे याची जाणीव होताच डॉ. मांगुरकर यांनी कृत्रिम रेतन तंत्रज्ञ ही संकल्पना पुढे आणून असे तंत्रज्ञ प्रशिक्षणाच्या माध्यमातून तयार केले व संकरित गो-पैदास कार्यक्रम धडाडीने पुढे नेला. दुग्ध व्यवसायाचे विस्तारीकरण करण्यासाठी डॉ.मांगुरकर यांनी अनेक कल्पकतापूर्ण योजना पुढे आणल्या ज्यात प्रामुख्याने जनावरांचे फिरते दवाखाने, डॅनिश आणि आयसीएआर पुरस्कृत ग्रामीण रोगनिदान केंद्रे, बाएफ पुरस्कृत पण खासगी क्षेत्रातील कृत्रिम रेतन केंद्रे, सहकारी दुग्ध संघटनांना व्यापारी तत्त्वावर पशुवैद्यकीय सेवा, साखर कारखान्यांच्या मदतीने कारखाना क्षेत्रातील संकरित गायींचे स:शुल्क लसीकरण, दुष्काळप्रवण क्षेत्रात वैरण आणि खाद्य बँका, भूकंपग्रस्त लातूर जिल्ह्यात पशुधन आधारित उद्योगामार्फत पुनर्वसन यांचा समावेश आहे. दुग्ध व्यवसाय विस्तारीकरणाचा कार्यक्रम म्हणून डॉ. मांगुरकरांनी आयसीएआर पुरस्कृत पशू उत्पादनाच्या नोंदी या कार्यक्रमाद्वारे शास्त्रीय पद्धतीने आकडेवारी संकलित केली. वेगवेगळ्या संघटनांतर्फे दुग्ध व्यवसाय प्रबोधनाचे कार्यक्रम हाती घेतले, दुग्धव्यवसायासंबंधी एकंदर ११ पुस्तके आणि मराठी नियतकालिकांतून ४० लेख प्रसिद्ध केले.

       विस्तार कार्यक्रमासोबतच बायफच्या संशोधन प्रकल्पामध्येही डॉ. मांगुरकर सहभागी असत. संकरित जनावरांच्या संगोपन पद्धतींचे प्रमाणीकरण केल्याने संस्थेच्या गो-पैदास क्षेत्रावर तीस वर्षांच्या काळात बाहेरून बदली जनावरे आणण्याची गरज भासली नाही. कॅनडास्थित डेअरी हर्ड इंप्रूव्हमेंट असोसिएशनच्या संगणक केंद्रावर घेतलेल्या संख्याशास्त्रीय प्रशिक्षणाच्या आधारे डॉ. मांगुरकरांनी पुनरुज्जीवन आणि संवर्धन योजना, देशातील प्रमुख दुग्ध व्यावसायिक राज्यांतील दुधाळ जनावरांची सद्यःस्थिती आणि पुढील वाटचाल, कर्नाटक राज्यातील दुग्ध व्यवसायाचे मूल्यमापन अशा अनेक समित्यांवर त्यांनी काम केले. पाणलोट विकास कार्यक्रमात जनावरांचे महत्त्व हा त्यांचा संशोधनात्मक सहभाग स्वीडिश डेव्हलपमेंट को-ऑपरेशन आणि लीड लाइव्हस्टॉक इनव्हायरन्मेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट या संस्थांच्या माध्यमातून शासनमान्य होऊन देशात हाती घेतल्या जाणाऱ्या सर्व पाणलोट विकास कार्यक्रमात आता तेथील पशुधनावर होणाऱ्या परिणामांचाही विचार होऊ लागला आहे.

       देशी-परदेशी संशोधन पत्रिकांतून सातत्याने लेखन करणारे व राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांतून निर्भीडपणे आपले विचार मांडणारे पशुवैज्ञानिक, शासकीय, निमशासकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, पशुधनासंबंधी समित्यांचे सभासद, अनेक व्यावसायिक विषय संस्थांचे सभासद आणि स्वित्झर्लंड, बेल्जियम, हॉलंड, यु.एस , कॅनडा, रशिया अशा दुग्ध व्यवसायात अग्रेसर राष्ट्रांकडून वारंवार आमंत्रित केले जाणारे भारतीय पशुवैज्ञानिक ही डॉ. मांगुरकरांची प्रतिमा महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशीच आहे.

- डॉ. रामनाथ सडेकर

मांगुरकर, बाळकृष्ण रामचंद्र