मावजी, पुरुषोत्तम विश्राम
काठेवाडात द्वारकेजवळ वरवाला या गावी सधन भाटिया जातीत पुरुषोत्तम विश्राम मावजी यांचा जन्म झाला. त्यांनी मॅट्रिक झाल्यावर मि. जेम्स मॅकडोनल्ड या इंग्रज गृहस्थाजवळ घरीच अभ्यास केला आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना इतिहास संशोधनाचा, कलाप्रेमाचा आणि प्राचीन वस्तुसंग्रहाचा नाद लागला. गोवर्धनराम माधवराव त्रिपाठी व सर विठ्ठलदास दामोदर ठाकरसी या त्यांच्या जिवलग मित्रांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते व्यवसायाने व्यापारी होते. कापडाच्या गिरण्यांशी त्याचा विशेष संबंध होता. द्वारका सिमेंट फॅक्टरीचे ते मूळ संयोजक व संस्थापक होते. त्यांचा परदेशाशीही व्यापारविषयक मोठा संबंध होता.
इतिहास, राजकारण, साहित्य, कला, पुराणवस्तू (अिींर्ळिींळींळशी) व शिल्प हे त्यांचे आवडते विषय होते. मुंबई रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते एक प्रमुख सभासद होते. महाराष्ट्राच्या इतिहासाचे ते विशेष जाणकार होते. ऐतिहासिक लेख, वस्तुचित्रे वगैरे साहित्याचा संग्रह विपुल खर्च करून त्यांनी जमवलेला होता. या संग्रहाचा एक महत्त्वाचा भाग मुंबईमधील छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयामध्ये (तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये) ठेवला आहे.
याच कलाप्रेमामुळे त्यांनी मुंबईस ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग प्रेस’ काढला आणि त्याद्वारा चित्रकलेच्या प्रसाराची व्यवस्था केली. या इलाख्यात ‘सुवर्णमाला’ नावाचे चित्रांचे नियतकालिके त्यांनीच काढले व सचित्र पुस्तके काढण्याची प्रथाही त्यांच्यामुळेच सुरू झाली. गुजराथी साहित्य परिषदेत त्यांनी ऐतिहासिक साहित्याच्या स्वरूपाविषयी अनेक लेख वाचले.
अहमदाबादच्या सहाव्या गुजराती साहित्य संमेलनाच्या वेळी कलाप्रदर्शनाचे अध्यक्षस्थान मावजी यांना देण्यात आले होते. त्यांच्या औदार्यपूर्ण सेवेबद्दल तत्कालीन बडोदे सरकारने त्यांना ‘राजरत्न’ ही पदवी दिली होती.
मावजी यांची ग्रंथ संपदा अशी आहे - १. रजपुतानांना देशी राज्यो, २. रणवीरसिंह, ३. प्रबोधभारत १-२ भाग, ४. सुरसागरनी सुंदरी, ५. शिवाजीनो वाघनखो, ६. मानवधर्ममाला, ७. संध्या अने मराठा राज्यनो सूर्यास्त, ८. रणयज्ञ याने पचीस वर्षनुं युद्ध, ९. नीतिवचन, १०. वज्राघात अने विजयनगरनो विनाशकाल, ११. चार संन्यासी, १२. वतनपत्रे, निवाडपत्रे (मराठी), १३. कैफियत यादी, १४. नेटीव अॅडमिनिस्ट्रेटिव जीनियस ऑफ नाइन्टीन्थ सेन्चुरी (इंग्रजी), १५. व्हॉट लिटरेचर डू वुइ वॉन्ट (इंग्रजी), १६. शिवाजीनुं स्वराज्य, १७. धी इंडियन स्ट्रे थॉट्स सीरिज १, २, ३ (इंग्रजी).
— संपादित