Skip to main content
x

मराठे, संजीवनी रामचंद्र

संजीवनी

     संजीवनी मराठे यांनी शालेय जीवनापासूनच काव्यलेखनास व काव्यगायनास सुरुवात केली. त्यांनी एम.ए.(मराठी, हिंदी) ही पदव्युत्तर पदवी धारण केली.

     “कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी,” असे म्हणणार्‍या संजीवनी यांनी शेकडो उत्तमोत्तम कविता लिहून मराठी काव्यक्षेत्रात आपले नाव दीर्घकाळ चमकत ठेवले होते.

     आपल्या भावमधुर अशा काव्यगायनामुळे त्या प्रथम रसिकांना परिचित झाल्या. त्यांनीच गायलेली त्यांची गीते खूप गाजली. प्रासादिक शैली व नादपूर्ण रचना यांमुळे १९३२ (काव्यसंजीवनी) ते १९९४ (आत्मीय) या कालखंडात त्यांनी कवितेच्या प्रांतात आपला ठसा उमटवला.

     ‘काव्यसंजीवनी’ (१९३२), ‘राका’ (१९३९), ‘संसार’ (१९४३), ‘चित्रा’ (१९५७), ‘छाया’ (१९४९), ‘भावपुष्प’, ‘परिमला’ हे त्यांचे सात काव्यसंग्रह खूप गाजले. त्याखेरीज ‘गंमत’ आणि ‘बरं का गं आई’ हे बालगीतांचे संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘चंद्रफूल’ (१९७१), ‘मी दिवाणी’ (१९८१), ‘आत्मीय’ (१९९४) या पुस्तकांतील कवितांमधून भावनांची उत्कटता, आर्तता जाणवते. कवी कुसुमाग्रज व जोग यांनी संपादित केलेल्या ‘काव्यवाहिनी’च्या चौथ्या खंडात संजीवनी मराठे यांच्या चार कविता समाविष्ट केलेल्या आहेत. पुण्याच्या ‘अनाथ विद्यार्थी गृह’ प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ‘मराठी साहित्य दर्शन’च्या दहाव्या खंडात त्यांच्या काव्याचा परिचय करून देण्यात आलेला आहे. संजीवनी मराठे यांच्या सुमारे १२५ कविता या खंडात देण्यात आल्या आहेत.

     कवितांखेरीज ‘ट्युलिप्सच्या देशातून’ (१९९३) आणि ‘गीतांजली दर्शन’ (१९९८) ही त्यांची अनुक्रमे पत्रसंकलन व काव्यानुवाद असलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत.

     रा.चिं.मराठे यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या संजीवनींवर रविकिरण मंडळाचा, तसेच तांबे यांच्या गीत-काव्याचा प्रभाव होता. कुसुमाग्रज, बा.भ.बोरकर, पु.शि.रेगे, पद्मा गोळे, वा.रा.कान्त, बा.सी.मर्ढेकर यांच्या बरोबरीने काव्यलेखन करणार्‍या संजीवनी यांच्या कविता आजही, पाठ्यपुस्तकातून वाचायला मिळतात आणि आकाशवाणीवर अचानक त्यांची ‘शांत सागरी कशास उठविलीस वादळे’ किंवा ‘सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का’ अशी भावमधुर गीते ऐकायला मिळतात.

     - प्रा. सुहास बारटक्के

मराठे, संजीवनी रामचंद्र