Skip to main content
x

प्रधान, गणेश प्रभाकर

     इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक, प्रभावी वक्ते, हाडाचे समाजवादी, एक समतोल विचारवंत आणि ललित व ललितेतर असे इंग्रजीत व मराठीत लेखन करणार्‍या गणेश प्रभाकर प्रधानांचा जन्म पुणे येथे एका सुसंस्कृत, सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सुरुवातीचे शिक्षण पुणे येथेच झाल्यावर ते मुंबई विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाले.

     १९४५ ते १९६५ या काळात पुण्यातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले. ‘प्रधान मास्तर’ या आपुलकीच्या संबोधनाने ते शिक्षक व विद्यार्थी यांच्या परिवारात ओळखले जातात. त्यांच्यावर साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा व विचारांचा प्रभाव होता. त्यातूनच त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. १९६५ मध्ये प्राध्यापक पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात उर्वरित आयुष्य व्यतीत केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी तुरुंगवास भोगला. तेथे आचार्य स.ज.भागवत व आचार्य शं.द.जावडेकर यांच्या व्याख्यानांतून त्यांच्यावर भारतीय धर्म व तत्त्वज्ञान यांचे संस्कार झाले. स्वेच्छानिवृत्तीनंतर महाराष्ट्र विधान परिषदेत त्यांनी शिक्षकांचे प्रतिनिधित्व केले व तिथे १९६६ ते १९८४ पर्यंत एम.एल.सी. म्हणून आपला ठसा उमटविला. दोन वर्षे ते विधान परिषदेत विरोधी पक्ष नेतेही होते. त्यांच्या आयुष्यात कसोटी पाहणारे व प्रलोभनाचे अनेक प्रसंग आले. पण त्यातून तावून- सुलाखून ते बाहेर पडले. प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी १९७५मध्ये देशात आणीबाणी जाहीर केली तेव्हा तिच्याविरुद्ध  सत्याग्रह करून त्यांनी १८ महिने तुरुंगवास भोगला. आपली डॉक्टर पत्नी वारल्यावर त्यांनी आपले स्वतःचे राहते घर साधना ट्रस्टला देणगीदाखल देऊन पुण्यातच हडपसर येथील वृद्धाश्रमात राहू लागले. भारतीय संस्कृतीतील चार आश्रमांपैकी त्यांनी आता खर्‍या अर्थाने वानप्रस्थाश्रम स्वीकारला आहे. तेथे ते लेखन, वाचन करीत आहेत.

     त्यांचे लेखन बहुभाषी असून बहुविध स्वरूपाचेही आहे. ललित व ललितेतर अशा दोन्ही प्रकारच्या इंग्रजी व मराठी लेखनासाठी त्यांना अनेक मान-सन्मान व पुरस्कार मिळाले. त्यात ‘भारतीय भाषा पुरस्कार’ व महाराष्ट्र राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीबद्दलचे तीन पुरस्कार, ‘लोकमान्य टिळक’ (१९८९), ‘साने गुरुजी’ (१९९०), व ‘राम गणेश गडकरी’ (१९९४) ही साक्षेपी व विवेचक चरित्रे व ‘स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत’ (१९८७) हा इतिहास यांचा त्यात समावेश आहे. यांनी प्रा.अ.के.भागवत यांच्या सहकार्याने इंग्रजीत लिहिलेल्या टिळक चरित्राला टिळक जन्मशताब्दी वर्षात अखिल भारतीय टिळक चरित्राच्या स्पर्धेत पुरस्कार लाभला आहे. त्यांनी मुलांसाठीही महात्मा गांधीचे चरित्र इंग्रजीत लिहिले आहे. स्वतःच्या आत्मचरित्राचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहे. त्याशिवाय त्यांच्या नावावर अनेक संपादनेही आहेत. ‘हाजीपीर’ हे प्रवासवर्णनही आहे.

     ललित व ललितेतर यांच्या सीमारेषांवर लिहिलेल्या ‘साता उत्तराची कहाणी’ व ‘आठा उत्तराची कहाणी’ यांपैकी ‘साता उत्तराची कहाणी’मध्ये भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, प्रजासत्ताक ह्यांपासून १९८०पर्यंतची भारतीय लोकशाहीची वाटचाल आली आहे. या संपूर्ण कालखंडातील अनेक महत्त्वपूर्ण घटना, प्रमुख नेते व कार्यकर्ते, त्यांची कुटुंबे व चळवळी, विद्यार्थी, लेखक, पत्रकार यांच्या दृष्टीकोनांतून त्यांनी हा आढावा घेतला आहे. अनेक राजकीय प्रवाह, विचारप्रणाली व त्यांचे वैयक्तिक व सामाजिक जीवनावर होणारे परिणाम त्यातून व्यक्त होतात. त्या नंतरच्या काळातील म्हणजे १९८० ते २००७ या कालखंडातील सामाजिक, राजकीय चळवळीचा प्रवास ‘आठा उत्तराची कहाणी’ (२००७) ह्या लेखनातून प्रधानांनी चित्रीत केला आहे. काँग्रेस, भाजप, मार्क्सवादी, समाजवादी रिपब्लिकन पार्टी या पाच प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व सर्वोदयी कार्यकर्ते ह्यांच्या मुलाखती व मनोगत यांतून त्या-त्या पक्षाचा इतिहास, बदलती ध्येये व धोरणे, त्यांनी घेतलेल्या भूमिका आणि त्यामागचे विचारप्रवाह यांचा हा आढावा आहे. हे विविध टप्पे उलगडताना कधी आत्मकथने, पत्रे, अहवाल यांच्या आधारे १७ प्रश्नांच्या उत्तरांतून ही आठा उत्तराची कहाणी वैशिष्ट्यपूर्ण रितीने व्यक्त होते. त्यात १९४८ ते १९८० नंतर २००७ पर्यंतच्या राजकीय पार्श्वभूमीच्या प्रवासातून अनेकांचे खरे चेहरे व त्यांचे मुखवटे स्पष्ट होतात. राजकीय प्रश्नांबरोबरच भारतीय मुस्लीम स्त्री व तिचे प्रश्न, समस्या व उत्तरे शोधण्याचाही प्रधानांनी प्रयत्न केला आहे. लेखकाने हे पुस्तक कुणा एका राजकीय व्यक्तीला अर्पण केलेले नसून प्रतिकूल राजकीय परिस्थितीत विचारांच्या आधारे ध्येयवादी वृत्तीने कार्य करणार्‍या तरुण राजकीय कार्यकर्त्यांना अर्पण केले आहे.

     अगदी अलीकडे त्यांनी प्रसिद्ध रशियन विचारवंत व कादंबरीकार टॉलस्टॉय यांना लिहिलेल्या १६ पत्रांतून त्यांचे जीवन, विचार व साहित्य यांचा साक्षेपी व रसिकतेने परामर्श घेतला आहे. प्रधानांच्या लेखनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांच्यातील समृद्ध व समतोल विचारसरणीच्या थोर सच्च्या समाजवाद्याचे दर्शन घडते.

     २०१० साली प्रधान यांचे निधन झाले. 

- डॉ. प्रल्हाद वडेर

प्रधान, गणेश प्रभाकर