Skip to main content
x

शेवडे, इंदुमती रामकृष्ण

     इंदुमती शेवडे ह्यांचा जन्म शिवनी (मध्य प्रदेश) येथे झाला. त्यांनी इंग्रजी विषयात एम.ए. पदवी प्राप्त केली. विवाहानंतर त्या नागपूरला आल्या. मराठी लघुकथा या विषयावर त्यांनी पीएच.डी. मिळविली. नागपूरहून प्रसिद्ध होणार्‍या ‘इण्डिपेन्डन्ट’ या साप्ताहिकाच्या उपसंपादक, पत्रकार म्हणून काम केल्यावर प्रथम १९५७पासून १९६८पर्यंत आकाशवाणीत व नंतर १९६८पासून १९७५पर्यंत लोकसेवा आयोगात मराठी विभागप्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. इंदुताई शेवडे यांच्या लेखनाला सुरुवात कथेपासून झाली.

     ‘मिर्झा गालिब’ (१९८०) ही कादंबरी; ‘आम्ही तो बदनाम’ (१९८८) ही गोविंदपंत बुंदेले यांच्याविषयीची चरित्रात्मक कादंबरी; ‘बाबा नावाचा झंझावात’ (१९९१) हे बाबा आमट्यांच्या जीवनासंबंधीचे कादंबरीरूप चरित्र; ‘गणदेवता’, ‘आपका बंटी’ या कादंबर्‍यांचे अनुवाद; ‘पु.य.देशपांडे’ हा परिचयपर दीर्घलेख असे त्यांचे विविध स्वरूपाचे लेखन प्रसिद्ध आहे. लघुकथाविषयक प्रबंधामुळे त्यांच्या एकूणच लेखनाला एक चिकित्सक परिमाण लाभले आहे. मौलिकता प्राप्त अशा या लेखनाचे श्रेय इंदुमती शेवडेंना दिले जाते.

     - प्रा. अनुराधा साळवेकर

शेवडे, इंदुमती रामकृष्ण