Skip to main content
x

ताम्हनकर, नारायण धोंडो

‘दाजी’ आणि ‘गोट्या’ या दोन सदाबहार व्यक्तिरेखाटनांमुळे नारायण धोंडो ताम्हनकर यांनी मराठी वाङ्मयात मानाचे स्थान मिळवले आहे. मॅट्रिक झाल्यावर काही काळ त्यांनी कारकूनाची व शिक्षकाची नोकरी केली. नंतर ‘किर्लोस्कर’ या मासिकात उपसंपादक पदावर काम करताना शंकरराव किर्लोस्करांच्या पुरोगामी विचारांचा प्रभाव लेखनावर पडला. ‘ब्रह्मर्षी’ (१९११) हे त्यांचे पहिले नाटक असून त्यानंतर ‘उसना नवरा’ (१९३३), ‘गोड गोंधळ’ (१९३५), ‘बच्चा नवरा’ (१९४०), ‘दाजी धडपडे’ (१९५०) ही नाटके व अनेक एकांकिका लिहिल्या. त्यांमधून स्त्रिया, मुले आणि कामकरी जीवन यांचे प्रश्न हाताळले. नाटकाची रचना प्रहसनात्मक करण्याकडे त्यांचा कल होता. साहजिकच कथावस्तू विनोदी अंगाने उलगडत जायची. त्यांची नाटके खळखळून हसवत नसली, तरी विनोदाची पखरण त्यामध्ये असते.

आदर्श जीवनमूल्यांचा पुरस्कार-

‘दाजी’ हा त्यांचा साहित्यिक मानसपुत्र. ही मालिका किर्लोस्करमधून क्रमशः प्रसिद्ध झाली. समाजातील अन्याय्य रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांविरुद्ध लढायला उभा ठाकलेला आणि नवसमाजाच्या निर्मितीसाठी धडपडणारा दाजी हा तरुणांपुढचा आदर्श ठरला. दाजीच्या रूपाने त्यांनी समाजजीवनातील हास्यास्पदता आणि विसंगती नेमकेपणाने टिपली आहे. त्यांचे लेखन मध्यमवर्गीय माणसासंबंधीचे असले, तरी आदर्श जीवनमूल्यांचा पुरस्कार करणारे आहे. त्यांच्या ‘निवाडे’ या कथासंग्रहात वीस वेगवेगळ्या व्यक्तींचा यमाबरोबर मृत्यूपूर्वी झालेला संवाद रंगवला आहे. ‘चकमकी’ (१९४३), ‘अनेक आशीर्वाद’ (१९४४), ‘आमचे हे’ (१९४५) या पुस्तकांमधून कौटुंबिक प्रश्नांची चर्चा केली आहे. ‘ग्यानबा तुकाराम’ हा ग्रामीण स्त्रिया व खेडूत यांच्यासाठी असलेला पत्रसंग्रह प्रसिद्ध आहे. ‘तात्या’ (१९४१), ‘मामा’ (१९४२), ‘गुजाताई’ (१९४७) या त्यांच्या अन्य काही कादंबर्‍या होत.

ताम्हनकरांनी मुलांसाठी ‘खेळगडी’ या मासिकातून सातत्याने लेखन केले. त्यातील ‘गोट्या’ (भाग १ ते ३,१९४३) आणि ‘चिंगी’ या पुस्तकांनी मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मुलांचे मानसशास्त्र आणि भावविश्व समजून घेत मुलांची कल्पकता, चौकस वृत्ती आणि त्यांच्या व्रात्यपणामागचे तर्कशास्त्र उलगडून दाखवण्यात ते यशस्वी झाले. ताम्हनकरांपूर्वी लिहिल्या गेलेल्या बालसाहित्यातील बहुतेक कथानायक हे सर्वगुणसंपन्न असत. त्या पार्श्वभूमीवर गोट्याचा खोडकरपणा, त्याच्या हातून कळतनकळत घडणार्‍या चुका, त्या दुरुस्त करताना होणारे घोटाळे यांमुळे गोट्या सगळ्यांनाच आपला वाटला. मनोरंजन आणि संस्कार याचा सुरेख मेळ त्यांनी गोट्याच्या रूपाने घातला आहे. गोट्याच्या दुसर्‍या व तिसर्‍या भागांमध्ये मात्र तो आदर्शवादाकडे झुकल्यामुळे त्या व्यक्तिरेखेतील जिवंतपणा थोडा कमी झाल्यासारखा वाटतो.

ताम्हनकरांच्या सर्व प्रकारच्या लेखनातून सामाजिक जाणिवेचा आविष्कार घडविण्याची तळमळ सतत प्रतीत होत राहते.

- मृणालिनी चितळे

ताम्हनकर, नारायण धोंडो