Skip to main content
x

थोरात, हरिश्चंद्र गणपत

      रिश्चंद्र काही काळ तेजेवाडी येथे राहिल्यावर उर्वरित शिक्षण त्यांनी  मुंबई येथूून पूर्ण केले. सिद्धार्थ महाविद्यालय आणि कीर्ती महाविद्यालय, मुंबई येथून बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९७७ साली बी.ए.पूर्ण झाल्यावर मराठी या विषयातून १९७९ साली मुंबई विद्यापीठातून प्रथम वर्गात एम.ए.पूर्ण केले. पुढे १९९५ साली प्रा.रमेश तेंडुलकर व प्रा.सुभाष सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कादंबरी: एक साहित्यप्रकार’ या विषयात पी.एच.डी. मिळवली.

कीर्ती महाविद्यालय मुंबई येथे १७ वर्षे तसेच मुंबई विद्यापीठातील मराठी विभागात ६ वर्षे मराठीचे अध्यापन केले. नोव्हेंबर २००८पासून  ते गुरुदेव टागोर तौलनिक अध्यासन केंद्राचे काम पाहतात. सैद्धान्तिक समीक्षा, साहित्याचे समाजशास्त्र हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. समकालीन पाश्चात्त्य समीक्षेचा विशेष अभ्यास केला आहे. विविध नियतकालिकांमधून त्यांचे  ५० लेख प्रकाशित झाले आहेत. मराठी वाङ्मयकोश, समाजविज्ञान कोश, एन्सायक्लोपीडीया ऑफ इंडियन पोएटिक्स अशा विविध कोशांसाठी त्यांनी  लेखन केले आहे.

डॉ.थोरातांनी ‘कादंबरीविषयी’ पद्मगंधा प्रकाशन, पुणे (२०००) या पुस्तकातून कादंबरी या साहित्य प्रकाराविषयीचे तात्त्विक विवेचन व उपयोजन मांडले आहे. तर ‘साहित्याचे संदर्भ’, मौज प्रकाशन, मुंबई (२००६) या पुस्तकातून पाश्चात्त्य विचारवंत बाख्तिन व देरिदा यांच्या विचारांची व संकल्पनांची ओळख करून दिली आहे. ‘हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तमराव’ हे त्यांचे आगामी पुस्तक होय. वैशिष्ट्यपूर्ण समीक्षादृष्टी असलेल्या डॉ.थोरातांना मुंबई मराठी साहित्य संघातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट समीक्षक पुरस्कार (२००५) मिळाला आहे. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे ‘साहित्याचे संदर्भ’ या साहित्यकृतीला वा.ल.कुलकर्णी पुरस्कार २००९ साली प्राप्त झाला आहे.

- सुपर्णा कुलकर्णी

थोरात, हरिश्चंद्र गणपत