Skip to main content
x

बारवाले, राजेंद्र बद्रिनारायण

          हाराष्ट्र हायब्रीड सीड्स कंपनी म्हणजेच ‘महिको’ या जगद्विख्यात बीज उत्पादन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून धुरा वाहत असलेले राजेंद्र बारवाले यांचा बीज उत्पादन क्षेत्राशी जन्मापासूनच संबंध आला असे म्हणावे लागेल, कारण ‘महिकोचे जनक पद्मभूषण डॉ. बद्रिनारायण बारवाले’ हे त्यांचे पिता होत.  डॉ. बद्रिनारायण बारवाले यांनी आपल्या चिरंजीवाला कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बीज उत्पादन व संशोधन क्षेत्रात काम करण्यास प्रेरणा दिली. राजेंद्र बद्रिनारायण बारवाले यांचा जन्म आजोळी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे झाला. खामगावच्याच शाळेत मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ते १९७०मध्ये त्यावेळच्या बोर्डात गुणवत्ता यादीत ११व्या क्रमांकाने झळकले. त्यांच्या शिक्षक व नातेवाईकांना त्यांनी आधुनिक विषयाचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात जावे असे वाटले; परंतु त्यांनी कुटुंबाच्या व्यवसायातच लक्ष घालून ‘महिको’ अधिक समृद्ध करावी असा वडिलांचा विचार ठरला. त्यामुळेच त्यांनी राजेंद्र यांना पूर्वीच्या उत्तर प्रदेशातली आणि सध्याच्या उत्तरांचल राज्यातील ‘जी.बी.पंत युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी’ येथे कृषी अभ्यासक्रमासाठी पाठवले. तेथून राजेंद्र यांनी १९७६ साली बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी ही पदवी संपादन केली.

          महाविद्यालयातून कृषी विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याला कृतीची जोड देणे आवश्यक होते. म्हणून दोन वर्षे घरच्या शेतीत पुरेसा अभ्यास व प्रात्यक्षिक केल्यानंतर राजेंद्र बारवाले यांनी ‘महिको’च्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यांची १२ ऑक्टोबर १९८९ रोजी ‘महिको’चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या भूमिकेत काम करताना त्यांनी ‘महिको’च्या मानव संसाधन विभाग तसेच संशोधन विभाग अधिक सक्षम व अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच जालना येथील संशोधन केंद्र भारतभर प्रशंसेस पात्र ठरले आहे. बीज उत्पादनाशी निगडित असणारे संशोधन व इतरत्र होणारे संशोधन त्याचप्रमाणे प्रत्यक्ष उत्पादनाशी निगडित अडीअडचणी याबाबतीत ते नेहमीच जागरूक असतात. राजेंद्र बारवाले यांचे कर्तृत्व अनेक कंपन्या, संस्था  यांची कार्यकारी मंडळे, संचालक मंडळे यांमधील आपल्या कल्पक आणि विधायक कामगिरींनी सिद्ध झाले आहे. बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात भारत व स्वित्झर्लंड या देशांच्या एकत्रित सहकार्याने स्थापन झालेल्या ‘जॉइंट अ‍ॅपेक्स कमिटी’चे ते २००१पासून सदस्य आहेत. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयांतर्गत शेतकऱ्यांचे हित आणि हक्क यासंबंधी कार्य करणाऱ्या त्याचप्रमाणे पीक उत्पादनाच्या वाढीसाठी व संवर्धनासंदर्भात काम करणाऱ्या ‘प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राइट अ‍ॅथॉरिटी’चे ते सक्रिय सदस्य आहेत. कृषीसंबंधातील सामान्य जनतेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या या अतिशय महत्त्वाच्या विषयाची माहिती अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे असते. त्यासाठी जागतिक स्तरावरील घडामोडींवर लक्ष ठेवून अभ्यास करावा लागतो. त्यासाठी राजेंद्र बारवाले यांना वेळोवेळी परदेशातही जावे लागले. जालना येथील ‘महिको रीसर्च अँड लाइफ सायन्स सेंटर’, ‘महिको सीड प्रोसेसिंग युनिट’, जालना ‘सीड प्रोसेसिंग अँड कोल्ड स्टोअर’ या विभागावर नियंत्रण ठेवण्याचे काम ही राजेंद्र यांच्यासाठी जबाबदारी आहे. एक लोकाभिमुख व सकारात्मक कार्यशैली असलेले रोटरियन असा त्यांचा नावलौकिक आहे.

- संदीप राऊत

बारवाले, राजेंद्र बद्रिनारायण