भाले, नारायण लक्ष्मण
नारायण लक्ष्मण भाले यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण जन्मगावी व उच्च माध्यमिक शिक्षण हैदराबाद संस्थानाच्या शिक्षण मंडळामधून झाले. त्यांनी १९५२मध्ये हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम क्रमांकाने मिळवली व १९५५मध्ये दिल्लीस्थित पुसा संस्थेतून असोशिएटशिप आय.ए.आर.आय. पदवी जेनेटिक्स अँड प्लँट ब्रिडींग या विषयात (एम.एस्सी. समकक्ष पदवी) प्राप्त केली. त्यांनी परभणीतील मराठवाडा कृषी विद्यापीठातून जेनेटिक्स अँड प्लँट ब्रिडींग या विषयांतर्गत ज्वारी या पिकांवर संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन केली. डॉ. भाले यांनी आपल्या सेवाकाळामध्ये तब्बल २० वर्षे कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन संस्था यांमध्ये विविध विषयांचे विभागप्रमुख या नात्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यांनी कापूस संशोधन विभागात १२ वर्षे, संशोधनात्मक व्याख्याता म्हणून १० वर्षे, बीजतंत्रज्ञान संशोधनात ८ वर्षे, तर प्रशासकीय सेवा या संशोधनात्मक संस्थेत १२ वर्षे काम केलेले आहे. त्यांनी एम.एस्सी. (कृषी)च्या १८ विद्यार्थ्यांना आणि पीएच.डी.च्या ९ विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले आहे. नागपूर विद्यापीठामध्ये ते १९६३ ते १९६७ या काळात पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी मराठवाडा विद्यापीठामध्ये १९६७ ते १९६९, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये १९६९ ते १९७२ आणि १९७२पासून सेवानिवृत्तीपर्यंत मराठवाडा कृषी विद्यापीठात कामकाज पाहिले. अशा प्रकारच्या संशोधनात्मक कार्यामुळे त्यांना नवीन तंत्रज्ञान पद्धतीच्या शिक्षणासाठी व मार्गदर्शनाठी अनेकवेळा परदेश दौरा करावा लागला. त्यांनी १९७१मध्ये रशियामध्ये जाऊन तेथील कापूस संशोधन संस्थांमध्ये कापसाची प्रत, उतारा, लांब धागा इ.बाबत अभ्यास केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी ताश्कंद, उजबेकीस्तान या शहरांनाही भेटी दिल्या.
त्यांना १९८३मध्ये व्हिएतनाममध्ये हवामानातील बदलाचा कापूस उत्पादनावर होणारा परिणाम या विषयावरील परिसंवादासाठी विशेष मार्गदर्शक म्हणून आमंंत्रित केले होते. तसेच ते १९८५मध्ये इजिप्त व इंडोनेशिया, १९८७ व १९८८मध्ये बांगलादेश व रोम, १९९१ व १९९२ या काळात नायजेरिया या ठिकाणी जाऊन आले. डॉ. भाले यांचे आत्तापर्यंत १५०च्या वर संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी २५ विविध समित्यांवर सदस्य, कार्याध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य अशी पदेही भूषवली आहेत. त्यांच्यातील संशोधकवृत्ती, मार्गदर्शनाची उत्तम हातोटी या गुणांमुळे त्यांची डॉ.अमीर अली, डॉ.एस.एम.सिक्का, श्री.एन. गोपालकृष्णन आदी मान्यवरांकडून सतत प्रशंसा झाली.