Skip to main content
x

चाफेकर, माधव लक्ष्मण

        माधव लक्ष्मण चाफेकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील वेरणेश्वर या ठिकाणी झाला. वडील कुलाबा वेधशाळेत कारकून होते. १९०२ साली त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांचे प्राथमिक शिक्षण वेरणेश्वर व त्यानंतर पुढचे शिक्षण धुळे व पुणे येथे झाले. वयाच्या पंधराव्या वर्षी पुण्यातील विश्रामबाग वाड्यातील सरकारी शाळेतून ते मॅट्रिक झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी फर्गसन महाविद्यालयात इंटर सायन्सचे एक वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांची पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एक वर्षाच्या ‘मिस्त्री’ या प्रशिक्षणार्थी (अ‍ॅप्रेंटिस) अभ्यासक्रमासाठी निवड झाली. पुढे त्यांना तेथेच अभियांत्रिकी महाविद्यालयात  प्रवेश मिळाला आणि १९२२ साली बी.ई. सिव्हील ही पदवी मिळाली. ते परिक्षेत सर्वप्रथम आले आणि त्या वेळच्या नियमाप्रमाणे त्यांना भारतीय अभियांत्रिकी सेवा (इंडियन सर्व्हिस ऑफ इंजिनिअरिंग) या सेवेमध्ये थेट ‘सहायक कार्यकारी अभियंता’ या पदावर घेण्यात आले.

        १९२४ च्या सुमारास त्यांची पुण्यातील शनिवारवाड्याजवळील बांधकामावर नेमणूक झाली. नंतर निरा कालव्याच्या बांधकामावर त्यांना नेमण्यात आले. त्याकाळातील समाजापेक्षा चाफेकरांची विचारसरणी एका पावलाने पुढे होती. हुंडा घेणे प्रतिष्ठेचे अशी समाजात धारणा असली, तरी त्यांनी लग्नात हुंडा घेतला नाही. ब्रिटिश राजवटीत निरा कालव्यावर काम करीत असतानासुद्धा ते खादीचे कपडे वापरत असत. माळशिरस हे त्यांचे मुख्यालय होते. शासकीय सेवेत असतानाच त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीमधील मास्टर्स डीग्री (एम.सी.ई.) ही पदवी संपादन केली. १९३० च्या दरम्यान त्यांची सिंध येथे नेमणूक झाली.

        १९३५ साली सिंध प्रांत हा ‘मुंबई प्रेसिडेन्सी’ मधून वेगळा झाला. सिंध प्रांतातील मिरपूरखास या ठिकाणी कार्यकारी अभियंता म्हणून ते दोन वर्षे कार्यरत होते. १९३४ साली ते लारखानाला गेले व १९३७ मध्ये ते कराचीस उपसचिव (अधीक्षक अभियंता) म्हणून रुजू झाले.

      नंतर पाकिस्तानातील हैद्राबाद जवळील सिंधू नदीवर ‘ट्विन बॅरेज’ प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी पार पाडले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला व ते सप्टेंबर १९४७ मध्ये मुंबई राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागात रुजू झाले. फाळणीनंतर पाकिस्तान सरकारने हा प्रकल्प हाती घेऊन पूर्ण केला.

        एक वर्षाच्या कालावधीनंतर त्यांच्यावर मुख्य अभियंता म्हणून एका नावीन्यपूर्ण व गुंतागुंतीच्या कोयना या भुयारी जलविद्युत प्रकल्पाचा आराखडा बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. कोयना अवजल प्रकल्पाचा लेआउट हा त्यांचा या क्षेत्रातील प्रतिभेचा आविष्कारच घडवितो. याच प्रकल्पाच्या बांधकामासाठी त्यांनी पुढे मुख्य अभियंता या पदाचे कार्यालय मुंबईहून हलवून कोयनानगर या प्रकल्पस्थळी नेले.

        कोयना प्रकल्पावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर भारत सरकारने त्यांची मुंबई येथील भारतीय नौसेनेच्या डॉकयार्डच्या विस्तारासाठी अभियांत्रिकी प्रशासक (इंजिनिअरिंग अ‍ॅडमिनिस्ट्रेटर) म्हणून नेमणूक केली. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने भारतीय नाविक दलाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई येथे डॉकयार्ड व तदनुषंगिक सुविधांच्या निर्मितीचे बांधकाम क्षेत्रातील एक मोठे आव्हान हाती घेण्याचे ठरविले. या कामातील पाईल्सवर आधारित डेक फ्लोअरचे अवघड काम एका विदेशी कंपनीला दिलेले होते. त्यात गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होऊन १९५६ च्या दरम्यान ते थांबले.

       भारत सरकारने या रेंगाळलेल्या कामाला गती देण्यासाठी मुंबई राज्यातील बांधकाम खात्यातील एका निष्णात निवृत्त मुख्य अभियंत्याची सेवा घेण्याचा निर्णय घेतला आणि ओघानेच ती अवघड जबाबदारी स्वीकारण्याचा मान चाफेकर यांना मिळाला. चाफेकरांनी स्वत:च्या अभियांत्रिकी कौशल्याने आणि कल्पकतेने कामाला गती दिली. चाफेकरांनी दीड वर्षाच्या कालावधीनंतर राजीनामा दिल्यावर इंडियन नेव्हीने सदरील काम खात्यामार्फत (डिपार्टमेंटली एंगेज्ड लेबर - डी.इ.एल.) हाती घेऊन तडीस नेले. दुर्दैवाने नेव्हल डॉकयार्ड या क्षेत्रातील चाफेकरांची ही अलौकिक कामगिरी दुर्दैवाने पडद्याआड राहिली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ‘राज्य सिंचन आयोगा’वर चाफेकरांची शासनाने सन्माननीय सदस्य म्हणून नेमणूक केलेली होती. राज्याच्या सिंचन विकासाचा पाया याच आयोगाने रचला आहे. आयोगाने केलेल्या बहुतांशी शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या.

       चाफेकर पुण्यामध्ये आल्यानंतर सहा वर्षे पुणे म.न.पा. मध्ये नगरसेवक होते. तसेच एक निष्णात अभियंंता म्हणून अनेक वर्षे ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरअर्स’ या अभियांत्रिकी क्षेत्रातील ज्येष्ठ अशा संस्थेत त्यांनी सतत सक्रिय योगदान दिले. राज्य पातळीवर या संस्थेचे अध्यपदही त्यांनी भूषविले आहे. जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांना पाणी या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा देणारे चाफेकरच आहेत. चितळे यांनी पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९५५ साली पुणे विद्यापीठात अग्रक्रमाने बी.ई.(स्थापत्य) ही पदवी मिळवली. राज्याच्या (एम.पी.एस.सी.) व भारतीय संघराज्याच्या (यू.पी.एस.सी.) या दोन्ही स्पर्धा परीक्षांत उत्तीर्ण झाल्यावर चितळे यांच्यापुढे शासकीय सेवेचा कोणता पर्याय निवडावा याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले.  तेव्हा त्यांनी  चाफेकर यांना विचारले असता चाफेकरांनी त्यांना सल्ला दिला की, “आर्थिक लाभ, मर्यादित क्षेत्र या दृष्टीने केंद्र सरकारची नोकरी बरी वाटते; पण समाजाशी  निगडित अशा पायाभूत क्षेत्रात काम करण्यासाठी भविष्याचा वेध घेता, राज्य सरकारची ‘पाणी’ या क्षेत्रातील तुमची सेवा फार उजवी ठरेल.” डॉ. चितळे यांना हा सल्ला भावला आणि त्यांनी ‘पाणी’ या क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कामाच्या स्वरूपात आपणां सर्वांना याची प्रचिती आलेली आहे. चाफेकर हे प्रखर राष्ट्रीय वृत्तीचे होते. परदेशी सल्ले आपण गरजेपुरते वापरावेत पण भारतवासीयांना जे अनुकूल आहे, स्थानिक वैशिष्ट्याशी जे साधर्म्य ठेवणारे व काटकसरीचे आहे, त्याचाच स्वीकार करावयास पाहिजे, या विचाराचा ते आयुष्यभर पाठपुरावा करत राहिले.

        वैतरणा धरणाच्या धर्तीवर कोयना धरणपण पूर्णपणे काँक्रीटचे बांधावे, असा परदेशी सल्लागारांचा आग्रह असतानाही चाफेकरांनी यात बदल करून सहा ते आठ घनफूट आकाराचे मोठे दगड, जवळजवळ एक तृतीयांश जागा व्यापणार्‍या काँक्रीटमध्ये मूरवून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम शैलीचा आविष्कार घडविला. या रबल काँक्रीटमुळे खर्चात काटकसर झाली आणि काँक्रीट अधिक घन झाले. मुंबई महानगरपालिकेस जागतिक बँकेने भातसा हे धरण काँक्रीटमध्ये करावे असा सल्ला दिला. या प्रकल्पावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने काम करणाऱ्या डॉ. चितळे यांनी काँक्रीटऐवजी दगडी धरण करावे, या प्रकल्पात सिंचनाचाही अंतर्भाव करावा व धरणाच्या पायथ्याशी एक जलविद्युत्केंद्र उभे करावे असा आग्रह धरला होता. जागतिक बँकेच्या सल्लागारांना हे पटत नव्हते. डॉ. चितळे यांनी भातसा प्रकल्प स्थळी चाफेकरांना आणले व स्वत:चा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. चाफेकरांनी डॉ. चितळे यांच्या आग्रही भूमिकेस पूर्ण पाठिंबा दिला. आजच्या भातसा प्रकल्पाचा उगम चाफेकर आणि चितळे यांच्या दूरदृष्टीत आहे.

        राज्यामध्ये सिंचनाचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून सह्याद्रीतून उगम पावणार्‍या नद्यांवर रांगेने ठरावीक अंतरावर बंधारे बांधावेत आणि नदीच्या दोन्ही बाजूंना साधारणत: २५ ते ३० मी. उंचीपर्यंतचे क्षेत्र उपसा सिंचन पद्धतीने सिंचनाखाली आणण्याचा पाठपुरावा ते करत राहिले. या दृष्टीने त्यांनी उपसा सिंचनावर आधारित सिंचनाचा बृहत् आराखडा तयार केला होता असे समजते. काळाच्या ओघात तो मागे पडला.

        त्यांचा एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९५३ मध्ये बी.ई. (मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल) झाले व त्यांनी खाजगी क्षेत्रात सेवा केली.

- डॉ. दिनकर मोरे

चाफेकर, माधव लक्ष्मण