चव्हाण, पद्मा अण्णासाहेब
पद्मा अण्णासाहेब चव्हाण यांचा जन्म कोल्हापुरात झाला. सरदार घराण्यातील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण यांची ही कन्या. अभ्यासात त्यांची प्रगती झाली नाही. जेमतेम प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पद्मा यांनी शाळेला रामराम ठोकला आणि चित्रपटात कारकिर्द घडवायची, असं मनोमन ठरवून टाकलं. कोल्हापुरात चित्रपटनिर्मिती होतच होती. १९५९ साली भालजी पेंढारकर यांच्या ‘आकाशगंगा’ या चित्रपटात पद्मा यांना भूमिका मिळाली.
पद्मा चव्हाण यांच्या भूमिका असलेले ‘अवघाची संसार’ (१९६०), ‘एक दोन तीन’, ‘आराम हराम आहे’ (१९७६), ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ (१९७८) हे चित्रपट लोकप्रिय झाले. पद्मा चव्हाण यांच्या या भूमिका आठवताना प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात येते की, नागरी-शहरी रूपात त्या जशा शोभतात, तशाच ग्रामीण स्वरूपातही. या दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी सहजपणे साकारल्या आहेत. ‘या सुखांनो या’ (१९७५) आणि ‘आराम हराम आहे’ (१९७६) या चित्रपटातील भूमिकांबद्दल पद्मा चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारही मिळाले.
मराठीत घौडदौड चालू असताना पद्मा यांनी हिंदीतही काही लक्षणीय भूमिका केल्या आहेत. अनेक वेळा त्या नकारात्मक, खलनायकी भूमिका होत्या. ‘आदमी’, ‘बिन बादल बरसात’, ‘कश्मीर की कली’ या चित्रपटांमधून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांसोबत काम केलं.
‘लग्नाची बेडी’बरोबर काही नाटकेदेखील त्यांच्याकडे चालून आली. ‘माझी बायको माझी मेहुणी!’ ‘गुंतता हृदय हे’ या नाटकातील त्यांच्या भूमिकाही खूप गाजल्या. ‘लाखात अशी देखणी’ या नाटकातील त्यांच्या अभिनयामुळे आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘महाराष्ट्राची मर्लिन मन्रो’ व ‘सौंदर्याचा अॅटम बॉम्ब’ हे किताब दिले होते. या सगळ्या अभिनय कारकिर्दीच्या घौडदौडीतच दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्याशी त्यांची गाठ पडली. त्या दोघांच्या परस्पर प्रेमाची अखेर विवाहात परिणती झाली.
पद्मा चव्हाण यांनी ‘आकाशगंगा’ (१९५९), ‘अवघाची संसार’ (१९६०), ‘संगत जडली तुझी न माझी’ (१९६०), ‘झाला महार पंढरीनाथ’ (१९७०), ‘लाखात अशी देखणी’ (१९७१), ‘अनोळखी’ (१९७३), ‘ज्योतिबाचा नवस’ (१९७५), ‘या सुखांनो या’ (१९७५), ‘आराम हराम आहे’ (१९७६), ‘तूच माझी राणी’ (१९७६), ‘देवघर’ (१९८१), ‘गुपचूप गुपचूप’ (१९८३), ‘घायाळ’ (१९९३), ‘पोरका’ (१९९३) या चित्रपटांत साकारलेल्या भूमिकाही महत्त्वपूर्ण होत्या.
विवाहानंतर पद्मा चव्हाण यांनी काही चरित्रभूमिका केल्या. ‘अष्टविनायक’ (१९७९), ‘सासू वरचढ जावई’ (१९८३), ‘घायाळ’ (१९९३), ‘पोरका’ (१९९३) हे त्यांचे काही चित्रपटही यशस्वी ठरले.
एका दुर्दैवी मोटार अपघातात पद्मा चव्हाण या अभिनेत्रीचा अंत झाला.