Skip to main content
x

दाते, रामचंद्र सदाशिव

दाते, रामूभैया

रामचंद्र सदाशिव दाते (रामूभैया) यांचा जन्म मध्य प्रदेशातील दमोह जवळील कृष्णगंज ह्या गावात झाला. त्यांचे आजोबा कृष्ण सदाशिव दाते हे इंदूर संस्थानात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. रामूभैयांचे वडील सदाशिव कृष्ण दाते हे गांधीवादी विचारांचे होते.
रामूभैयांचे शालेय शिक्षण इंदूर येथे झाले. इंदूरच्या सिटी हायस्कूलमधून ते मॅट्रिकची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. इंदूरच्या होळकर महाविद्यालयामधून त्यांनी शिक्षण घेतले व अलाहाबादला जाऊन कला शाखेची पदवी मिळवली, तसेच महाराजा शिवाजीराव पदकही प्राप्त केले. त्यापुढे ते कायद्याच्या अभ्यासासाठी पुण्याला गेले. पुण्याला जाण्यामागे बालगंधर्वांची नाटके पाहायला मिळावीत हाही सुप्त हेतू होता. ह्या काळातच त्यांचे गाण्याचे प्रेम बहरत गेले.
कायद्याचा अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांनी काही दिवस अमरावतीला निष्णात वकील रावसाहेब खरे यांच्याकडे उमेदवारी केली. त्यांचे १९२७ साली
   धामणगाव येथील मालगुजार जोशींची कन्या माणिक हिच्याशी लग्न झाले. ते इंदूर संस्थानाच्या नोकरीत रुजू झाले. सनावद, हातोद, मानपूर या तहसीलदारांच्या जागी न्यायाधीशाचे काम केल्यानंतर इंदूरला ग्रेन कंट्रोल अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांना  कामगार आयुक्त, शाजापूर व राजगढ येथे जिल्हाधिकारी अशा बढत्या मिळाल्या. ते १९५७ मध्ये आय.ए.एस. अधिकारी झाले. त्यानंतर मध्य भारताच्या औद्योगिक कोर्टाचे न्यायाधीशपद भूषवून १९६० साली ते निवृत्त झाले.
रामूभैया दाते हे संपूर्ण महाराष्ट्राला रसिकाग्रणी म्हणून परिचित आहेत. ते स्वत: गायक अथवा वादक नसूनही त्यांनी त्यांच्या कलेवरील, विशेषत: संगीतावरील आत्यंतिक प्रेमामुळे व रसिकतेने दाद देण्याच्या वृत्तीमुळे अनेक थोर कलाकारांच्या मनांत मानाचे, श्रद्धेचे स्थान मिळवले. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक कलाकारांना भरभरून दाद देऊन प्रोत्साहित केले.
संगीताच्या क्षेत्रात बेगम अख्तर व कुमार गंधर्व ही त्यांची दैवते होती. त्यांच्या संगीतावर रामूभैयांनी अतोनात प्रेम केले. कुमार गंधर्वांना क्षयरोगाने ग्रसल्यावर त्यांना देवासला आणून उपचार करण्यात रामूभैयांचा मोलाचा वाटा आहे. बालगंधर्व, विंदा करंदीकर, श्री.ना. पेंडसे, भीमसेन जोशी, पु.ल. देशपांडे, किशोरी आमोणकर, लता मंगेशकर व इतर अनेक मोठमोठ्या कलावंतांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.
पु.ल. देशपांडे यांनी आपल्या ‘गणगोत’ ह्या पुस्तकाद्वारे रामूभैयांवर लेख लिहून त्यांच्या रसिकवृत्तीचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय करून दिला. तसेच, आपल्या ‘तुझे आहे तुजपाशी’ ह्या नाटकात रामूभैयांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारलेले काकाजींचे पात्र रंगवून त्यांच्या लोभस व्यक्तित्वाचे व जीवन समरसून जगण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवले.
रामूभैयांच्या व्यक्तित्वाला रसिकवृत्तीखेरीज अनेक वैशिष्ट्यपूर्ण पैलू होते. ते अत्यंत बुद्धिमान कायदेतज्ज्ञ होते. मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. उदार वृत्ती, दुसऱ्यांना मदत करण्याची कळकळ त्यांच्या रोमारोमांत भिनली होती. विनोदी, मिस्कील वृत्तीची त्यांना उपजतच देणगी होती. गझल या काव्यगायन प्रकाराची त्यांना अत्यंत आवड होती. मित्रमंडळींच्या बैठकीत अनेक मनोरंजक किस्से खुलवून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. त्यांचा आवाज किंचित बसका असला तरी आपल्याला आवडलेली गझल अथवा गीत, पेटीच्या सुरावटीवर ऐकवण्याची त्यांना हौस होती. कोणतेही संगीत शिक्षण न घेताही त्यांना तालासुराचे उत्तम ज्ञान होते.
निवृत्तीनंतर १९६१ साली रामूभैयांनी मुंबईत स्थलांतर केले. मुंबईत ते काही काळ औद्योगिक कोर्टात वकिली करीत असत. इंदूरच्या सार्वजनिक जीवनातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ते १९४४-४५ साली इंदूरच्या मराठी नाट्य शताब्दी महोत्सवाचे कार्याध्यक्ष होते, तसेच १९५१ साली मध्य भारत मराठी साहित्य संमेलन व शारदोत्सव यांचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. ‘रामूभैया दाते
एक आनंदप्रवाह’ हे त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे पुस्तक २००५ साली त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने प्रकाशित झाले. रामूभैयांचे ज्येष्ठ पुत्र, गायक अरुण दाते यांच्या आत्मचरित्रातही रामूभैयांच्या अनेक आठवणी नमूद केलेल्या आहेत.

ज्योती दाते

 

दाते, रामचंद्र सदाशिव