Skip to main content
x

देशपांडे, अजितकुमार नागेश

            जितकुमार नागेश देशपांडे यांचा जन्म सोलापूरमध्ये  एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यांनी कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी व म.फु.कृ.वि. मधून मृदाशास्त्रात एम.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम वर्गात प्राप्त केली. १९७७मध्ये संशोधन साहाय्यक म्हणून म.फु.कृ.वि.मध्ये नोकरीस प्रारंभ करून ते कृषि-रसायनशास्त्र व मृदाशास्त्र विभागातील प्रमुख या सर्वोच्च स्थानापर्यंत आपल्या गुणवत्तेवर चढले. त्यापैकी कोरडवाहू संशोधन केंद्र, सोलापूर येथे मृदाशास्त्रज्ञ म्हणून २३ वर्षे केलेले संशोधन विशेष महत्त्वाचे ठरले.

            जमिनीच्या खोलीनुसार व चिकणमातीच्या प्रमाणानुसार म्हणजेच पावसाच्या पाण्याच्या जमिनीतील साठ्यानुसार वेगवेगळ्या रब्बी ज्वारीच्या वाणांची शिफारस करावी, हे त्यांचे संशोधन महाराष्ट्रातच नाही, तर अ.भा. कोरडवाहू संशोधन प्रकल्पातही गाजले. १९९८मध्ये पूर्ण केलेल्या त्यांच्या पीएच.डी.संशोधनाचे ते फलित आहे. राष्ट्रीय पातळीवर या शिफारशीचा अवलंब झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर विकास कार्यक्रमात सीना नदीच्या खोर्‍यातील वडाळा व दारफळ या गावांत शेततळी, विहीर पुनर्भरण, सिमेंट बंधारा, वनराई बंधारे, तुटक समतल चर आणि शोषखड्डेसहित ढाळीचे बांध या मृदा-जल संधारण कामामुळे वाहून जाणारे २० ते ३०% पावसाचे पाणी वाचले. या कामासाठी दिल्लीच्या अ.भा. कृषिशास्त्र अकादमीचा प्रथम पुरस्कार त्यांना मिळाला.

            आसवणीतील सांडपाण्यातून जैविक पद्धतीने मिथेन काढून उरलेले द्रव्य शेतीसाठी खत म्हणून वापरण्याचा प्रकल्प त्यांनी राबवला व पर्यावरणाची हानी न होता परिसरातील शेतकऱ्यांचा एका वर्षात एक कोटी रुपयाचा फायदा झाला. हे काम आठ साखर कारखान्यांनी केले व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने या कामाची स्तुती केली आहे. सोलापूर येथील केंद्रात केलेल्या शेततळ्याच्या अभ्यासाच्या आधारावर प्रभावित होऊन महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्रात शेततळी बांधण्याचा निर्णय २००२ साली घेतला. या आदेशाद्वारे २००८ अखेर ५९,७३७ शेततळी खोदली. महाराष्ट्रासाठी १,२०,५०० शेततळी खोदण्याचे उद्दिष्ट ठेवले होतेे. डॉ.देशपांडे यांनी ९ पदव्युत्तर व २ पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांचे संशोधनावर आधारित ३५ शास्त्रीय लेख, ८७ परिसंवादात सादर केलेले लेख, ६ विशेष अहवाल, १४ पुस्तिका व बरेच मराठी व अन्य लिखाण प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यांनी सादर केलेल्या ५६ शिफारशी महाराष्ट्र कृषी विद्यापीठांच्या संयुक्त संशोधन समितीने मंजूर केल्या आहेत व त्या महाराष्ट्रभर शेतकऱ्यांकडून राबवल्या जात आहेत व फायदा देत आहेत. विशेषत: रब्बी ज्वारीवरील त्यांची ‘वरंबे व सर्‍या’ची शिफारस ५०%पेक्षा जास्त शेतकरी अवलंबतात. कारण त्यामुळे अधिक पाणी जमिनीत साठते व ज्वारीचे उत्पन्न वाढते.

            महाराष्ट्र शासनाच्या अनेक धोरण ठरवणाऱ्या समित्यांवर त्यांची सभासद म्हणून नियुक्ती झाली आहे. कृषी माहिती प्रसारण व विस्तार कार्यासाठी कै.यमुनाबाई सावंत स्मृती पुरस्कार, कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार २००९-१०, वसंतराव नाईक कृषी पुरस्कार - २०१०, कृषिरत्न अण्णासाहेब शिंदे उत्कृष्ट शेती संशोधन पुरस्कार २०११ इ. पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

- संपादित

देशपांडे, अजितकुमार नागेश