Skip to main content
x

गुळवणी, वामनराव दत्तंभट

गुळवणी महाराज

    भारतीय शक्तिपात विद्येचे दीक्षाधारक व थोर दत्तभक्त टेंब्येस्वामींचे शिष्य म्हणून विख्यात असलेले योगीराज वामनराव दत्तंभट गुळवणी यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुडुत्री येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी होते. तारळे येथे वामनरावांचे प्राथमिक शिक्षण झाले. पंडित आत्मारामशास्त्री पित्रे यांच्याकडे त्यांचे संस्कृत ग्रंथाचे पारंपरिक पद्धतीने शिक्षण झाले. त्यांना चित्रकलेची निसर्गदत्त उपजत देणगी लाभलेली होती. ड्रॉइंगच्या परीक्षा उत्तीर्ण करून मुंबईतील सुप्रसिद्ध अशा जे.जे. स्कूल ऑफ आटर्समध्ये त्यांनी प्रवेश मिळविलेला होता. १९१७ ते १९२६ अशी दहा वर्षे त्यांनी बार्शीच्या नगरपालिकेच्या शाळेत ड्रॉइंग शिक्षकाची नोकरी केली. त्यानंतर १९२७ ते १९४२ दरम्यान त्यांना पुण्यातील नूमवि या प्रसिद्ध प्रशालेत कलाशिक्षक म्हणून नोकरी करण्याची संधी मिळाली. हा झाला त्यांचा लौकिक जीवन प्रवास.

     थोर दत्तभक्त वासुदेवानंद टेंब्ये यांच्याशी १९०७ साली, नरसोबाची वाडी येथे वामनराव गुळवणी यांचा प्रथम परिचय झाला. ‘वाडीला टेंब्येस्वामींचे वास्तव्य असून तू दत्ताचे एक सुंदर चित्र काढ व मी पाठविलेला श्लोक हार स्वरूपात दत्ताच्या गळ्यात घालून ते चित्र घेऊन महाराजांच्या दर्शनास ये,’ असा वामनरावांना त्यांच्या मोठ्या बंधूंचा वाडीहून निरोप आला, आणि या निरोपानुसार वामनराव कोल्हापूरहून दत्ताचे चित्र घेऊन वाडीला गेले. महाराजांना चित्र अर्पण करून वामनरावांनी साष्टांग नमस्कार केला. चित्र पाहून महाराज अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी प्रसाद म्हणून दंडाला बांधण्यास एक पेटी वामनराव यांना दिली. गुरु-शिष्यांची ही पहिली भेट.

     या दरम्यान वामनरावांना प्लेगच्या साथीच्या रोगाने गाठले. अशा आजारी अवस्थेतही त्यांनी गुरुचरित्र पारायणे केली. प्लेगची गाठ फुटून ते पुढे खडखडीत बरे झाले. दत्तप्रभूंवरची त्यांची भक्ती अधिक दृढ झाली व वाडीला राहून त्यांनी आणखी पारायणे केली. उपासनेच्या, पारायणाच्या रंगात ते पार देहभान हरवून गेले. वामनराव १९०९ साली पितृछायेला पारखे झाले. त्या वेळी टेंब्येस्वामींचे चातुर्मास्य अनुष्ठान पवनी येथे होते. वामनराव आपल्या आईस घेऊन स्वामींच्या दर्शनास गेले. अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर स्वामींनी वामनरावांना अनुग्रह दिला.

     मन दत्तभक्तीने रंगले होते तरी लौकिक जीवनाच्या दैनंदिन गरजा भागविण्यास नोकरी करण्याची गरज होती. बरेच प्रयत्न करूनही कोठे नोकरी मिळाली नाही. दरम्यान, चातुर्मास्य अनुष्ठानासाठी टेंब्येस्वामी कर्नाटकातील हवनूर येथे येणार असल्याचे त्यांना समजले व वामनराव हवनूरला गुरुसेवेत दाखल झाले. गाणगापूर येथील पारायण समाप्त करून वामनराव गुरुभेटीच्या ओढीने पायीच निघाले. गाणगापूर-विजापूर-धारवाड करून ते हवनूरला आले. तेथे त्यांची गुरुभेट झाली. इथे स्वामींनी त्यांना ‘भगवद्गीता’, ‘विष्णुसहस्रनाम’ यांची संथा दिली व आसन, प्राणायाम, जपध्यान यांविषयी सूक्ष्म मार्गदर्शन केले. गुळवणी महाराजांनी १९१२ साली औदुंबर येथे दत्तमाला मंत्राचे पुरश्चरण केले.

     टेंब्येस्वामींची म्हणजे गुरुभेटीची आठवण होताच गुरू जेथे असतील त्या गावी वामनराव शोध घेत घेत पोहोचत असत. स्वामींचा मुक्काम गुजरातमधील नर्मदा नदीकाठच्या गरुडेश्वर येथे असताना गुरूंकडून वामनरावांना ब्रह्मसूत्रे, दत्तोपनिषदे समजून घेण्याचा योग लाभला. त्यांना योगविद्येचीही सूक्ष्म साधना गुरुसान्निध्यात करता आली. गुरूंच्या आज्ञेवरून वामनरावांनी एकमुखी दत्ताचे भव्य चित्र काढले. हे चित्र चितारताना वामनरावांना भगवान दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले. गुरू टेंब्येस्वामी यांनी १९१४ साली समाधी घेतली. त्यानंतर ते एकदा वामनरावांच्या स्वप्नात आले व होशिंगाबादच्या श्री लोकनाथतीर्थ यांच्याकडे जाण्याचा संकेत त्यांनी केला. लोकनाथतीर्थ यांनी वामनरावांना शक्तिपात दीक्षा दिली.

     वामनराव ‘योगिराज गुळवणी महाराज’ म्हणून विख्यात झाले. गुळवणी महाराजांनी शक्तिपाताने अनुग्रह दिलेल्या दत्तभक्तांची संख्या खूप मोठी आहे. टेंब्येस्वामींच्या स्मरणार्थ पुण्यात ‘वासुदेव निवास’ ही वास्तू उभी करून तेथे गुरूंच्या पादुका स्थापन करण्याचे कार्य गुळवणी महाराजांनी केले. गुरूंचे समग्र वाङ्मय त्यांनी बारा खंडांत प्रकाशित केले. पुण्यातील त्यांच्या भक्तांनी गुळवणी महाराजांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा साजरा केला व ‘योगचूडामणी’ पदवी देऊन गौरव केला. पुढे त्यांनी आपला देह दत्तचरणी अर्पण केला व त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य दत्त महाराज कवीश्वर उत्तराधिकारी झाले.

     —  विद्याधर ताठे

गुळवणी, वामनराव दत्तंभट