अळतेकर, माधव दामोदर
अळतेकरांचे घराणे जुन्या कोल्हापूर संस्थानातील अळते गावचे. त्यांचा जन्म कोल्हापुरात तसेच शिक्षण कोल्हापुरात आणि पुण्यात, आणि नोकरी मुंबईत झाली. अर्थशास्त्र व इतिहास हे विषय घेऊन १९१७ साली ते मुंबई येथे एम.ए. झाले. राजाराम हायस्कूलमध्ये असल्यापासूनच त्यांना मराठीत लिहायची आवड होती. कोल्हापूरच्या ‘समर्थ’ साप्ताहिकात इंग्रजी तिसरीत असतानाच अळतेकरांचे ‘भारतीय विद्यार्थी’ या विषयावरील चार-पाच लेख प्रसिद्ध झाले होते. वक्तृत्व स्पर्धेत त्यांना अनेक बक्षिसे मिळाली होती. बी.ए.ला असतानाच त्यांचे तीन-चार इंग्रजी लेख प्रसिद्ध झाले होते, आणि याच सुमारास ‘उद्यान’ मासिकात ‘अपराध कोणाचा’ ही एक लहानशी कादंबरीही प्रसिद्ध झाली होती.
अळतेकरांच्या वक्तृत्वाप्रमाणेच त्यांची भाषाशैली ठसकेबाज, ओघवती व ऐटदार होती. स्वभाव विलक्षण आग्रही, आक्रमक होता. त्यांचे भाषण आणि लेखन कितीही जहाल असले आणि तिखट असले, तरी त्यांचा स्वभाव विधायक सनदशीर होता. स्वभाव निरपेक्ष, निर्लोभी आणि निर्व्यसनी होता. प्रवासाप्रमाणेच लेखन, वाचन, भाषण, संभाषण आणि भोजन या त्यांच्या अत्यंत प्रिय गोष्टी होत्या. गप्पा मारणे आणि गप्पा ऐकणे हा आवडता उद्योग होता.
१९१५ मध्ये बी.ए. झाल्यावर अळतेकर ‘इंदुप्रकाश’चे संस्थापक म्हणून काम करू लागले. तसेच काही महिने चंदारामजी गर्ल्स हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाचेही काम केले. अशा प्रकारे शाळेचे काम कधीकधी तर इंदुप्रकाशचे काम नित्याचे, असे चालले होते. काही काळ त्यांनी पुण्याच्या ‘ज्ञानप्रकाश’ या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम केले. ‘न्यू रिव्ह्यू’ नावाचे मासिकही त्यांनी काही काळ चालवले. अलाहाबादच्या ‘लीडर’ पत्राचे ते मुंबईतील वार्ताहर होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘कॅपिटल’ इत्यादी वृत्तपत्रांत ते इंग्रजीतून लेखन करीत असत. पुढे काही वर्षे ते ‘टेक्सटाइल जर्नल’ या अर्थशास्त्रविषयक मासिकाचे उपसंपादक होते. लेखक आणि वृत्तपत्रकार म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला होता. १९१३ साली ‘विद्याहरण’ या खाडिलकरांच्या नाटकावर ‘ज्ञानप्रकाश’मधून तीन लेख लिहून कडाडून टीका केली आणि एकदम ते प्रकाशात आले. नंतर मात्र १९२४-१९५१पर्यंत ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत राहिल्याने त्यांच्या आयुष्याला स्थैर्य आले. १९३० मध्ये अळतेकरांनी ‘गोपाळ गणेश आगरकर- चरित्रात्मक निबंध’ हे आगरकरांचे विस्तृत चरित्र लिहिले. याशिवाय आगरकरांच्या पूर्व प्रकाशित दुर्मीळ लेखसंग्रहाचे ‘संपूर्ण आगरकर’- भाग १, २, ३ (१९३७-१९४०) असे पुनर्मुद्रण अळतेकरांच्या संपादकत्वाखाली झाले आहेत.
अळतेकरांनी ‘अपराध कोणाचा’ (१९१५), ‘शांताराम’ (१९१९), ‘मुक्तबंध’ (१९२६), ‘अंतरंग’ (१९४३) इत्यादी कादंबर्या लिहिल्या. याशिवाय ‘नवे मानसशास्त्र व नवी नीती’ (१९३६) ‘कालिदासाची सृष्टी’ (१९३७), ‘पाने व फुले’ भाग १, २ (१९३८-१९३९), निबंध, कथा, कविता इत्यादी पुस्तके लिहिली. ‘उलटलेली पाने’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.‘कालिदासाची सृष्टी’ या ग्रंथाला डेक्कन व्हर्न्याकुलर ट्रान्सलेशन सोसायटीचे बक्षीस मिळाले आहे. विलेपार्ले, मुंबई येथे राहत असताना अळतेकरांनी बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली, १९२९ मध्ये उपनगर साहित्य संमेलन भरवले होते. हीच मुंबई उपनगर साहित्य संमेलनाच्या प्रथेची सुरुवात म्हणता येईल. मुंबई शहरावर त्यांचे विलक्षण प्रेम होते.
अळतेकरांच्या मृत्यूनंतर मुंबई महानगरपालिकेने या कर्तृत्ववान आणि एकनिष्ठ नागरिकाविषयी केलेला गौरवाचा ठराव म्हणजे त्यांनी जन्मभर केलेल्या निर्व्याज प्रेमाची मिळालेली कायदेशीर पावतीच होय. २०व्या शतकाच्या पूर्वार्धातील वैचारिक वाङ्मयीन घडणीच्या प्रक्रियेतील एक क्रियाशील घटक म्हणून माधवराव अळतेकरांचे नाव घ्यावे लागेल.