आपटे, प्रदीप विनायक
प्रदीप विनायक आपटे यांचा जन्म मुंबई येथे झाला. दि. २९ ऑक्टोबर १९६६ रोजी त्यांना पहिले कमिशन मिळाले. १९७१ च्या पाकिस्तान युद्धामध्ये प्रदीप आपटे लढाऊ बॉम्बर स्क्कॉड्रनमध्ये होते. त्यांच्यावर शत्रूच्या अंतर्गत रचनेवर टेहळणी करणाऱ्या विमानाची जबाबदारी होती.
दि. ४ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना नया चोर, उमरकोट, धोरनारो या टापूत धोरनारो रेल्वे स्थानकाकडे शत्रूच्या वाहनांचा ताफा जाताना दिसला. त्यांनी त्वरित त्या ताफ्यावर थेट हल्ला चढवला. पुढील मोहिमेत त्यांना धोरनारो रेल्वे स्थानकाकडे येणारी मालगाडी दिसली. त्यांनी त्या मालगाडीवर हल्ला चढविला. शत्रूकडून जमिनीवरून प्रखर प्रतिकार होत असतानादेखील, त्यांनी मालगाडीच्या अनेक वाघिणींचा विध्वंस केला.
तिसऱ्या वेळी परतत असताना जमिनीवरून होणाऱ्या प्रतिहल्ल्यात शत्रूने त्यांच्या विमानाचा वेध घेतला. आपल्या क्षतिग्रस्त विमानावर नियंत्रण राखून त्यांनी तेथून १६० कि.मी. अंतरावर असलेल्या तळाकडे कूच केले. अशक्यप्राय परिस्थितीमध्ये त्यांनी विमानातून पॅराशुटच्यासहाय्याने उडी मारली. परंतु त्यांना मृत्यू आला. त्यांच्या पराक्रमासाठी त्यांना मरणोत्तर वीरचक्राने सन्मानित करण्यात आले.
-संपादित