Skip to main content
x

भाटवडेकर, हरिश्चंद्र सखाराम

सावेदादा

सावेदादा हे पालघर तालुक्यात जन्मले होते आणि मुंबईला केनेडी ब्रिज येथे त्यांचा स्वत:चा स्टुडिओ होता. वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्या वेळी आपल्याकडे परदेशातून कॅमेरा आयात करावा लागत असे व त्याचबरोबर कॅमेऱ्याची आणि छायाचित्रणाला लागणाऱ्या सामग्रीची माहिती देणाऱ्या पुस्तिका (कॅटलॉग) सहज उपलब्ध असत.

१८९६ साली फ्रान्सच्या ल्युमिएर बंधूंनी आपले काही लघुपट मुंबईत दाखवले. ते लघुपट पाहून सावेदादांना या अद्भुत कलामाध्यमाविषयी प्रचंड कुतूहल वाटले. त्याच वर्षी सावेदादांनी प्रोजेक्टर विकत  घेतला. त्या प्रोजेक्टरबरोबर कॅन कॅन डान्स’, ‘बेरज्यांसारखे लघुपट त्यांना मोफत मिळाले. सावेदादांनी मुंबईतील श्रीमंत मंडळींना हे चित्रपट दाखवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रॅली ब्रदर्सचा कॅमेरा विकत घेतला आणि स्वत:च लघुपट चित्रित करायला सुरुवात केली. पहिल्या लघुपटात त्यांनी पुंडलीकदादा आणि कृष्णा न्हावी यांच्यातील कुस्तीचा सामना चित्रित केला आणि बॉम्बे जिमखान्याजवळ असणाऱ्या कापाच्या मैदानात (आताच्या आझाद मैदानात) दाखवण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या या उपक्रमाला प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली.

सावेदादांनी १८९९ मध्ये मुंबईतील गेईटी (आताचे कॅपिटल) थिएटर भाड्याने घेतले आणि इतर परदेशी चित्रपटांबरोबर आपला लघुपटही ते दाखवू लागले. सावेदादांनी पुढे डोंबारीआणि माकडांचा खेळ’, ‘आतश बेहरामया प्रिन्सेस स्ट्रीटवरील पारशी लोकांच्या धर्मस्थानाच्या दुरुस्तीचे काम चालू असताना त्याचे चित्रीकरण करून गेईटी थिएटरमधून  दाखवले.

१९०१ मध्ये रँगलर परांजपे मुंबईत परत आले तेव्हा पेडर रोडवरच्या गोकुळदास सभागृहामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. सावेदादांनी त्या सत्काराचे चित्रीकरण केले. हा आपल्याकडील पहिला वार्तापट.

सावेदादांच्या उपक्रमावर खूश होऊन त्या वेळचे ब्रिटिश न्यायाधीश जॉन मूर हे त्यांना घेऊन मद्रासला गेले आणि मद्रासला सावेदादांचे लघुपट दाखवले. सावेदादांची कीर्ती ऐकून १९०३ मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी दिल्ली दरबाराचा सोहळा चित्रित करण्यासाठी आमंत्रण दिले. पुढे सावेदादांनी ल्युमिएर कंपनीचा आधुनिक बायोस्कोपिक कॅमेरा विकत घेतला. हाच भारतातील सर्वात जुना कॅमेरा होय.

१९०३ साली कलकत्त्याला भरलेल्या किंग एडवर्ड सातवा बादशहा यांच्या दरबाराचा भाग चित्रित केला. १९०३ सालातच त्यांचे धाकटे भाऊ रामकृष्ण यांचे निधन झाले. रामकृष्ण हे सावेदादांना चित्रीकरणासाठी सर्व प्रकारची मदत करीत असत. त्यांच्या मृत्यूच्या धक्क्याने सावेदादा यांनी आपली चित्रनिर्मिती बंद केली. आपला कॅमेराही त्यांनी करंदीकर, दिवेकर, पालकर यांना विकला.

- द.भा. सामंत

भाटवडेकर, हरिश्चंद्र सखाराम