गहूकर, रुपराव तुळशीराम
रुपराव तुळशीराम गहूकर यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात मोहपा या गावी झाला. गहुकरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोहपा येथेच पार पडले. त्यांनी नागपूरच्या कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. व एम.एस्सी. या पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर भारत सरकारतर्फे गहूकर यांना फ्रान्समध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. १९७६मध्ये त्यांना पॅरिस विद्यापीठाची डी.एस.सी. (पीएच.डी.) ही पदवी मिळाली.
डॉ.गहूकर यांनी वर्धा येथील महाराष्ट्र राज्य कृषी खाते येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून काम केले. नंतर हैदराबादच्या इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेत वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ म्हणून काम केले. यानंतरची १५ वर्षे डॉ.गहूकर यांनी इटाली येथील रोममध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अन्न व कृषी परिषदेत प्रथम कीटकशास्त्रज्ञ व नंतर वरिष्ठ तांत्रिक सल्लागार म्हणून काम केले. त्याप्रमाणे डॉ. गहूकर यांनी टान्झानियातील युरोविष्ठा, बाय क्रॉपसायन्स लिमिटेड, यावलकर पेस्टिसाइडस्, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॉन्फीडरेशन टेक्सटाइल ऑफ इंडियन इंडस्ट्री, गील अॅन्ड कंपनी अशा संस्थांमध्ये त्यांनी सल्लागाराची भूमिका केली. डॉ.गहूकर मागील चाळीस वर्षांपासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. शेतीच्या खर्चात बचत करणे, उत्पादनात वाढ करणे, रासायनिक कीटकनाशकांचा कमी वापर, पीक लागवडीसाठीचे तंत्रज्ञान या विविध बाबी त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. कृषीनिगडित सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या मदतीने ते शेतकऱ्यांना विनामूल्य तांत्रिक मार्गदर्शनही करतात. त्यांचे शेतीतील विशेष योगदान म्हणजे सेंद्रिय शेती, जैविक कीडनियंत्रण, वनस्पतीजन्य कीटकनाशके, अन्नसुरक्षा, मशागतीच्या पद्धतीतील बदल या संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके करून दाखवली व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार यशस्वीरीत्या करून दाखवला. डॉ.गहूकर यांचे तृणधान्य पिकांवरील खोडकिडा व कपाशीवरील रस शोषणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनाचे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांनी पूर्व आफ्रिकेतील टान्झानिया येथे एरंडी या तेलबिया पिकावरील बुरशीजन्य रोगाचे सर्वेक्षण प्रसिद्ध केले. एकात्मिक किडी व रोग व्यवस्थापन हा त्यांचा आवडता विषय, तर कडुनिंब हा आवडता वृक्ष.
डॉ. गहूकर सध्या अराग बायोटेक प्रा.लि. या कंपनीचे संचालक आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी शेतकऱ्यांसाठी सर रतन टाटा ट्रस्टतर्फे राबवत असलेल्या प्रकल्पाचे ते तांत्रिक सल्लागारही आहेत. मागील १५ वर्षांपासून ते नागपूर विद्यापीठात फ्रेंच भाषा शिकवत आहेत. अलीकडेच त्यांना अमेरिकेतील ‘बोर्ड सर्टिफाइड एन्टॉमॉलॉजिस्ट’ आणि ‘ब्रिटनमधील रॉयल एन्टॉमॉलॉजिकल सोसायटी फेलो’ इ. सन्मान मिळाले.
कृषी क्षेत्रातील त्यांच्या ज्ञानाचा इतरांनाही फायदा व्हावा, यासाठी त्यांनी आजपर्यंत नऊ पुस्तके, एकशेआठ संशोधन लेख आणि तीनशेहून अधिक लेख प्रसिद्ध केले आहेत. कृषी क्षेत्रातील त्यांच्या या कार्याचा आढावा घेऊन मराठी विज्ञान परिषद, वसंतराव नाईक कृषी संशोधन, ग्रामीण विकास ट्रस्ट, भारत कृषक समाज, इंडियन सायन्स रायटर्स असोसिएशन, अरविंदबाबू स्मृती प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांनी मानपदके, सन्मानपत्रके व पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान केला आहे.