Skip to main content
x

जांभळे, नारायण धोंडी

       नारायण जांभळे यांचा जन्म कोल्हापूर येथील खाटांगळे या लहानशा खेडेगावात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सांगरुळ या गावी झाले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९६६मध्ये जांभळे यांनी कोल्हापूर कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९७०मध्ये जांभळे यांना बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त झाली. त्यानंतर त्यांना कोकणातील मिठबाव हायस्कूलमध्ये नोकरीसाठी बोलावणे आले, परंतु जांभळे यांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होती. बी.एस्सी. पदवी प्रथम श्रेणीत मिळाल्यामुळे त्यांना सांगरुळ हायस्कूलची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या आधारावर त्यांनी पुढचे शिक्षण घ्यायचे निश्‍चित केले, परंतु विचारांती घरची परिस्थिती लक्षात घेऊन ते आपल्या गावी परतले व आपला प्रवेश रद्द केल्याचे घरी खोटे सांगितले. त्यांच्या आईवडिलांनी मात्र त्यांना पुन्हा शिक्षणासाठी पुण्याला पाठवले. तोपर्यंत त्यांचा प्रवेश खरोखरच रद्द केला होता. प्रयत्नांती त्यांना एम.एस्सी.साठी पुणे कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. याच काळात बी.एस्सी.च्या धर्तीवर कृषी अधिकारी पदासाठी त्यांची राहुरी येथे निवड झाली, परंतु त्यांना एम.एस्सी.ची सहावी तिमाही देता आली नाही. कालांतराने त्यांची राहुरीत भाजीपाला विभागात बदली झाली आणि त्यानंतर त्यांना एम.एस्सी.ची परीक्षा देता आली. पदवी मिळाल्यामुळे त्यांची परभणी कृषी महाविद्यालयात कृषी अधिकारी म्हणून निवड झाली. येथे त्यांनी भेंडीच्या वाणावर संशोधन केले. तेव्हा त्यांना असे आढळले की, भेंडीच्या एकूण ५२ वाणांपैकी दोन वाण सोडून सर्व वाण पानाच्या शिरा पिवळ्या करणाऱ्या विषाणूस बळी पडत होते. त्यातील दोन वाण पूर्णपणे निरोगी होते, पण ते वाण रानटी होते. तेव्हा जांभळे यांनी रोगप्रतिकारक भेंडी वाण तयार करण्याच्या उद्देशाने विषाणू प्रतिकारक रानटी वाणांचा तत्कालीन प्रसिद्ध ‘पुसा सावनी’ वाणाबरोबर संकर केला. या संकराची पहिली पिढी अभ्यासली. त्यात विषाणू प्रतिकारक गुण आढळला. या संकरामध्ये अधिक जोर होता, पण संकराची फळे काटेरी व बिनबियांची (वंध्य) होती. याच विषयात त्यांनी पीएच.डी. करण्याचे ठरवले आणि डॉ. वाय.एस. नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना १९८०मध्ये पीएच.डी.ची पदवी मिळवली. यानंतरही त्यांनी पी.बी.एन.५७ या भेंडीच्या वाणावर काम चालू ठेवले. हे बियाणे तयार करून त्यांनी परभणी, औरंगाबाद व अंबाजोगाई येथे चाचणी प्रयोग घेतले. यामध्ये पी.बी.एन.५७ हा वाण सरस ठरला व तो ‘परभणी क्रांती’ या नावाने प्रसारित केला. या संशोधनानंतर जांभळे यांची १९८५मध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून राहुरीत निवड झाली. याच दरम्यान त्यांची निफाड येथे गहू संशोधन केंद्रात नियुक्ती करण्यात आली. पुढे डॉ . बापट यांच्या आग्रहाने राहुरीत ऊतीसंवर्धन विभागात बदली झाली. त्यांना एक वर्ष बियाणे अधिकारी म्हणून काम करावे लागले. त्यापुढे त्यांनी ४ वर्षे वनशेती प्रकल्पात काम केले. या काळात डॉ. बापट यांच्या प्रेरणेने त्यांनी वनशेती, कुरण विकास इ. प्रकल्प यशस्वीपणे राबवले. सुधारित गवताची उत्पादकता ७/८ ट./हे. असल्याचे आढळले. सन १९८९-९०मध्ये डॉ. पेरुर यांच्या प्रेरणेनेे जांभळे यांना इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली. परत आल्यावर त्यांनी ऊतीसंवर्धनाची प्रयोगशाळा स्थापन करून निलगिरीचा दुप्पट वेगाने वाढणारा यशवंत वाण तयार केला. तसेच धन्वंतरी उद्यानही स्थापन केले.

       जांभळे यांनी आपल्या कार्यकाळात विभागप्रमुख, कुलसचिव, संचालक अशी विविध पदे भूषवली. त्यांनी एम.एस्सी. व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांचे जवळपास १०० संशोधनपर शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. वयाच्या ५८व्या वर्षी ते संशोधक संचालक या पदावरून सेवानिवृत्त झाले.  

- संपादित

जांभळे, नारायण धोंडी