Skip to main content
x

जोगळेकर, श्रीकृष्ण वासुदेव

     डॉ.श्रीकृष्ण वासुदेव जोगळेकर यांचा जन्म हेदवी येथे झाला. अगदी बालपणीच ते मातृसुखाला वंचित झाले. त्यांचे वडील नोकरीनिमित्त फिरतीवर असत. मग छोटा श्रीकृष्ण आपल्या काका-काकूंच्या घरी वाढू लागला. ‘हेदवी’सारख्या छोट्या गावात, निसर्गाच्या सान्निध्यात, गुरांच्या सहवासात आणि नदीकाठी हुंदडण्यात त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा गेला. वृक्षवेलींच्या सान्निध्याची आवड नंतर त्यांनी आयुष्यभर जोपासली.

     पाचवीनंतरच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना मुंबईत आणले. शालेय शिक्षण संपल्यावर त्यांनी विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेऊन इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण घेतले. त्या परीक्षेत चांगले यश मिळाल्यामुळे त्यानंतर डॉक्टर होण्यासाठी त्यांनी जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. ते उत्तम गुणांनी एम.बी.बी.एस. उत्तीर्ण झाले. पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण होणे ही गोष्ट तेव्हा अत्यंत कठीण होती. जोगळेकरांनी हे यश साध्य केले.

     त्यानंतर ते राजे एडवर्ड स्मारक (के.ई.एम.) रूग्णालयामध्ये नोकरी करू लागले. अत्यंत मन लावून व प्रचंड मेहनत घेऊन ते आपले काम करीत असत. त्याचा त्यांना फायदा झाला. ‘सीनियर कॅज्युअल्टी ऑफिसर’ ही वरची जागा त्यांना देण्यात आली. तसेच ‘न्याय वैद्यक’ (फॉरेन्सिक मेडिसीन) हा विषय विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. याच काळात त्यांनी प्रचंड जिद्दीने आणि मेहनतीने एम.एस.ची पदवी प्राप्त केली.

     ते १९४५-४६ साल होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शीव येथे बांधलेले, १५०० खाटांचे सैनिकी रुग्णालय आता ओस पडले होते. के.ई.एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.जी. धायगुडे यांना त्या रुग्णालयाचा जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी जोगळेकरांवर ही जबाबदारी सुपूर्द केली. त्यांच्यावर विश्वास टाकला. त्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या.

     जोगळेकरांनीही हा विश्वास सार्थ ठरवला. पोटच्या अपत्यांवर करावे, तसे प्रेम त्यांनी या रुग्णालयावर केले. ‘रुग्णालय व्यवस्थापना’चे तंत्र डॉक्टरांना जणू उपजतच अवगत होते. प्रत्येक रुग्णाला ते नावाने हाक मारीत. आपल्या कर्मचारीवर्गामध्ये त्यांनी भाषा वा धर्म यांवरून कधी भेदाभेद केला नाही. बाह्यरुग्ण विभागाबरोबरच क्ष-किरण विभाग, प्रयोगशाळा, नाक, कान, घसा, दंत, नेत्र, त्वचारोग यांचे विभाग सुरू झाले. या सर्व खात्यांसाठी तज्ज्ञ मिळेनात. मग या खात्यांसाठी प्रमुख म्हणून मानसेवी तज्ज्ञ नेमावेत, असे डॉ. जोगळेकरांनी सुचवले. ते मान्य झाले व सायन रुग्णालयाला सर्वोपचारी रुग्णालयाचे स्वरूप प्राप्त झाले.

     रुग्णालयाच्या इमारतींची रचना करताना त्यांनी बागेलाही मध्यवर्ती स्थान दिले. बगिचा मध्यवर्ती ठेवून सभोवती बांधकाम केल्यामुळे प्रत्येक वॉर्डामधल्या रुग्णाला वृक्षवेलींची साथ असे. प्रत्येक इमारतीला तळघर असावे हेही त्यांनी बघितले. त्यात रुग्णालयाला लागणाऱ्या सामानाचा साठा करता येतो. तसेच प्रार्थनाकक्षालाही जागा ठेवली होती. तेथे सर्व धर्मांना स्थान होते.

     दरम्यान के.ई.एम.मधील अधिष्ठात्याची जागा रिकामी झाली. जोगळेकरांनी अर्ज केला व खूप अभ्यास करून मुलाखत दिली. त्यांची नेमणूक त्या जागेवर झाली व जोगळेकर के.ई.एम.ला आले.

     १ जानेवारी १९५९ रोजी त्यांनी या पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या कार्यकाळात या रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलला. जोगळेकरांनी आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत अनेक स्तुत्य उपक्रम राबवले. ईश्वरावर त्यांची श्रद्धा असली, तरी ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ असे ते मानीत असत. तसेच ते शिस्तीचेही भोक्ते होते.

     त्यांनी रुग्णालयात उरो रोग व उरो शैल्य चिकित्सा या विभागाची स्थापना करून सामान्य माणसाला मोठा दिलासा दिला. तसेच अस्थिरोगाकरिता अस्थिरोगचिकित्सा केंद्राची स्थापना केली. शरीररचना व शरीरशास्र यांकरिता एक स्वतंत्र मजला उभा केला. मूत्रपिंडाचे रोग असणाऱ्या रुग्णांना दिलासा देणारा विभाग कार्यान्वित झाला. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर त्यांनी भव्य छत बांधले, ज्यामुळे येणाऱ्यांचे उन्हा-पावसापासून संरक्षण होऊ लागले. शिवाय त्याच्यावर त्वचारोग विभागाला संशोधनासाठी जागा उपलब्ध झाली.

     के.ई.एम.मध्ये त्या वेळी पूर्णवेळ प्राध्यापक नेमण्यास सुरुवात झाली. त्यांच्यात व आधीपासून कार्य करणाऱ्या मानद प्राध्यापकांत वितुष्ट निर्माण झाले. जोगळेकरांनी पूर्णवेळ प्राध्यापकांची पाठराखण केली. यातून त्यांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागले. प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरुद्ध न्यायालयात जावे लागले. सांसारिक जीवनात वादळे उठली. अखेर न्यायालयाने त्यांचे म्हणणेच उचलून धरले. मात्र त्याआधीच डॉ.जोगळेकरांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.त्यानंतरही त्यांनी आपले रुग्णसेवेचे व विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षांपर्यंत सुरू ठेवले.

प्रा. सुधीर पानसे

जोगळेकर, श्रीकृष्ण वासुदेव