जोशी, मधुकर सीताराम
गुरुवर्य कुरुंदकर ज्या गावी जन्मले त्याच कन्हेरगाव, (जि. परभणी) आता जिल्हा हिंगोली येथे मधुकर सीताराम जोशी ह्यांचा जन्म झाला. पुढे त्यांनी मधु जामकर हे नाव धारण केले. हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाच्या एम. ए. (मराठी) परीक्षेत १९६६ साली प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होताना कै. ना. गो. नांदापूरकर सुवर्ण पदकाचे ते पहिले मानकरी ठरले. शिक्षण घेत असतानाच विवेकवर्धिनी प्रशालेत १९६१ ते १९६७ या काळात अध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर एक वर्ष मराठवाडा विद्यापीठात संशोधक साहाय्यक राहिल्यानंतर १९६९ ते २००२ (निवृत्तीपर्यंत) सलग ३३ वर्षे परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख या नात्याने अध्यापन केले. महाराष्ट्रातील गेल्या पिढीतील चतुरस्र विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे शिष्यत्व बाळगल्याचा अभिमान मनात जागविणारे अनेक जण आहेत. मात्र स्वतः कुरुंदकरांनी ज्यांच्यावर शिष्यवत प्रेम केले, असे जे मोजके साहित्यिक आहेत, त्यांच्यापैकी एक प्रमुख नाव आहे प्रा. मधु जामकर. कुरुंदकरांप्रमाणेच ना. गो. नांदापूरकर, प्राचार्य राम शेवाळकर, कवी बी. रघुनाथ, दाजी पणशीकर आदी अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचा सुहृद सहवास जामकरांना लाभला आहे.
‘क्षितिजा’ हा जामकरांचा पहिला काव्यसंग्रह आहे. त्यानंतर कविता, ललित लेख, समीक्षा, व्यक्तिचित्रण इत्यादी साहित्य प्रकारातील १७ पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत. याशिवाय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून कवितावाचन, विविध दिवाळी अंकांमधून तसेच वाङ्मयविषयक नियतकालिकांतून नियमित लेखन आणि संत साहित्यासह विविध विषयांवर महाराष्ट्राच्या सर्व भागांतील व्याख्यानमालांमध्ये व्याख्याने असे साहित्यिक कर्तृत्व जामकरांच्या गाठीशी आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार, बेळगावचा (शब्दगंध) प्रथम काव्य समीक्षा पुरस्कार, पुणे नगर वाचन मंदिराचा कै. श्री. ज. जोशी पुरस्कार, कै. भालचंद्र कहाळेकर समीक्षा पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. १९८४ साली अंबाजोगाई येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्यवाह म्हणून काम केले.
जामकर निवृत्तीनंतरही वाङ्मयीन चळवळीत कार्यरत आहेत. समरसता साहित्य परिषद या संस्थेचे ते महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
२०१८ साली त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कारकीर्दीचा गौरव ‘यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार’ देऊन केला गेला आहे.