Skip to main content
x

जोशी, राम जयराम

      राम जयराम जोशी यांच्या आईचे नाव सुलक्षणा व वडिलांचे नाव जयराम रामकृष्ण जोशी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचणी, जिल्हा ठाणे व पुणे अनाथ विद्यार्थी गृहात झाले. चिंचणी येथे १९४२ मध्ये मॅट्रिक झाल्यावर मुंबईच्या रुईया महाविद्यालयात त्यांनी पदवी घेतली. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातून एम. ए. (अर्थशास्त्र व राज्यशास्त्र) होऊन त्यांनी १९४७ पासून ते मुंबईच्या पोद्दार व रुईया महाविद्यालयामध्ये अध्यापन कार्य सुरू केले. १९६० ते ६३ एस.आय.ई.एस. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व १९६७ ते १९७७ प्राचार्य म्हणून ते कार्यरत होते. मुंबई विद्यापीठात त्यांनी १९५८ ते ८३ पर्यंत पदव्युत्तर अध्यापन केले. १९७७-८३ या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अमेरिकेतल्या काही विद्यापीठातही त्यांनी अध्यापन केले.

     शैक्षणिक कार्य उच्च शिक्षण क्षेत्रात झाले तरी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे ते अध्यक्ष होते. देश परदेशातील अनेक शैक्षणिक प्रश्‍नांसंबंधी सातत्याने त्यांनी एक सुसंगत दृष्टिकोन मांडला. सर्वसामान्यांना सहज समजेल अशी सरळ, सोपी व सुबोध भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक स्तरावरील महत्त्वाच्या समस्यांची त्यांनी बारकाईने माहिती घेऊन त्यातून नष्कर्ष काढलेले आहेत.

     शिक्षण क्षेत्रातील बजबजपुरी, अनागोंदी नाहीशी करण्यासाठी राम जोशींनी काही उपायही सुचवले आहेत. ते म्हणतात -

     ‘प्रथम शासनाला आपले अग्रस्थान सोडावे लागेल. ते अशा व्यक्ती आणि संस्थांकडे सोपवावे लागेल, ज्यांच्याकडे कल्पना आहेत, सामाजिक दृष्टी आहे, पोटतिडिक आहे आणि शासनाला खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल... काही सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अगत्याचे कार्यक्रम आस्थेने राबवावे लागतील.’ यातून शासनाने क्रमाक्रमाने माघार घेऊन स्वायत्त आणि सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांचे शैक्षणिक विकासाचे तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न होत आहेत. असे चित्र दिसावे अशी त्यांची अपेक्षा व्यक्त झाली आहे. त्यांच्या लिखाणात केवळ तक्रारीचा स्वर नसून समस्येच्या मुळाशी जाऊन, तौलानिक विवेचन करून, प्रयोगांनी सिद्ध झालेल्या उपक्रमांचा उल्लेख करुन त्यांनी परिस्थिती सुधारक उपाय सरकार व समाजापुढे मांडले आहे.

- वि. ग. जोशी

जोशी, राम जयराम