कलबाग, श्रीनाथ शेषगिरी
डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग ह्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे शिक्षण रॉबर्ट मनी विद्यालयामध्ये झाले. ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेतून त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळविली. युडीलीटी मधून ते एम.एस्सी. (टेक.) झाले. १९५३ मध्ये खाद्य तंत्रज्ञानातील (फूड टेक्नोलॉजी) पीएच.डी. पदवी मिळविण्यासाठी त्यांनी अमेरिकेतील शिकागो येथील इलिनॉय विद्यापीठात प्रवेश घेतला.
पुढील दोन वर्षांच्या तेथील वास्तव्यात ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या जीवनाचे निरीक्षण करताना शेतकरी शेतीबरोबरच रोजच्या जीवनातही विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करतात हे त्यांच्या लक्षात आले. त्यातूनच त्यांच्या भविष्यातील कार्याची दिशा निश्चित झाली. प्रा. कुमाराओ ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच. डी. मिळविली.
अमेरिकेतील नामवंत कंपनीतील नोकरी न स्वीकारता १९५५ मध्ये ते भारतात परतले. म्हैसूर येथील (सेंट्रल फूड टेक्नोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (सी.एफ.टी. आर.आय.) मध्ये डॉ. कलबाग सहाय्यक वैज्ञानिक संशोधन अधिकारी म्हणून रुजू झाले. तेथे १९६३ पर्यंत त्यांनी काम केले. त्यानंतर हिंदुस्थान लीवर लिमिटेड कंपनीच्या संशोधन विभागात अभियांत्रिकी शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. १९८२ मध्ये ग्रामीण भागात शैक्षणिक कार्य करण्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
शालेय शिक्षण न घेताही व्यवसायासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून यशस्वी आयुष्य जगणार्या मुलांचा मुंबईत जाऊन त्यांनी अभ्यास केला. ‘काम करत करत शिकणे’ हीच शिक्षणाची खरी पद्धत असली पाहिजे असा निष्कर्ष ह्या अभ्यासातून त्यांना मिळाला. महात्मा गांधींनी ‘नई तालीम’ मध्ये या पद्धतीचा पुरस्कार केला होता. पण ‘नई तालीम’ म्हणजे तंत्रज्ञान, विज्ञान व आधुनिकीकरणास विरोध असा सर्वांचा गैरसमज झाला होता. डॉ. कलबागांनी ‘नई तालीम’ मधील कल्पनांना विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड दिली.
पुण्यातील थोर शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक, डॉ. चित्रा नाईक ह्यांच्या सहकार्याने ‘भारतीय शिक्षण संस्थेचा’ एक स्वतंत्र स्वायत्त विभाग म्हणून डॉ. कलबागांनी ‘विज्ञान आश्रमाचे’ काम सुरू केले. त्यासाठी खेड्यांना भेडसावणारे सर्व प्रश्न उपस्थित असणार्या पाबळ गावाची (पुणे जिल्हा) कलबागांनी निवड केली. तेथील ऑईल मिलमध्ये विज्ञान आश्रमाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर शासनाने व गावाने गावाजवळील पाच एकर जागा दिली. या जागेवरच आश्रम उभा राहिला.
सुरुवातीला डॉ. कलबाग गावकर्यांबरोबर राहिले. त्यांच्या गरजांचा, विकासाच्या कल्पनांचा त्यांनी अभ्यास केला. त्यातून ‘ग्रामीण तंत्रज्ञान अभ्यासक्रम’ तयार झाला. ‘शिक्षणातून गावाचा विकास व विकासकामांमधून शिक्षण’ हे ह्या अभ्यासक्रमाचे सूत्र होते. हा अभ्यास पूर्ण केलेले शेकडो विद्यार्थी आज स्वतःचे व्यवसाय करीत आहेत. पाबळमधील समस्यांचे उत्तर म्हणून विविध तंत्रज्ञानविषयक प्रकल्प आश्रमात विद्यार्थ्यांनी तयार केले. १९८७ पासून पाबळ व आसपासच्या शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावी ‘ग्रामीण तंत्रज्ञान’ हा प्रकल्प राबविला गेला. ह्या प्रयोगाच्या मूल्यमापनानंतर ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या अभ्यास समितीने ह्या विषयाला शासनमान्य विषय म्हणून मान्यता दिली व ‘मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ (इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी - आय.बी.टी.) असे नाव देऊन अभ्यासक्रमातील पहिला पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून ‘व्ही-१’ हा सांकेतिक क्रमांक दिला.
डॉ. कलबागांनी बारकाईने अभ्यास करून आय.बी.टी.ची आखणी केली. त्यासाठी पुस्तके, व्हीडीओ सीडी तयार केल्या. तेवीस शाळांमध्ये तो राबविला जात आहे. पाबळ जियोडेसिक डोम ही कमी खर्चातील घरे, भूगर्भातील पाणी शोधण्याचे यंत्र, छोट्या शेतीसाठी कमी अश्वशक्तीचा ‘मेक बूल’ ट्रॅक्टर अशी अनेक तंत्रज्ञाने डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली. लातूरचा भूकंप, गुजरातमधील भूकंप, आंध्रचे चक्रीवादळ या संकटांत पुनर्वसनासाठी पाबळ डोम वापरले गेले. पाणी शोधण्याच्या यंत्राचा वापर करून हजारो विंधन विहिरी खोदण्यात आल्या.
१९९८ मध्ये मल्टिमिडिया तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षकांना मराठीतून संस्थापक धडे तयार करता यावेत म्हणून डॉ. कलबागांनी रिचर्ड पाईप ह्यांच्या सहकार्याने ‘रियालिटी लर्निंग इंजिन’ ह्या संगणक आज्ञाप्रणाली सॉफ्टवेअरची निर्मिती केली. आंतरजालावरून तज्ज्ञांकडून समस्यांची उत्तरे मिळावीत म्हणून कलबागांनी आय.आय. टी. चेन्नईच्या सहकार्याने पाबळ व जवळपासच्या गावांना बिनतारी तंत्रज्ञानाने आंतरजाल सेवा उपलब्ध करून दिली.
डॉ. कलबाग यांनी विविध शिक्षण समित्यांवर काम केले. भारत सरकारने ‘कम्युनिटी पॉलिटेक्निक’ साठी नेमलेल्या ‘कलबाग समिती’चे ते अध्यक्ष होते. त्यावेळी ‘कम्युनिटी पॉलिटेक्निक’ च्या माध्यमातून शिक्षण व विकास ही संकल्पना राबविण्याच्या संदर्भात त्यांनी केलेल्या सर्व शिफारशी भारताच्या संसदेत स्वीकारल्या गेल्या होत्या. ग्रामीण तंत्रज्ञान म्हणजे कमी खर्चाचे, कमी दर्जाचे तंत्रज्ञान असे नसून कमी खर्चात ते उपलब्ध करताना तंत्रज्ञानाची निवड सर्वोत्तमच असली पाहिजे असा डॉक्टरांचा आग्रह होता.
अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम.आय.टी.) च्या सहकार्याने विकसित झालेल्या ‘फॅब लॅब’ संकल्पनेत डॉ. कलबाग यांचा महत्त्वाचा सहभाग होता. लोकांना त्यांच्या दैनंदिन समस्यांवर उत्तरे शोधता यावीत यासाठी तंत्रज्ञान विकासाच्या द्वारा विद्यार्थी, शेतकरी, युवावर्ग यांसारख्या कोणत्याही कल्पक व्यक्तीला मनातील कल्पना प्रत्यक्षात आणता यावी यासाठी अत्याधुनिक यंत्रे असलेली अमेरिकेबाहेरील पहिली ‘फॅब लॅब’ पाबळ गावात सुरू झाली. आज अनेक देशांत ती स्वीकारली गेली आहे.
‘नातू फाउण्डेशन पुरस्कार’, ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार डॉ. कलबाग यांना मिळाले. ‘शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास’ ही संकल्पना व विज्ञान आश्रमाचा प्रकल्प देशभरातील अनेक शैक्षणिक संस्थांतून राबविला जाणे हा डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबागांना प्रदान करण्यात आलेला सर्वश्रेष्ठ पुरस्कार ठरेल, यात शंका नाही.