Skip to main content
x

पाटील, अनुराधा कौतिकराव

     अनुराधा कौतिकराव पाटील यांचा जन्म पहूर जि.जळगाव येथे झाला. शालान्त परीक्षेपर्यंत शिकलेल्या अनुराधा यांचे १९८१पासून १९९२पर्यंत ‘दिगंत’, ‘तरीही’ आणि ‘दिवसेंदिवस’ हे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. जीवनाच्या विविध अनुभवांचे उत्कट चित्रण त्यांनी सहज, सोप्या भाषेत केले आहे. हे चित्रण वाचताना त्यांच्या जीवघेण्या प्रवासाचे, भयावह वास्तवाचे, एकाकी व असुरक्षित स्त्री-जीवनाचे आविष्कार वाचकाला होतात. त्यांच्या कवितांत चैतन्य आहे, मनस्वीपणा आहे. नकोशा झालेल्या जिण्याची संगती लावण्याच्या प्रामाणिक प्रयत्नात होरपळलेल्या हृदयाचे निःश्‍वास असणे, अगदी स्वाभाविक वाटते. इतके असूनही त्या म्हणतात,

‘तशी खंत काही नाही

कुठूनही मी एकटीच

परतत आलेय.

कालांतरानं मी हे सारं विसरून जाईन,

कोवळ्या स्वप्नांचे हे रुणझुणते दिवस.’

त्यांच्या कवितेच्या उल्लेखनीय बाबी अनेक आहेत. कोणत्याही कवितेला नाव नाही. तिच्यात उत्तम कवितेचे गुण आहेत. सहजता, सुबोधता असून दुःखी किंवा पराभूत, परागंदा झाल्याचा आक्रोश नाही, उपहास नाही की विद्रोहाचा स्वर नाही. त्यांचा दुर्दम्य आशावाद व आत्मविश्वास आणि अस्सलपणा व प्रामाणिकपणा मनाला भिडतो. निसर्ग व परिसर यांच्याशी एकरूप झालेले जीवन बदलणारे ऋतू, ओंजळभर काजवे, विझून गेलेल्या शेकोट्या, आभाळाची निस्संगता, फुललेले पळस, नदी, ओढे, जंगल या सार्‍यांना वेचते. कवयित्रीची जाण व त्यांचे भान मार्मिक, तरल आहे. त्या म्हणतात, ‘जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील, अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही’, पण त्यांची समृद्धी अशी की,

‘कवितेशिवाय जवळ काही नाही.

ओसंडून वाहणार्‍या या चैतन्याची

मनस्वी कविता

कुठंतरी माझ्या आतच आकार घेतेय’

‘इतरांच्या स्वप्नांमध्ये अर्थ भरता भरता’ कवयित्रीची स्वतःची स्वप्ने तशीच राहून जातात, या गोष्टीची तिला खंत नाही व खेदही नाही. लहान मुलांसारखे भाबडे, कोमल, निर्मळ मन त्यांच्या निसर्गाशी एकजीव झालेल्या जीवनातून वारंवार डोकावते. अनुभवलेल्या गतकाळाची चित्रे, वर्तमानाच्या चिवट व यथार्थ भूमीवर राहून रेखाटताना त्यांना एक विराट संदर्भ लाभला आहे. त्या जेव्हा म्हणतात,

‘माझ्या हृदयात गोठल्या आहेत

वर्षानुवर्ष अशाच कितीतरी गोष्टी

आणि वाळूवर सांडणार्‍या पाण्यासारखं

आयुष्य झिरपून जातंय ओंजळीतून’

तेव्हा वाटते की हे त्यांचे एकट्याचे जीवन नव्हे, त्यांच्यासारख्या असंख्य स्त्रियांचे हे विदारक दर्शन होय. अनुराधाताईंची सहनशीलता आणि सहृदयता पृथ्वीसारखीच आहे. भारतीय ग्रामीण संस्कृतीच्या संदर्भांनी आणि अनोख्या प्रतिमासृष्टीने ही कविता सुंदर व समृद्ध झाली आहे. 

महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कविता लेखनाचा पुरस्कार, महाराष्ट्र फौंडेशन अमेरिका यांचा वाङ्मय पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार ,केशवसुत पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार , ना.धों.महानोर काव्यपुरस्कार,न्यूयॉर्क अमेरिकेच्या महाराष्ट्र फौंडेशनचा ललित वाङ्मयाचा पुरस्कार, संत जनाबाई पुरस्कार तसेच साहित्य अकादमीचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार अनुराधाताई यांना लाभले आहेत.  

- वि. ग. जोशी/ आर्या जोशी

पाटील, अनुराधा कौतिकराव