Skip to main content
x

शेटे, कल्याण

चित्रकार

              हाराष्ट्राच्या ग्रमीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेले व्यक्तिचित्रकार म्हणून कल्याण शेटे ख्यातनाम आहेत.

              कल्याण शेटे यांनी पंढरपूर येथील रुक्मिणी मंदिरात एकेकाळी प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांची आठवण व्हावी, अशा योग्यतेची रुक्मिणी स्वयंवरावर आधारित चित्रे साकार केली आहेत. त्या अठरा चित्रांपैकी नऊ चित्रे पूर्ण झाली आणि त्यांच्या अपघाती निधनामुळे हे काम अर्धवट राहिले.

              कल्याण शेटे हे मूळचे बीड जिल्ह्यातील चौसाळा या छोट्या गावातील होते. स्वातंत्र्यानंतर निजामाच्या राजवटीत १९४७-४८ च्या दरम्यान रझाकारांच्या जुलमाला व अत्याचाराला कंटाळून त्यांनी गाव सोडले व ते कायमचे सांगलीत स्थिरावले. चौसाळा येथील शेती, घर वगैरे सोडून ते आईवडील व भावंडांसह सांगलीत आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सांगली शिक्षण संस्थेच्या सिटी हायस्कूल येथून १९५४ मध्ये मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी सर्वोदय हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे तात्याराव वेदपाठक यांच्या कलाभुवन संस्थेत त्यांनी काम सुरू केले. त्यांच्या कामामुळे संस्था खूप नावारूपाला आली. दहा-बारा वर्षांनंतर त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. पुढे हळूहळू सांगली व संपूर्ण महाराष्ट्रात अनेकांनी त्यांच्याकडून व्यक्तिचित्रे रंगवून घेतली. चित्रातील अचूक साधर्म्य व आकर्षकता यांमुळे कल्याण शेटे अत्यंत लोकप्रिय होऊ लागले.

              नावापुढे पदवी हवी म्हणून खूप उशिरा पंत जांभळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण शेटे यांनी ‘जी.डी. आर्ट’ ही पदविका संपादन केली. सांगलीसारख्या गावात त्यांच्या कलेचे जे चीज झाले; त्यापेक्षा मुंबईत ते राहिले असते, तर त्यांचे खूप मोठे नाव झाले असते.

              ‘प्रभात’ या मोठ्या चित्रपट कंपनीकडूनही त्यांना बोलावणे आले होते. परंतु दुर्दैव असे की, ते तेथे जायला आणि कंपनी बंद पडायला एकच गाठ पडली. यानंतर त्यांनी व्यावसायिक व्यक्तिचित्रांवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या हातून अनेक अप्रतिम, दर्जेदार कलाकृती निर्माण झाल्या. विशेषत: त्यांनी केलेली देव-देवता आणि अध्यात्माच्या क्षेत्रातील गुरू व महाराज यांची व्यक्तिचित्रे त्यांतील भावोत्कटतेमुळे जनसामान्यांच्या मनांत ठसली.

              प्रयोगशीलता व कलामूल्यांच्या शोधापेक्षा चित्र आकर्षक करण्याकडेच त्यांचा कल होता. लोकांचे  समाधान व्हावे अशी त्यांची इच्छा असे. जास्तीत- जास्त चांगले काम व्हावे यावर त्यांचा कटाक्ष असे. कामाचा मोबदला किती मिळावा याला ते महत्त्व देत नसत. या व्यावसायिक कामांतूनही सवड काढून  समाजाचा सहभाग असलेल्या सर्वसमावेशक कलेसाठी कार्य करीत असलेल्या ‘संस्कार भारती’साठी त्यांनी काम केले.

              वैयक्तिक पातळीवर ते अतिशय व्यवस्थित व शिस्तप्रिय, स्वीकारलेल्या कामाप्रती निष्ठावंत होते. ते अतिशय शांत, संयमी व अबोल स्वभावाचे होते. त्यांनी आपल्या कलेचा अहंकार कधीच केला नाही. ते कामात कायम व्यग्र असत. त्यांच्या कलेमुळे त्यांना मोठ्या लोकांचा सहवास मिळाला, मानसन्मानही खूप मिळाले. शहरी भाग वगळता, महाराष्ट्रभर सर्वसामान्य जनतेत ते लोकप्रिय झाले.

- वासुदेव कामत

शेटे, कल्याण