Skip to main content
x

सगदेव, प्रभाकर निळकंठ

             प्रभाकर निळकंठ सगदेव यांचा जन्म विदर्भामधील अदासा या लहान खेडेगावात झाला. घरी अत्यंत बिकट गरिबी असल्यामुळे वेळप्रसंगी पडेल ते काम करून १९५३मध्ये  सगदेव जबलपूर येथील पशू महाविद्यालयामधून पशुवैद्यक पदवीधर झाले. नंतर ते नागपूर येथील प्रादेशिक संवर्धक उपसंचालकांच्या कार्यालयामध्ये शासकीय सेवेत रुजू झाले. शासकीय सेवेचे प्रशिक्षण व सेवानुभवानंतर १९५५मध्ये सावनेर येथील पशुचिकित्सालयाचे प्रमुख अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे शासकीय पशुवैद्यक अधिकारी हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र असतो, ही भावना शेतकऱ्यांच्या मनात कायमची रुजली व सरकारची प्रतिमा उज्ज्वल झाली. त्यांनी १९६२च्या सुमारास कळमेश्‍वर येथे रुजू झाल्यावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर निवासी प्रशिक्षण शिबिरे सातत्याने घेतली. तसेच त्यांनी ग्रामपातळीवर पहिल्यांदा गुरांची प्रदर्शने व आरोग्य शिबिरे घेण्याचे मोलाचे काम केले. तत्कालीन अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांनी डॉ. सगदेव यांचा नागरी सत्कार करून त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले.

             अमरावती येथे जिल्हा चिकित्सालय अधीक्षक या पदावर नेमणूक झाल्यावर डॉ. सगदेव यांनी शेतकर्‍यांच्या व दुग्ध व्यावसायिकांच्या पशुधनासाठी नवीन विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा या हेतूने सलग ३ वर्षे प्रशिक्षण शिबिरे घेतली. मेळघाटामधील अत्यंत निबीड जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांपर्यंत पशु-संवर्धन खात्याच्या सेवा पुरवणारे डॉ. सगदेव हे पहिले पशुवैद्यक ठरले. बोरगावमंजू येथे प्रक्षेत्रावर प्रमुख अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर दैनंदिन कामाबरोबरच तेथील शेतमजुरांची आर्थिक परिस्थिती व त्यांच्या कर्जचक्रात अडकण्याच्या कारणांचा अभ्यास केला.

             डॉ. सगदेव यांनी मजुरांना साक्षर करण्यासाठी शेतकरी व महिला यांच्यासाठी साक्षरता वर्ग चालवले. मजुरांच्या मुलांसाठी एक शिक्षकी शाळासुद्धा चालू केली. अशा पद्धतीने सामाजिक चळवळ उभी केल्यामुळे  डॉ. सगदेव यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला.

             डॉ. सगदेव यांनी आपल्या सहकार्‍यांसाठी संघटना बांधली. तसेच महाराष्ट्र पशुवैद्यकीय संघटनेचे सलग १३ वर्षे अध्यक्षपद भूषवले.

- मानसी  मिलिंद  देवल 

सगदेव, प्रभाकर निळकंठ