Skip to main content
x

काळे, नरहरि भानुदास

       दत्तसंप्रदायी संतांमध्ये श्री रावसाहेब तथा बाबा सहस्रबुद्धे यांचे शिष्य नरहरिप्रभू तथा नरहरी भानुदास काळे महाराज यांचे एक विशेष स्थान आहे. नरहरिप्रभू यांचा जन्म नृसिंह जयंतीच्या शुभदिनी, अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर येथे झाला. त्यांचे वडील भानुदास हे दशग्रंथी ब्राह्मण होते; भिक्षुकीबरोबरच पुराणिक म्हणून ते गावोगावी भागवतावर प्रवचने करीत. नरहरिप्रभू यांच्या आईचे नाव कृष्णाबाई होते. आपली कौटुंबिक माहिती देणारा नरहरिप्रभूंचा अभंग आहे :

कृष्णा माझी माता । भानुदास पिता ।

रमाकांत चुलता । विद्वानची ॥

पवित्र ती भूमी । गाव बेलापूर ।

पवित्र ते तीर । प्रवरेचे ॥

नरहरी म्हणे । काळे कुळी जन्म । तुझ्या कृपे ॥

या अभंगावरून त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचा तपशील मिळतो, तसाच त्यांच्या ठायीच्या काव्यस्फुरणाचा परिचय होतो, ‘नरहरी म्हणे माझा मी एकटा । सर्वांत धाकटा भावांमाजी ॥अशी अधिक माहितीही ते देतात. या दृष्टीने त्यांची अभंग गाथा वाचण्यासारखी आहे.

नरहरिप्रभू यांना सर्व अण्णाम्हणत. अण्णांचे प्राथमिक शिक्षण बेलापूर धांदरफळे येथे झाले. संगमनेरच्या पेटिट हायस्कूलमध्ये अण्णांना गीता तोेंडपाठ नसल्याने प्रवेश मिळाला नाही, मग ते पुण्यात आले व अनाथ विद्यार्थी गृहात कमवा-शिका तत्त्वावर त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण केले; पण मॅट्रिकला ते अनुत्तीर्ण झाले व नाशिकहून पुढील वर्षी (१९३२) परीक्षा देऊन ते मॅट्रिक झाले. विद्यार्थिदशेतच त्यांना अभ्यासापेक्षा अध्यात्माची ओढ अधिक होती. मॅट्रिक होईपर्यंत त्यांनी श्री गुरुचरित्राची १०८ पारायणे केलेली होती.

१९३४ मध्ये अण्णांच्या वडिलांचे निधन झाले. अण्णा १९३६ साली बेलापूरहून नोकरीच्या शोधात पुण्यात आले. जोशी-लोखंडे छापखान्यात त्यांना नोकरी मिळाली. याच दरम्यान त्यांची भेट सद्गुरू रावसाहेब ऊर्फ बाबामहाराज सहस्रबुद्धे यांच्याशी झाली आणि पहिल्या भेटीतच अण्णांना आपणांला जे सद्गुरू पाहिजेत, ते मिळाले अशी खात्री झाली. सद्गुरूंचा शोध संपला. बाबामहाराजांच्या मार्गदर्शनानुसार साधनेला सुरुवात झाली. जोशी-लोखंडे छापखान्यातील नोकरी सुटल्यानंतर अण्णा पुन्हा नोकरी शोधू लागले. त्यांना टीचर्स प्रिन्टिंग प्रेसमध्ये नोकरी मिळाली; पण ती ही फार काळ टिकली नाही. अखेर सद्गुरु कृपेने १९४६ साली अण्णांना मुद्रितशोधक म्हणून दैनिक केसरीमध्ये नोकरी मिळाली व ती निवृत्तीपर्यंत (१९६८) टिकली.

१९४६ साली केसरीत नोकरी लागण्यापूर्वीच्या विवंचनेच्या काळातच अण्णांच्या आई कृष्णाबाई यांचे निधन झाले. हातात एक पै नाही आता आईचे अंत्यसंस्कार कसे करायचे हा यक्षप्रश्न उभा राहिला. एवढ्यात एक अनोळखी माणूस येऊन अण्णांना भेटला व आपल्याला रु.३६/- द्यावेत असा मला आज पहाटे दृष्टान्त झाला आहे एवढेच सांगून त्याने अण्णांना पैसे दिले. त्या ३६ रुपयांमध्ये अण्णांनी आईचा अंत्यविधी पार पाडला. सद्गुरुकृपेमुळेच हे सर्व घडून आले आहे, अशी अण्णांची दृढ श्रद्धा बनली. त्यांनी लग्न-संसार न करता गुरु सेवा, साधना, ईश्वरी चिंतनातच आयुष्य घालवायचे असा ठाम निर्धार केला व तो अखेरपर्यंत निष्ठेने पाळला. अण्णा केसरीत साधे मुद्रितशोधक होते; पण त्यांची साधना उच्च कोटीला पोहोचलेली होती. खुद्द सद्गुरू बाबा सहस्रबुद्धे अनेकांना अण्णांच्या दर्शनाला केसरीत पाठवीत. एवढेच नव्हे, तर अण्णांच्या रूपात खुद्द अक्कलकोट स्वामी समर्थच केसरीत काम करतात, असे स्वतः सहस्रबुद्धे महाराजच म्हणत. गुरूंच्या या वाक्यातून अण्णांचा अधिकार केवढा होता तेच स्पष्ट होते. रावसाहेब सहस्रबुद्धे यांच्या शिष्यांमध्ये अण्णा हे त्यांचे मानसपुत्रवत शिष्य होते.

१९५४ साली सद्गुरू रावसाहेब सहस्रबुद्धे यांचे निर्वाण झाल्यानंतर अण्णांना मायबापांच्या निधनाहूनही भयंकर दुःख झाले. -५ वर्षांचा काळ अगदी उदास-विमनस्क मन:स्थितीतच कंठल्यानंतर १९६१ साली अण्णा पूर्ववत सावरले व त्यांनी वाल्हे या गंधेमामा महाराजांच्या गावी दत्तयागकेला. येथून त्यांच्या कार्याची जोमाने सुरुवात झाली. अण्णांनी शेवटचा दत्तयाग गाणगापूरयेथे करून आपला १०८ दत्तयागांचा संकल्प पूर्ण केला. एक दत्तयाग ७ दिवस चालतो. यज्ञ, स्वाहाकार, गुरुचरित्र पारायण, भजन, प्रवचन, अन्नदान, महाप्रसाद असा तो एक सोहळाच असतो. एक दत्तयाग करताना भल्या-भल्यांची तारांबळ होते. अण्णांनी १०८ दत्तयाग केले ते केवळ गुरुकृपेच्या पुण्याईवर. अण्णांनी साधना, याग, पारायणे यांबरोबर प्रासादिक अभंग रचनाही केलेली आहे. नरहरी म्हणेही अभंगगाथा अण्णांच्या प्रसादयुक्त वाणीचे मूर्तरूप आहे. १० ऑगस्ट १९९० रोजी या अभंग गाथेचे मा. दत्तोपंत ठेंगडी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

१९९१ साली, वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी नरहरिप्रभू यांना आपले इहलोकीचे कार्य संपल्याची वारंवार जाणीव होऊ लागली. भक्तांनी ट्रस्ट स्थापन करून वाघोली (पुणे) येथे नदीकाठी त्यांचे स्मृतिमंदिर बांधण्याचे कार्य सुरू केलेले आहे. पुण्यात ८८८, सदाशिव पेठ येथे अण्णांचे वास्तव्य होते. ती जागा स्मृतिस्थळ म्हणून मंदिरासारखी जतन केलेली आहे.

  विद्याधर ताठे

 

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].