Skip to main content
x

क्षेत्रमाडे, सुमती बाळकृष्ण

डॉ.सुमती क्षेत्रमाडे हे नाव मराठी साहित्यप्रेमींना सुपरिचित आहे. सुमतीबाईंनी सातत्याने चाळीस वर्षे मराठी कादंबरी लेखनावर आपला स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला आहे. कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध झालेल्या सुमतीबाईंची वैद्यकीय कारकिर्दही तितकीच यशस्वी ठरली होती. वैद्यकीय व्यवसायातही प्रसूतिगृह आणि मनमोकळा, रिकामा वेळ यांचा छत्तिसाचा आकडा ! मात्र, स्वतःच्या व्यस्त दिनक्रमातून जमेल तसा वेळ काढून, केवळ छंदापायी लिहिता लिहिता, सुमतीबाईंनी विपुल साहित्यनिर्मिती केली. सुमारे ३१ कादंबर्‍या, २६ कथासंग्रह, २ नाटके आणि १ काव्यसंग्रह अशी त्यांची साहित्यसंपदा आहे.

ज्या काळात डॉक्टर आणि साहित्य यांचा फारसा संबंध येत नव्हता आणि साहित्यातही डॉक्टरेट मिळविणे ही तशी दुरापास्तच गोष्ट होती, त्या काळात डॉक्टर आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत यशस्वी ठरणारी ही लेखिका. व्यक्तीचे आणि समाजाचे जीवन कथांमध्ये जवळून हाताळता येते असा वैद्यकीय व्यवसाय त्यांनी स्वीकारलेला होता. मात्र, त्याचबरोबर मानवी वर्तनाचे अचूक ज्ञान, मानवी वर्तनाचे सूक्ष्म निरीक्षण आणि सहजसंवेदनशील मन यांमुळेच त्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच साहित्यातही यशस्वी ठरल्या.

प्रतिकूल परिस्थितील शिक्षण

कादंबरीकार सुमती क्षेत्रमाडे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात, राजापूर तालुक्यात, झापडे या गावी झाला. त्यांचे वडील बाळकृष्णपंत रेगे हे रेव्हेन्यू खात्यात इन्स्पेक्टर होते. त्यांच्या घराण्याचे मूळ आडनाव रेगे, मात्र क्षेत्रमाडे हा त्यांना मिळालेला किताब होता. सुमतीबाईंनी आपल्या वडिलांप्रमाणेच ही पदवी स्वीकारली होती. काही कारणास्तव त्यांनी विवाह न केल्यामुळे हीच पदवी कायम टिकली. बाईंचे शालेय शिक्षण नाशिकला झाले. शालेय जीवनात त्या नेहमी प्रथम क्रमांकावरच असत. नाशिक सेंटरमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या त्या पहिल्याच विद्यार्थिनी होत्या.

शाळेत असताना त्यांनी अनेक वेळा मासिकांमधून, हस्तलिखितांमधून लिखाण केले होते. मॅट्रिकला त्या मराठी विषयात सर्वप्रथम आल्याने स्वाभाविकपणे त्यांनी कलाशाखेकडे प्रवेश घ्यावा, असेच सार्‍यांचे म्हणणे होते. मात्र, डॉक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न असल्याने त्यांनी शास्त्रशाखेत प्रवेश घेतला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण पुण्यात झाले. घरच्या गरिबीमुळे त्यांचे सर्व शिक्षण शिष्यवृत्तीवरच झाले.

आई वारल्याने लहान भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर लहान वयातच पडली. म्हणून एम.बी.बी.एस.पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ बडोदा संस्थानात नोकरी केली. १९४८ साली त्या पुढील शिक्षणासाठी आयर्लंडला गेल्या. १९५० साली परत येऊन त्यांनी कोल्हापूरला स्वतःचा दवाखाना थाटला. याच काळात त्यांची पहिली कथा वादळही स्त्रीमासिकात प्रकाशित झाली होती. १९४७ साली झालेल्या किर्लोस्कर कथास्पर्धेत त्यांना दुसरा पुरस्कारही मिळालेला होता.

 बडोद्याला सयाजीराव महाराजांकडे त्या नोकरीला होत्या. ही त्यांची नोकरी फिरतीची होती. या काळात त्या बडोद्यातील दभोई, पादरा, कडी, अमरोली, नवसारी या ठिकाणी फिरल्या. त्यांच्या बडोदा वास्तव्यात त्यांचा मालतीबाई दांडेकरांशी परिचय होऊन लेखनप्रेम अधिक वाढीस लागले. गुजरातमध्ये असताना त्यांनी आपली पहिली आधारही कादंबरी लिहायला घेतली. त्यामुळेच या कादंबरीच्या स्थलकालनिर्मितीवर गुजरातच्या वातावरणाचा, चालीरीतींचा, परंपरांचा फार मोठा प्रभाव आढळतो. या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला वि.स. खांडेकरांची प्रस्तावना लाभली आहे. खांडेकरांना त्या गुरुस्थानी मानत असत. आधारही एका असहाय, पतिप्रेमवंचित स्त्रीच्या जीवनावर आधारलेली कादंबरी आहे. स्वतःच्या हिमतीवर उभे राहून संकटांशी लढणारी नायिका रेखाटताना त्यांनी परंपरेत पिचणार्‍या स्त्रीचे चित्रण केले आहे.

स्त्री-भावविश्वलेखनाचा गाभा

प्रेम हा सुमतीबाईंच्या लेखनाचा स्थायिभाव आहे. त्यांच्या सर्व नायिका या ताठ मानेने परिस्थितीशी झुंजत असतात. मात्र, तरीही त्या विद्रोही वाटत नाहीत. आक्रस्ताळेपणा हा त्यांचा स्वभावधर्म नाही. नायिकाप्रधान लेखन करणार्‍या सुमतीबाईंनी केलेले स्त्री-चित्रण म्हणजे स्त्रीच्या भावविश्वातील आणि अंतःकरणातील शक्ती ओळखून त्यांनी तिचे रेखाटन केलेले आढळते. स्त्रीच्या दुर्बलतेतच तिची शक्ती असते हे सूत्र त्यांच्या संपूर्ण लेखनात आढळते. म्हणूनच गौरांग महाप्रभूंच्या जीवनावर आधारलेली त्यांची अनुहारही कादंबरी प्रत्यक्षात मात्र गौरांगपत्नी विष्णुप्रियेला केंद्रस्थानी ठेवून साकारली. वृंदाया त्यांच्या कादंबरीवर आधारित सुखाची सावलीहा चित्रपट त्या काळी गाजला होता. बंगाली साहित्यिक शरच्चंद्र चटर्जी यांच्या जीवनावर त्यांनी जीवनस्वप्नही कादंबरी लिहिली.

पौराणिक व्यक्तिरेखांना कवेत घेऊन मेघमल्हार’, ‘मैथिली’, ‘योगेश्वर श्रीकृष्ण’, ‘सत्यप्रिय गांधारी’, ‘नल-दमयंतीअशा अनेक कादंबर्‍या त्यांच्या लेखणीतून साकारल्या. त्यांची महाश्वेताही कोड झालेल्या तरुणीच्या जीवनावरील कादंबरीही खूप लोकप्रिय झाली. त्यावर आधारित मालिकेचेही चित्रण झाले होते. या कादंबरीने भारावून जाऊन त्या काळी अनेकांनी कोड झालेल्या तरुणींशी विवाह केल्याची उदाहरणे आहेत.

सुमतीबाईंच्या लेखनाची साहित्यिक मूल्ये कोणती, त्याचा दर्जा काय, यापेक्षा त्यांनी भारावलेला हा युगधर्म महत्त्वाचा ठरतो. त्यांनी समाजात जी प्रेरक शक्ती उभी केली, त्यामुळे त्यांचे कर्तृत्व निर्विवादपणे सिद्ध झाले आहे.

मराठीखेरीज कानडी, गुजराती, हिंदी, इंग्रजी, बंगाली या भाषांवरही सुमतीबाईंचे विलक्षण प्रभुत्व होते. गुजरातेत केलेल्या दीर्घ वास्तव्यामुळे त्यांचा गुजराती संस्कृतीशी जवळून परिचय होता. त्यांच्या अनेक कादंबर्‍यांची गुजराती भाषांतरे झालेली आहेत. अशा या यशस्वी लेखिकेचे विश्व शेवटपर्यंत लिखाण आणि प्रसूतिगृह एवढेच मर्यादित राहिले. वाचकांनी त्यांच्या लिखाणाला दिलेल्या भरघोस प्रतिसादात त्या कायम समाधानी होत्या.

- निवेदिता सावंत

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].