Skip to main content
x

कुलकर्णी, उमेश विनायक

       मेश विनायक कुलकर्णी यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव विशाखा होते. पुण्यातच शालेय शिक्षण झालेल्या उमेश यांनी येथीलच बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी घेतल्यानंतर कायद्याचेही शिक्षण घेतले. याच काळात त्यांची सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांच्याशी ओळख झाली व उमेश कुलकर्णी यांना ‘दोघी’ या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडले व ते पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’मध्ये (२०००) दाखल झाले. या संस्थेत शिक्षण घेत असताना उमेश यांनी ‘गिरणी’ नावाचा लघुपट बनविला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर या लघुपटाची दखल घेण्यात आली. या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

      उमेश कुलकर्णी यांनी २००८ च्या जानेवारीत प्रदर्शित झालेल्या ‘वळू’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून प्रदार्पण केले. या चित्रपटाने ‘क्लास’ आणि ‘मास’ अशा दोन्ही प्रेक्षकवर्गाची मने जिंकली. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वर्तुळातही या चित्रपटाने वाहवा मिळवली. बर्लिन आंतरराष्ट्रीय महोत्सवातही हा चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटाच्या यशामुळे अमिताभ बच्चन यांनी आपल्या बॅनरसाठी कुलकर्णी यांना ‘विहीर’ हा चित्रपट बनविण्याची संधी दिली. अत्यंत कठीण विषय सहजतेने मांडत उमेश कुलकर्णींनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन माध्यमावरील आपली पकड सिद्ध केली. त्यानंतर त्यांनी निर्माते अभिजित घोलप यांच्यासाठी ‘देऊळ’ हा चित्रपट दिग्दर्शित केला.

‘विहीर’ हा चित्रपट बर्लिन महोत्सवासाठी पात्र ठरला. तसेच रॉटरडॅम महोत्सवातही हा चित्रपट दाखल झाला. ‘देऊळ’ला २०११ या वर्षाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रपती पुरस्कार आणि उत्कृष्ट पटकथालेखनाचा, उत्कृष्ट अभिनेत्याचाही पुरस्कार मिळाला.

- मंदार जोशी

कुलकर्णी, उमेश विनायक