Skip to main content
x

कुलकर्णी, विनायक महादेव

     विनायक महादेव कुलकर्णी यांचा जन्म तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे झाला. शालेय शिक्षण तेथेच झाले तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातून. मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. बेळगाव व सोलापूर येथे अध्यापनाचे काम. कविता, कथा, कादंबरी, बालसाहित्य, असे विविध साहित्यप्रकार हाताळले. पुढील पुस्तके प्रसिद्ध- ‘विसर्जन’ (खंडकाव्य १९४३), ‘पहाटवारा’ (१९४९), ‘कमळवेल’ (१९५२), ‘अश्‍विनी’ (१९५७), ‘भाववीणा’ (१९६०), ‘प्रसादरामायण’ (१९६७), ‘पाऊलखुणा’ (१९६७), ‘मृगधारा’ (१९८३) हे कवितासंग्रह. ‘फुलवेल’ (१९४९), ‘ललकार’ (१९५८), ‘चंद्राची गाडी’, ‘अंगतपंगत’, ‘रंगपंचमी’ (१९७७), ‘गाडी आली झुक झुक झुक’ (१९८३), ‘नवी स्फूर्तिगीते’ (१९८६) हे बालगीतसंग्रह. ‘न्याहारी’ (१९३९) हा कथासंग्रह. ग्रामजीवनावर आधारित ‘आहुती’ (१९४१) ही कादंबरी. ‘साहित्यदर्शन’ (१९४८), ‘वृत्ते व अलंकार’ (१९७०), ‘रामजोशीकृत लावण्या’ (संपादन १९७३), ‘मुक्तेश्वरकृत सभापर्व’ (संपादन) ही त्यांची इतर काही पुस्तके. शालेय जीवनापासून कवितालेखनाने त्यांच्या लेखनाची सुरुवात झाली. सुरुवातीच्या ‘विसर्जन’ या प्रदीर्घ विरहगीतातून त्यांच्या काव्यलेखनावर रविकिरण मंडळाचा विशेष प्रभाव जाणवतो. नवथर प्रेमातील कोवळीक, संसाराच्या माध्यान्हीला अनुभवायला येणारी तृप्ती आणि प्रगल्भता, आणि आयुष्याच्या उत्तरकाळात विरक्तीकडे झुकलेली वृत्ती त्यांच्या कवितेमधून प्रकट होते. प्रेमाचे उदात्तीकरण, मातृत्वाचा गौरव, ईश्वरनिष्ठा आणि निखळ निसर्ग-प्रतिमा हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. ईश्वरावरच्या निस्सीम भक्तीमुळे त्यांनी ‘प्रसादरामायण’ हा रामाचे चरित्र सांगणारा गीतसंग्रह लिहिला. समाजातील दैन्य, शोषण यांमुळे येणारी अस्वस्थता, यातून येणारी असाहाय्यतेची भावना त्यांच्या ‘लमाणांचा तांडा’, ‘अणुस्फोट’, ‘वेसण’, ‘भट्टी’ यांसारख्या निवडक कवितांमधून व्यक्त झाली आहे. मुलांविषयी वाटणारे प्रेम आणि त्यांच्या भावविश्वाशी एकरूप होऊन जगाकडे पाहायची दृष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे मुलांचा व्रात्यपणा, त्यामागचा निरागसपणा ते नेमकेपणाने आपल्या बालसाहित्यात मांडू शकले आहेत.

     कुलकर्णी यांच्या कवितांचे रसग्रहण करताना डॉ.अक्षयकुमार काळे म्हणतात- ‘कुटुंबवत्सल प्रसन्नचित्त व्यक्तिमत्त्वाचा प्रासादिक असा आविष्कार वि.म.कुलकर्णी यांच्या सर्वच कवितांत झाला आहे. त्यांची शैली साधी, प्रसन्न व सुगम आहे. तिरकसपणाचे जात्याच तिला वावडे असल्यामुळे आपली प्रासादिकता ती कुठेच गमावत नाही. त्यामुळे शैलीचा बाळबोधपणा हेच त्यांच्या कवितेचे बलस्थान आहे.’

     संसारातल्या लहानमोठ्या अनुभवांत रमलेली त्यांची कविता प्रासादिक सौंदर्यामुळे मनात रेंगाळत राहत असली, तरी अनुभवाची वैश्विक पातळी मात्र गाठू शकत नाही.

     गदिमा पुरस्कार तसेच उत्कृष्ट प्राध्यापक म्हणूनराज्य शासनाचा  पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. 

- मृणालिनी चितळे

कुलकर्णी, विनायक महादेव