Skip to main content
x

खाँ, खादीम हुसेन

खादीम हुसेन खाँ यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अत्रौली या गावी संगीत घराण्यात झाला. त्यांचे वडील अल्ताफ हुसेन हे अत्रौली घराण्याचे, तर मातोश्री फैयाझी बेगम या आग्र घराण्याच्या होत्या. त्या विलायत हुसेन खाँ यांच्या ज्येष्ठ भगिनी होत्या. त्यामुळे खाँसाहेबांना दोन्ही घराण्यांची विद्या मिळाली. आजच्या आग्र गायकीचे जनक घग्गे खुदाबक्ष यांचे सुपुत्र कल्लन खाँ यांच्याकडून खादीम हुसेन खाँसाहेबांना अस्सल आग्र घराण्याच्या गायकीची तालीम मिळाली.

खादीम हुसेन खाँसाहेबांना कल्लन खाँसाहेबांकडून आग्र घराण्याची विद्या जेवढ्या प्रमाणात मिळाली, तेवढी अत्रौली घराण्याची विद्या मिळाली नाही; कारण वडील अल्ताफ हुसेन हे परगावी नोकरी करत होते. मात्र या घराण्याचे ‘दरसपिया’ (मेहबूब खॉँ) यांच्याकडून त्यांना विपुल बंदिशी मिळाल्या.

कल्लन खाँनी खादिम हुसेन खाँ यांना भरपूर विद्यादान केले. रोज बारा तास अशी दहा वर्षे त्यांना अखंड तालीम मिळाली. या दहा वर्षांच्या कालखंडात खादीम हुसेन खाँसाहेब प्रचलित, अप्रचलित मिळून ४०० राग शिकले. शिवाय प्रत्येक रागातील अनेकविध प्रकारच्या बंदिशीही शिकले. अवघ्या विसाव्या वर्षीच विपुल रागरागिण्यांचा व चिजांचा संग्रह खादिम हुसेन खाँसाहेबांपाशी झाला. याबरोबरच कल्लन खाँसाहेबांनी संगीताकडे पाहण्याची योग्य ती नजरही खाँसाहेबांना दिली. प्रत्येक रागाच्या स्वतंत्र भावप्रकृतीनुसार रागमांडणी सक्षम होण्यासाठी आवश्यक असणारी अठरा अंगेही ते कल्लन खाँकडून शिकले. 

कल्लन खाँ खेरीज आणखी काही उस्तादांकडूनही त्यांनी शिक्षण घेतले. अर्थात कल्लन खाँचे सुुपुत्र तसद्दुक हुसेन खाँ (विनोदपिया), मुहम्मद खाँ, अब्दुल्ला खाँ व नन्हे खाँ (उ. विलायतखाँचे बंधू ) विलायत हुसेन खाँ (प्राणपिया), उ. फैय्याज खाँ (प्रेमपिया), गणपतराव मणेरीकर, बशीर खाँ अलीगढवाले, आशीकअली खाँ, वजीर खाँ (जयपूर) इत्यादींकडून त्यांना काही रागरागिण्या व बंदिशी मिळाल्या. ‘सजनपिया’ या मुद्रेने त्यांनी उत्तम बंदिशीही रचल्या.

खाँसाहेबांंचे वडील १९३० मध्ये निवर्तले व आपल्या भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. तेव्हा नाइलाजाने त्यांना शिक्षकी पेशा पत्करावा लागला. आपल्या कुटुंबातील सर्व जबाबदारी पार पाडून त्यांनी ६० वर्षे अखंड विद्यादान केले. ते १९८६ मध्ये अर्धांगवायूमुळे विकलांग झाले.

खाँसाहेबांचा शिष्यवर्ग फार मोठा आहे. त्यात  ज्योत्स्नाबाई भोळे, वत्सलाबाई कुमठेकर, दुर्गाबाई खोटे, सुरैया, मुकेश, बाबामहाराज सातारकर यांचा समावेश आहे. गोविंदराव अग्नी, मोहनराव चिकरमाने व कृष्णा उद्यावरकर, बबनराव हळदणकर व ललित राव, कनिष्ठ बंधू उ. लताफत हुसेन यांनाही खाँसाहेबांनीच घडवले.

कलकत्ता (कोलकाता) येथील संगीत रिसर्च अकॅडमीने गुरू म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. त्यांना १९८० साली कोलकात्याच्या ‘संगीत रिसर्च अकादमी’तर्फे पुरस्कार देण्यात आला. त्याच वर्षी ‘पद्मभूषण’ सन्मानही त्यांना प्राप्त झाला.

— पंं. बबनराव हळदणकर

खाँ, खादीम हुसेन