Skip to main content
x

मनोहर, यशवंत राजाराम

     प्रा. यशवंत मनोहर यांचा जन्म येरला, ता. काटोल, जि. नागपूर येथे झाला. तेथील जनपद सभा प्राथमिक शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. १९६१मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर औरंगाबादच्या मिलिंद महा-विद्यालयातून ते बी.ए. (१९६५) व मराठवाडा विद्यापीठातून एम.ए. परीक्षा (१९६७) उत्तीर्ण झाले. साहित्यविषयक विशेष अभिरुची असल्याने त्यांनी काव्यलेखनास व समीक्षालेखनास १९६०मध्ये प्रारंभ केला. दैनिक अजिंठा, साप्ताहिक गावकरी ह्या नियतकालिकांतून त्यांनी लेखनास प्रसिद्धी मिळाली. त्यांनी डॉ.आंबेडकरांसंबंधी अनेक वैचारिक निबंध लिहिले. दलित कवितेला त्यांनी वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. नागपूर विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी १९८४मध्ये संपादन करून त्यांनी नागपूर विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले.

     यशवंत मनोहर यांचा पहिला कवितासंग्रह ‘उत्थानगुंफा’ (१९७७) प्रसिद्ध झाल्यानंतर ते कवी म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे त्यांचे ‘मूर्तिभंजन’ (१९९५), ‘जीवनायन’ (२००१) असे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या दलितकवितेने शोषणाचा तीव्र निषेध केला; समाजाच्या मूल्यव्यवस्थेवर त्यांच्या क्रांतिकारी कवितेने प्रहार केला. कवितेबरोबरच काव्यसमीक्षाविषयक ग्रंथही त्यांनी लिहिले. ‘शरच्चंद्र मुक्तिबोधांची कविता’ (१९९२), ‘मराठी कविता आणि आधुनिकता’ (१९९८) या काव्यसमीक्षेप्रमाणे त्यांनी इतरही समीक्षालेखन केले. ‘डॉ. आंबेडकर- एक चिंतन काव्य’ (१९८२), ‘दलित साहित्य: सिद्धांत आणि स्वरूप’ (१९७८), ‘स्वाद आणि चिकित्सा’ (१९७८), ‘बा.सी.मर्ढेकर’ (१९८७), ‘निबंधकार डॉ.आंबेडकर’ (१९८८), ‘समाज आणि साहित्य समीक्षा’ (१९९२), ‘परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये’ (१९९९) ही त्यांची समीक्षात्मक पुस्तके आहेत. यांशिवाय त्यांची ‘रमाई’ (१९८७) ही कादंबरी आणि ‘स्मरणांची कारंजी’ हे प्रवासवर्णनही प्रसिद्ध आहे.

त्यांच्या कवितेवर आंबेडकरी विचारांचा प्रभाव आहे. समीक्षेवर मात्र त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीचा ठसा उमटलेला जाणवतो.

- डॉ. रजनी अपसिंगेकर

मनोहर, यशवंत राजाराम