Skip to main content
x

पालव, अच्युत रामचंद्र

          गेली सुमारे तीन दशके कॅलिग्रफीच्या क्षेत्रात सतत नवेनवे प्रयोग करत, अच्युत रामचंद्र पालव यांनी एक प्रयोगशील सुलेखनकार म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पालव यांचे शालेय शिक्षण गिरणगावात, परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या आईचे नाव जानकी आहे.

ब्राह्मीचे बोट धरत, खारोष्टीचा हात हातात घेत देवनागरीने आजवर जो विकास साधला आहे, त्याचा शोध घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला तो १९८२ मध्ये सर जे.जे. इन्सिट्यूट ऑफ अप्लाइड ऑर्ट मधून पदविका घेतल्यानंतर. दोनच वर्षांत त्यांनी पंधराव्या ते सतराव्या शतकातील मोडीच्या विकासावर प्रबंध लिहिला. त्यांना यासाठी उल्का अ‍ॅड्व्हर्टायझिंगया संस्थेची संशोधन शिष्यवृती  मिळाली होती. उल्काचे तत्कालीन कला संचालक र.कृ. जोशी हेच पालव यांचे सुलेखनातले पहिलेवहिले गुरू होत. र.कृं.नी कवितेच्या मांडणीत काही प्रयोग केले. काव्यातला आशय व्यक्त करण्यासाठी त्यांनी पारंपरिक मांडणी बदलून प्रत्येक कवितेची दृश्यात्मक रचना केली. रकृंमध्ये कवी आणि कॅलिग्रफर यांचे दुर्मीळ रसायन होते. त्यामुळे समीक्षकांनी त्यांच्या प्रयोगांना दाद दिली.

पालवांनी आपल्या गुरूंचा हा वारसा समर्थपणे पुढे नेला, विकसित केला आणि स्वत:ची व्यक्तिविशिष्टता तयार केली. एक विशिष्ट लक्ष्य ठरविणारी दूरदृष्टी आणि ते साध्य करण्याचा ध्यास या गुणांमुळेच पालवांना आपली वेगळी ओळख निर्माण करता आली. त्यांचा हा ध्यास म्हणजे जाणतेपणाने घेतलेले एक व्रत आहे. कलेच्या क्षेत्रात सातत्याने नवनवे प्रयोग करणे अपरिहार्य ठरते. परिश्रम, जिद्द आणि सातत्य यांमुळे कलावंत मोठा होतो, कला असीमित होते. अच्युत पालवांनी  कॅलिग्रफीला लोकप्रिय केले, लोकाश्रय मिळवून दिला.

पालवांनी कॅलिग्रफीला लोकांपर्यंत नेणे हेच आपले ध्येय ठरविले. साधी, सोपी कविता सामान्य रसिकांच्या मनात घर करून राहते, हे पालव जाणून होते. अभिजात मराठी काव्यात गणना होणारे संतकाव्य घराघरांत पोहोचविण्याचा त्यांनी प्रथम प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी सुलेखन रोजनिशीहा आगळावेगळा प्रयोग केला. या अभिनव उपक्रमात त्यांनी १९९० साली संत ज्ञानेश्वरांच्या काव्याच्या आधारे पहिलीवहिली सुलेखन रोजनिशीबनविली आणि प्रकाशितही केली. नंतर १९९४ आणि १९९५ मध्ये अनुक्रमे संत तुकाराम आणि रामदास स्वामी यांच्यावर त्यांनी रोजनिश्या तयार केल्या. शब्दपुराणही सुलेखन दिनदर्शिका त्यांनी १९९६ मध्ये बनविली. हे त्यांचे प्रयोग यशस्वी झाले. कॅलिग्रफी लोकांच्या रोजच्या कामकाजात गेली, घरांतल्या भिंतींवर जाऊन बसली.

लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पालवांनी सुलेखनाचा वापर लोकोपयोगी वस्तूंसाठी केला. जाहिरात क्षेत्रात असल्याने त्यांना पणनशास्त्र अवगत होते ही जमेची बाजू होती. वस्तू विकून भरपूर नफा मिळविण्यासाठी त्यांनी या विद्येचा उपयोग केला नाही. अशा प्रयोगांतून त्यांनी सुलेखनास सर्वार्थाने उपयोजित कलेचा दर्जा मिळवून देण्यात मोलाची कामगिरी पार पाडली आहे. इंटीरिअर, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्स्टाइल, प्रॉडक्ट डिझाइन, लोगो, बॉडी पेंटिंग आणि पेंटिंग असेही सुलेखनाचे प्रयोग त्यांनी यशस्विरीत्या केले. पालव कॅलिग्रफीचे क्षितिज असे रुंद करत असताना जाणकारांनी त्यांची वेळीच दखल घेतली. त्यांचे सुलेखन नेहमीच समाजाभिमुख राहिले आहे.

त्यांनी केलेले आणि अल्लाहहे पेंटिंग तर एका वेगळ्या स्तरावर घेऊन गेले. सुलेखनाचे सौंदर्यमूल्य जाणून पालवांनी सुलेखनाला चित्रकलेची जोड दिली. सुलेखनातील दृश्यात्मकता आणि श्रवणमूल्य यांची ओळख पटवून देण्यासाठी त्यांनी वादन, गायन आणि नृत्यकलांसोबत सुलेखन सादरीकरणाचे जाहीर प्रयोग केले. सुलेखन एक चळवळ व्हावी हाच त्यांचा ध्यास होता, तो त्यांनी अशा प्रयोगांतून साध्य केला.

ही चळवळ देशव्यापी करण्यासाठी त्यांनी २००७ ते २००८ दरम्यान काश्मीर ते कन्याकुमारी असा दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी अनेक ठिकाणी सामान्य लोकांसाठी जाहीर प्रात्यक्षिके सादर केली, महाविद्यालयांमधून त्यांनी विद्यार्थ्यांनाही कॅलिग्रफीचा परिचय करून दिला.

अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या शब्दांच्या तीन शक्तींपलीकडील जी चौथी शक्ती पालवांनी सुलेखनाद्वारे शब्दांना दिली, ती म्हणजे ऊर्जा. शब्दांचे आकार, उकार, इकार आणि रफार यांमध्ये केवळ भौमितिक आकार सामावलेले नाहीत. शब्द, मग तो कोणत्याही लिपीतला असो, लिहिण्याच्या प्रत्येक फराट्यात दडलेल्या ऊर्जास्रोताचा शोध ते आजवर घेत आले आहेत. या ऊर्जेतूनच त्यांच्या सुलेखनातली कलात्मकता आणि सर्जनात्मकता प्रकटली आहे.

पालवांचे सुलेखन देवनागरीपुरते सीमित नाही. त्यांनी देवनागरीला अर्थानुरूप उर्दू, बंगाली, गुजराती लिपीचे वळणही दिले. इंग्रजीतही त्यांचा हातखंडा आहे. रशिया, जर्मनी, इंग्लंड, नेदरलँड, दुबई, फ्रान्स अशा अनेक देशांत त्यांनी प्रदर्शने आणि कार्यशाळांद्वारे मराठीला मानाचे स्थान मिळवून दिले आहे.

जर्मनीतले क्लिंग्जपोर कलासंग्रहालय प्रतिष्ठेचे मानले जाते. देवनागरीतील आपल्या संशोधनात्मक आणि अभ्यासपूर्ण सुलेखनकार्यावरील सादरीकरण पालवांनी क्लिंग्जपोरच्या संचालकांपुढे मांडले आणि पालवांच्या दोन कलाकृतींचा या संग्रहालयाने स्वीकारही केला. या कलाकृतींच्या रूपाने भारतीय कॅलिग्रफीला क्लिंग्जपोर संग्रहालयात प्रथमच हा मान मिळाला आहे. शिवाय पालवांच्या कलाकृती जर्मनीच्या स्टिफटंग अर्काइव्हया संग्रहालयाने स्वीकारल्या आहेत, तर रशियाच्या युरोपियन कंटेम्पररी म्यूझियम ऑफ कॅलिग्रफी’, मॉस्को या म्यूझियममध्ये पालवांच्या दहा कलाकृती आहेत. भारतीय सुलेखनाला बहुमान मिळवून देणारे अच्युत पालव हे पहिले भारतीय सुलेखनकार आहेत.

- सुधीर ब्रह्मे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].