Skip to main content
x

पानसे, मुरलीधर गजानन

यादवकालीन महाराष्ट्रया संशोधनपर ग्रंथाने प्रसिद्धीस आलेले डॉ. मुरलीधर गजानन पानसे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथेच झाले. १९४७ मध्ये त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली आणि त्यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयात १९४७-४९ या काळात अध्यापनाचे काम केले. डेक्कन कॉलेज, पुणे येथे १९५०-६२या काळात त्यांनी संस्कृत महाकोश योजनेत काम केले. या कामानिमित्तानेच प्रकाशित शिलालेख, ताम्रपट वाचण्याचा योग आला आणि त्यातूनच साकारला त्यांचा सुप्रसिद्ध ग्रंथ यादवकालीन महाराष्ट्र!यादवांचे साम्राज्य महाराष्ट्रावर होते. कर्नाटकातील पुष्कळसा भाग त्यांच्या ताब्यात होता. त्यांचे कोरीव लेख मराठीत आहेत, तसे कानडीतही आहेत. या ग्रंथात यादवांच्या एकंदर राज्याबद्दल किंवा त्यांच्या राजवटीबद्दल विचार केलेला नाही, तर मराठी प्रदेशातील त्या काळातील सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. हा ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांना एक वर्षाची रजा आणि एशिया फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. १९६१च्या पानशेतच्या पुरात या ग्रंथाची काही हस्तलिखित पाने आणि काही संदर्भ ग्रंथ नष्ट झाले. परंतु पुन्हा पहिल्यापासून तयारी करून पानसे यांनी या विषयावरील हा असाधारण महत्त्वाचा ग्रंथ मराठी वाचकांना सादर केलाच. १९६३ मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथाला अजूनही कोणी मागे टाकून या विषयावर अधिक केलेला अभ्यास किमान मराठीत तरी आढळत नाही; हेच पानसेंच्या अभ्यासाचे या विषयातील महत्त्व अधोरेखित करणारे आहे.

याचा अर्थ मात्र असा नाही की, पानसे या ग्रंथावरच थांबले. १९४३ मध्येच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. त्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरीच्या भाषा-वैशिष्ट्यावरील प्रबंध लिहून पूर्ण केला. प्राचीन व अर्वाचीन मराठीतील फरक जाणून घेण्याच्या दृष्टीने हा प्रबंध महत्त्वाचा ठरतो. त्यांनी अनेक संशोधनपर लेखही लिहिले. श्रीपती भट्ट यांच्या ज्योतिष रत्नमालाया संस्कृत ग्रंथाचे व त्यावरील मराठी टीकांचे संपादन व त्याची प्रस्तावना हेही पानसे यांचे भाषाविषयक संशोधन कार्यातील महत्त्वाचे योगदान मानले पाहिजे. प्राचीन मराठी, यादवकालीन मराठी, फारसी आणि अरबी मराठी भाषा, संतवाङ्मयाची भाषा, अशा अनेक भाषाविषयक लेखांबरोबरच भाषा अंतःसूत्र आणि व्यवहार’ (१९६९) या ग्रंथाचे संपादनही त्यांनी केले. त्यांनी इंग्लिशमधूनही अनेक लेख लिहिले. व्यासंग, ऐतिहासिक दृष्टी आणि मांडणीचा नेटकेपणा हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते.

१९५७ साली त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयात एम.. केले, तर १९६२-६८ या काळात पुण्याच्या डेक्कन कॉलेजात भाषा विज्ञान विभागामध्ये प्राध्यापक आणि प्रपाठक म्हणून काम केले. लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडियाचे सहकार्यवाह पद त्यांनी काही काळ भूषवले, तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भाषा समितीचे निमंत्रक म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते. वयाच्या केवळ ५२व्या वर्षी त्यांना मृत्यूने गाठले. केवळ ५२ वर्षांच्या आयुष्यात डॉ. पानसे यांनी लेखन, संशोधन, संपादन यामध्ये केलेली कामगिरी थक्क करून टाकणारी आहे, यात शंका नाही.

- डॉ. आर.एच. कांबळे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].