पाटील, जयंत गोबाजी
जयंत गोबाजी पाटील यांचा जन्म अंमळनेर तालुक्यातील रानाईचे या छोट्या खेड्यात झाला. त्याच गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले, तर माध्यमिक व पदवी शिक्षण धुळे येथे झाले. १९६६मध्ये धुळे कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) व १९६८मध्ये पुणे कृषी महाविद्यालयातून एम.एस्सी. (कृषी) ही पदवी जेनेटिक्स व प्लँट ब्रीडिंग या विषयात प्राप्त केली. १९६९ ते २००० या काळात त्यांनी दापोली, कोल्हापूर व राहुरी या ठिकाणी साहाय्यक, सहयोगी प्राध्यापक व संशोधक म्हणून काम पाहिले.
जयंत पाटील यांनी १९७२ ते १९८१ या कालावधीत मका या पिकावर संशोधन करून आफ्रिकन टॉल, मांजरी, हुनियस व पंचगंगा असे चार वाण (लेािेीळीं) विकसित केले. त्यापैकी आफ्रिकन टॉल या वैरणीच्या वाणाची आजतागायत देशात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे. १९७९मध्ये त्यांनी सिमीट-मेक्सिको येथे संशोधक शास्त्रज्ञ म्हणून तीन महिने काम केले. मक्याच्या वाणाबरोबरच कांद्याची बसवंत १४७ व लसणाचे श्वेता या वाणांच्या विकासातही त्यांचा मोठा सहभाग आहे. पाटील यांनी १९९३ ते २००० या काळात म.फु.कृ.वि. राहुरी येथे पदव्युत्तर वर्गाना शिकवण्याच्या कामाबरोबरच औषधी व सुगंधी वनस्पतींच्या योजनेतही काम केले. भारताच्या विविध भागांतून एकंदर ४०० प्रकारच्या औषधी व सुगंधी वनस्पती गोळा करून राहुरीच्या ‘धन्वंतरी बागेत’ त्याची यशस्वी लागवड केली. सध्या त्यातूनच हजारो रोपांचे वाटप दर वर्षी केले जाते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना एम.एस्सी. व पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले व २० संशोधन निबंध प्रसिद्ध केले आहेत. पाटील २०००मध्ये सेवानिवृत्त झाले.
- संपादित