Skip to main content
x

उमराणी, नारायण कृष्णाजी

          कोरडवाहू शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे सातारा येथील म्हसवड, तसेच सांगली जिल्ह्यातील आष्टे आणि इस्लामपूर येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. १९५९ मध्ये कृषी विज्ञानातील बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आणि १९६१ मध्ये कृषी विज्ञानातील एम.एस्सी. पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १९६३ मध्ये लोकसेवा आयोगाकडून कृषी महाविद्यालय, नागपूर येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांची निवड झाली. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजना सुरू केली होती, त्यात कृषिविद्यावेत्ता म्हणून कार्य करताना त्यांनी शेतकर्‍यांच्या शेतावर नवीन उन्नत कृषी तंत्राची प्रात्यक्षिके आयोजित केली. १९७१ मध्ये सोलापूर येथील कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पामध्ये त्यांची नेमणूक लक्षणीय ठरली. त्यांनी १९७२ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळवली. त्या काळात कोरडवाहू शेतीत रासायनिक खतांचा वापर होत नव्हता. सोलापूरमधील मंद्रुप (दक्षिण सोलापूर) येथील एकात्मिक कोरडवाहू विकास प्रकल्पांमध्ये पीक प्रात्यक्षिके घेऊन रासायनिक खतांची उपयुक्तता डॉ. उमराणी यांनी दाखवून दिली व नत्रयुक्त रासायनिक खतांचा वापर केल्याने रब्बी ज्वारीचे ५० ते ८० टक्के, तर बाजरीचे ८० टक्के उत्पादन वाढते, हे त्यांनी दाखवून दिले. कोरडवाहू शेतीत खतांच्या वापरासंबंधी केलेल्या कामामुळे त्यांना १९८८ मध्ये नवी दिल्ली येथील कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लि. यांच्यावतीने अत्युत्तम संशोधनाचे बक्षीस मिळाले.

          डॉ. उमराणी यांनी ‘आपत्कालीन पीक नियोजन’ ही संकल्पना १९७१ मध्ये प्रथम सोलापूर येथे राबवून पुढे हैदराबाद येथील एका चर्चासत्रात मांडली. हा देशातील पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे कृषी विभागाने आपत्कालीन पीक नियोजन करण्यास सुरुवात केली. या नियोजनाचे जनकत्व सोलापूर केंद्राकडे जाते. त्यानंतर १९७९ ते १९८१ या कालावधीत उमराणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे कृषिविद्या विषयाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यानंतर १९८१ मध्ये सोलापूर येथे कोरडवाहू शेती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून ते काम पाहू लागले. या काळात सुबाभळीच्या रांगांमध्ये रब्बी ज्वारीचे पीक घेऊन सेंद्रिय खत वापरल्यास नत्र खतांची बचत होते, हे त्यांनी सप्रयोग सिद्ध केले. अशा प्रकारचे भारतातील हे पहिलेच संशोधन होते. याशिवाय बाजरी + तूर आंतरपीक पद्धत, तसेच सूर्यफूल + तूर ही सर्वस्वी नवी पीक पद्धत त्यांनी शोधून काढली. अशा प्रकारचे विविध प्रयोग त्यांनी शेतीत राबवले. शेतकर्‍यांना त्याचा फायदा झाला. त्यांनी कोरडवाहू शेतीसंबंधात केलेले संशोधनाचे कार्य ध्यानी घेऊन भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली), कॅनडा सरकार यांच्यावतीने, तसेच वसंतराव नाईक प्रतिष्ठान, पुसद (यवतमाळ) यांच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅग्रोनॉमी यांनी सन्मानित करून, सन्माननीय सदस्यत्व बहाल केले आहे.

          महाराष्ट्रात १९७२ मध्ये पडलेल्या भयंकर दुष्काळाच्या काळात स्थापन झालेल्या सुकथनकर स्थितीशोधक समितीलाही डॉ. नारायण उमराणी यांनी महत्त्वाची माहिती देऊन सहकार्य केले. पाणलोट क्षेत्रात मृदा व जलसंधारणाची कामे, पीक नियोजन, रासायनिक खतांचा वापर, उथळ जमिनीत फळपिके असे उपक्रम राबवून पाणलोट क्षेत्र विकास करता येतो, हे त्यांनी प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या मदतीने दाखवून दिले. महाराष्ट्र शासनाने १९८६ मध्ये नेमलेल्या सुब्रमण्यम समितीला टंचाई परिस्थितीवर मात करण्याच्या उपायांसंदर्भात मार्गदर्शन केले. अवर्षणप्रवण भागाची फेररचना करण्यासाठी उपयुक्त सूत्र निर्माण करून त्याप्रमाणे अवर्षणप्रवण भागाची फेररचना करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. कोरडवाहू रब्बी ज्वारीच्या उत्पादनवाढीसाठी त्यांनी हजारो प्रात्यक्षिके घेतली. त्यांनी कोरडवाहू शेती संशोधक या नात्याने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी २५० पेक्षा जास्त संशोधनपर लेख, १०० हून जास्त मराठीत शास्त्रीय लेख, ७५ पेक्षा जास्त लेख परिसंवादाच्या निमित्ताने लिहिले आहेत. त्यांनी कोरडवाहू शेतीसंबंधीचे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. त्यांनी अन्य संपादित पुस्तकांमध्ये १२ प्रकरणे लिहिली आहेत. आदर्श गाव योजनेचे प्रमुख अण्णा हजारे यांच्याबरोबरही त्यांनी विभागीय समन्वयक म्हणून दीड वर्ष काम केले आहे. त्यांनी १९९६ मध्ये अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे पंचवार्षिक मूल्यमापन करणार्‍या समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहिले आहे. ते राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प योजनेचे कर्नाटक राज्यातील प्रकल्पाच्या मूल्यमापन समितीचे सदस्य होते. त्यांनी काही काळ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कृषीसंबंधी परीक्षेचे मूल्यांकनही केले आहे.

          डॉ. उमराणी यांनी भारतातील १२ कृषी विद्यापीठांमध्ये पीएच.डी.चे परीक्षक म्हणून काम केले. त्यांना विदर्भातील जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवलेल्या पर्जन्याश्रयी शेती प्रकल्पाचे मूल्यमापन करण्याची संधी लाभली. त्यांनी खस किंवा वाळा गवत विदर्भातील कोरड्या हवामानामुळे जैविक बांधासाठी फारसे उपयुक्त नसल्याचे निष्कर्ष काढले, तसेच पाणी नियोजनामध्ये सुधारणा होण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवलेले अनुयोजित संशोधन शेतावर राबवून पीक पद्धती, रानबांधणीसाठी उपयुक्त तंत्र निर्माण करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. उथळ व उताराच्या जमिनीला पाणी देण्यासाठी उपयुक्त पद्धत शोधून काढल्यामुळे जमिनीची धूप थांबण्यासाठी व पाण्याची बचत होण्यास मदत झाली.

          - समीर जगन्नाथ कोडोलीकर

उमराणी, नारायण कृष्णाजी