Skip to main content
x

अभिषेकी, जितेंद्र बाळकोबा

        जितेंद्र बाळकोबा अभिषेकींचा जन्म गोव्याला झाला. त्यांच्या आईचे नाव जानकी होते. गोव्यातल्या मंगेशी येथे नित्योपासना व पूजा-अर्चा करणारे त्यांचे वडील कीर्तनकार होते. त्यामुळे लहानपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. त्यांना मुळातच संगीताची आवड असल्यामुळे कीर्तनात टाळ वाजवणे, भजन म्हणणे अशी संगीताची सुरुवात घरातूनच झाली. श्रीमती गिरीजा केळेकर यांच्याकडे अभिषेकींनी संगीताचे धडे घेतले. पुढे पुणे व मुंबई येथे ते संगीत शिकायला गेले. पुण्यात ‘अनाथ विद्यार्थी गृह’ येथे शालेय शिक्षणाच्या काळात त्यांना रामकृष्णबुवा वझे यांचाही सहवास मिळाला. मुंबईला त्यांचा परिचय उस्ताद अजमत हुसेन खाँ यांच्याशी झाला व त्यांना खुर्जा घराण्याची तालीम मिळाली.
        मुंबईला त्यांनी काही काळ आकाशवाणी केंद्रावर कोकणी विभागात काम केले. त्या काळात अनेक कोकणी गीतांना आणि श्रुतिकांना चाली लावण्याची संधी त्यांना मिळाली. त्याच वेळी त्यांना सुप्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे यांच्याकडे बिल्हण संगीत संयोजन व गायन करण्याची संधी मिळाली. ‘माझे जीवनगाणे’ व ‘शब्दावाचून कळले सारे’ ही गीते जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आली. या गीतांनी त्यांना फार मोठी लोकप्रियता लाभली. एच.एम.व्ही.द्वारे १९६० साली प्रकाशित, विलासखानी तोडी व मारवा या रागांच्या ध्वनिमुद्रिकेने त्यांना एक ख्यालिया म्हणून मान्यता मिळवून दिली. तेव्हा त्यांची सांगीतिक रचना-प्रतिभा लोकांसमोर आली. त्यांनी अनेक कोकणी गीतांना चाली देऊन ती आकाशवाणीवर सादर केली. अभिषेकींचा १९५९ मध्ये जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याशी परिचय झाला. त्यांच्याकडे अनेक वर्षे तालीम घेण्याची त्यांना संधी मिळाली. जगन्नाथबुवांचे ते लाडके शिष्य होते. याव्यतिरिक्त रत्नकांत रामनाथकर, निवृत्तीबुवा सरनाईक, आरोळकरबुवा, अजिजुद्दीन खाँ यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांना १९६९ मध्ये होमी भाभा शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी जयपूर घराण्याचे गायक गुलूभाई जसदनवाला यांची अनवट रागांची तालीम घेतली. मधुमक्षिकेच्या वृत्तीने त्यांनी सर्व गुरूंकडून जे काही चांगले आहे, ते आत्मसात केले. एक व्यासंगी गायक म्हणून ते परिचित होते.
      मुंबईला ते ‘धी गोवा हिन्दू असोसिएशन’ या संस्थेची संगीत शाखा सांभाळीत होते. त्यातूनच संगीत नाटकाला संगीत दिग्दर्शन करण्याची संधी १९६४ साली उपलब्ध झाली. ‘मत्स्यगंधा’ हे त्यांचे पहिले संगीत नाटक होय. त्यातील पदांच्या चाली खूप गाजल्या. संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती पसरू लागली.मराठी संगीत रंगभूमीच्या संदर्भातही जितेंद्र अभिषेकींचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मराठी नाट्यसंगीतास ६०च्या दशकानंतर पुन्हा नवा बहर आणणार्‍या संगीतकारांत अभिषेकींचे कार्य अग्रगण्य आहे. त्यांनी प्रचलित व अप्रचलित रागांत, ख्याल, ठुमरी, टप्पा, गझल, भावगीत अशा नाना ढंगांच्या स्वररचना नाटकासाठी केल्या. तसेच पोर्तुगीज, पॉप प्रकारच्याही रचना करून मराठी संगीत रंगभूमीवर नवा रंग आणला. ‘अभिषेकीप्रणित नाट्यसंगीत’ हे नवे वळण आज मराठी जनमानसात रुजले आहे.
     त्यांनी संगीत दिलेली नाटके अशी आहेत : ‘मत्स्यगंधा’ - वसंत कानेटकर (१९६४);  ‘ययाति आणि देवयानी’ - वि.वा. शिरवाडकर, ‘लेकुरे उदंड जाहली’ - वसंत कानेटकर (१९६६); ‘नयन तुझे जादूगार’, ‘कट्यार काळजात घुसली’ - पुरुषोत्तम द्वारव्हेकर, ‘वासवदत्ता’ - मीना पेठे (१९६७); ‘मन पाखरू पाखरू’ - शं.ना. नवरे (१९७०); ‘मीरामधुरा’ - वसंत कानेटकर (१९७१) ; ‘हे बंध रेशमाचे - रणजित देसाई, ‘सोन्याची द्वारका’ - अनंत आळतेकर (१९७२); ‘धाडिला राम तिने का वनी’ - द.ग. गोडसे, बिकट वाट वहिवाट - व्यंकटेश माडगूळकर (१९७६); ‘गोरा कुंभार’ - अशोक परांजपे, ‘कांते फार तुला’ - बाळ कोल्हटकर (१९७८); ‘महानंदा’ - अशोक परांजपे (१९७९) ; ‘कधीतरी कोठेतरी’ - पुरुषोत्तम दारव्हेकर, ‘देणार्‍याचे हात हजार’ - बाळ कोल्हटकर (१९८०) ; ‘अमृतमोहिनी’ - यशवंत रांजणकर (१९८२) ; ‘तू तर चाफेकळी’ - वसंत कानेटकर (१९९६). यांपैकी ‘मत्स्यगंधा’, ‘ययाति-देवयानी’, ‘लेकुरे’, ‘कट्यार’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘गोरा कुंभार’ या नाटकांतील पदे विशेष लोकप्रिय ठरली.  ‘भाव तेथे देव’ या एकाच मराठी बोलपटास १९६१ साली त्यांचे संगीत लाभले. काही मोजक्या चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले. ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’ हे त्यांनी गायिलेले चित्रपटगीत लोकप्रिय झाले.
     एक आदर्श गायक म्हणून भारतभर त्यांचा नावलौकिक होता. जयपूर, आग्रा अशा विविध घराण्यांच्या गायकीचा अभ्यास करून त्यांनी स्वत:ची अशी स्वतंत्र शैली निर्माण केली. त्यांचे स्वर लगाव, रागमांडणीची पद्धत, तानांचे प्रकार यांचे अनुकरण त्यांचे अनेक शिष्य करतात. त्यातून ‘अभिषेकी पठडी’  संगीत अस्तित्वात आले असे म्हणावयास हवे. एक बंदिशकार म्हणूनही त्यांनी प्रभावी रचना केल्या. त्यांच्या सुमारे ५० बंदिशींपैकी यमन (झपतालातील तराणा), रागेश्री, झीलफ, दिन की पूरिया, गांधारकंस, मनोरंजनी, मधुरंजनी या रागांतील बंदिशी प्रचलित झाल्या. मराठी अभंगांना त्यांनी दिलेल्या चाली केवळ आकर्षकच नसून शब्दानुरूप आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेबरोबरच उत्तर भारतातील कबीर, मीरा आणि तुलसीदास यांच्या साहित्याचा अभ्यास केला. ते १९७० साली पं. रविशंकरांच्या संगीत प्रकल्पांतर्गत गायक म्हणून अमेरीकेस गेले होते. नंतर ८० व ९० च्या दशकात त्यांनी ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, युरोप, रशिया, आफ्रिका व आखाती देशांत गायनाचे दौरे केले. गायक, संगीतकार, तत्त्वचिंतक यांप्रमाणे एक आदर्श गुरू म्हणूनही ते सुपरिचित होते. अनेक विद्यार्थी त्यांच्या घरी राहून संगीताचे शिक्षण घेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी १९७४ साली लोणावळा येथे गुरुकुलाची स्थापना केली. त्यातून अनेक शिष्य तयार झाले. त्यांच्या तालमीत प्रभाकर कारेकर, देवकी पंडित, राजा काळे, अजित कडकडे, शौनक अभिषेकी असे उत्तम गायक तयार झाले. 
     जितेंद्र अभिषेकी यांना ‘पद्मश्री’ (१९८८), संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९८९), ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार (१९९०), लता मंगेशकर पुरस्कार (१९९६) व ‘बालगंधर्व पुरस्कार’ (१९९७) आदी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ते १९९५ साली अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते. त्यांचे प्रदीर्घ आजाराने अडुसष्टाव्या वर्षी पुण्यात निधन झाले.

     — विकास कशाळकर, चैतन्य कुंटे

अभिषेकी, जितेंद्र बाळकोबा