Skip to main content
x

आचरेकर, मुरलीधर रामचंद्र

आचरेकर मुरलीधर

रेखाटन, जलरंग व तैलरंग या तीनही माध्यमांवर प्रभुत्व असणारे चित्रकार व हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कलादिग्दर्शक म्हणून आचरेकर प्रसिद्ध होते.  त्यांचा जन्म पनवेलजवळ ‘आपटे’ या गावी झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्राच्या कलाजगतात  वास्तववादी शैलीत कलानिर्मिती करणारे अनेक कलाकार निर्माण झाले. त्यांत एम.आर. आचरेकरांचे नाव आणि त्यांची विविधांगांनी नटलेली कलानिर्मिती अखिल भारतीय पातळीवर मान्यता पावली.

आचरेकरांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यांचे शालेय शिक्षण बेताचेच झालेले होते, म्हणजे नॉन-मॅट्रिक. शालेय शिक्षणाची आवड नसल्याने ते मोठ्या बंधूंबरोबर मुंबईला आले. गिरगावातील ‘केतकर आर्ट इन्स्टिट्यूट’मध्ये वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांनी चित्रकलेचे रीतसर धडे घ्यायला सुरुवात केली.  शिक्षण घेऊन त्याच कला संस्थेत ते शिक्षक म्हणून १९२३ पर्यंत शिकवू लागले. चित्रकलेबरोबर ते छायाचित्रणकलादेखील शिकले.

चित्रकलेतली आचरेकरांची विशेष गती पाहून सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना थेट अ‍ॅडव्हान्स वर्गात प्रवेश दिला गेला; परंतु ऐन परीक्षेच्या वेळी टॉन्सिल्सच्या आजारामुळे ते परीक्षेचा पेपर पूर्ण करू न शकल्यानेे जी.डी.आर्टची अधिकृत शासकीय कला पदविका त्यांना प्राप्त झाली नाही.

वयाच्या सोळाव्या वर्षी ‘चित्रमय जगत’ या नियतकालिकात त्यांचे जलरंगातील पारंगतता दाखविणारे एक चित्र प्रकाशित झाले होते. १९२३ ते १९२८ च्या काळात छायाचित्रणकला आणि शिळामुद्रण पद्धतीचा (लिथोग्रफी) अभ्यास करून त्यांनी स्वतःचा ‘लिथो’ प्रेस सुरू केला. परंतु जे.जे.चा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता प्रेस बंद करून त्यांनी पूर्णवेळ चित्रकलेचा अभ्यास चालू ठेवला. प्रारंभीच्या काळात निसर्गचित्रण, व्यक्तिचित्रण आणि मानवाकृती रचनाचित्रे रंगवून ते अनेक पारितोषिकांचे मानकरी ठरले.

आचरेकरांच्या ‘कॉन्सेन्ट्रेशन’ या व्यक्तिचित्राला १९२९ मध्ये भावनगर महाराजांचे पारितोषिक प्राप्त झाले. पुढे याच चित्राला बंगलोर (बंगळुरू) व नागपूरच्या प्रदर्शनात सुवर्णपदक दिले गेले. तसेच, हे चित्र लंडनच्या इंपीरिअल इन्स्टिट्यूटमध्ये प्रदर्शित झाले असता तिथल्या वर्तमानपत्रांतही त्याची विशेष दखल घेतली गेली.

त्यांनी १९२९ मध्ये रंगविलेले Toilet (टॉयलेट) हे चित्र गाजले. हे तैलचित्र आजही जे.जे.च्या संग्रही पाहावयास मिळते. या चित्रातील नाट्यपूर्ण प्रकाशयोजना, आरशातील प्रतिबिंबाची अचूकता, महिलेच्या नऊवारी साडीच्या चुण्या आणि चेहऱ्यावरील हावभाव या गोष्टी आचरेकरांच्या वास्तववादी कौशल्याची परिसीमा दाखविणाऱ्या आहेत. आचरेकरांच्या ‘प्रेयर’ या  चित्राला १९३० मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक आणि ‘रिपोझ’ या चित्राला १९३१ मध्ये सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. त्यांनी १९३२ ते ३४ या काळात लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ आर्टमध्ये चित्रकलेच्या उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतला. याच काळात त्यांनी गांधीजी व ब्रिटिश सरकार  यांच्यातील ‘गोलमेज परिषद’ हे इतिहासप्रसिद्ध चित्र रंगविले.

भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड विलिंग्डन यांनी १९३५ मध्ये विशेष शिफारस करून आचरेकरांना पंचम जॉर्जच्या राज्यारोहणाच्या रौप्यमहोत्सवी समारंभाची चित्रे रंगविण्यास लंडनला पाठवले. पुढे १९३७ ते १९३९ ही दोन वर्षे ते सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे उपसंचालक म्हणून कार्यरत होते; परंतु प्रशासकीय कामात विशेष रुची नसल्याने ते फार काळ या पदावर राहिले नाहीत. स्वतंत्र कलानिर्मितीसाठी दोन वर्षांतच  त्यांनी जे.जे.मधील हे पद सोडून प्रथम दिल्ली आणि नंतर मुंबईत स्टूडिओ थाटला व त्यानंतर ‘आचरेकर्स अकॅडमी’ सुरू केली.त्यांच्या चित्रांचे पहिले एकल प्रदर्शन दिल्लीला भरविले असता त्याचे उद्घाटन मंडीच्या महाराजांनी केले. ‘शहाजहान’ या चित्रपटासाठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक कर-दार यांना इस्लामी आणि हिंदू स्थापत्यकलेचा विशेष अभ्यास असलेला कलादिग्दर्शक हवा होता. याच चित्रपटापासून आचरेकरांची चित्रपट क्षेत्रातली कलादिग्दर्शनाची कारकीर्द सुरू झाली.

‘आचरेकर कला अकादमी’त सुप्रसिद्ध सिनेनट पृथ्वीराज कपूर स्वतः रेखांकन शिकायला येत. त्यामुळे  ‘आर.के.’ ग्रूपशी ते जोडले गेले आणि राजकपूरच्या ‘आर.के.’ स्टूडिओचे अधिकृत कलादिग्दर्शक म्हणून  आचरेकरांनी दीर्घकाळ काम केले. चित्रातले परिप्रेक्ष्य (पर्स्पेक्टिव्ह) आणि चित्रपटातील ‘सेट’ची रचना यांचा तौलनिक अभ्यास करून कॅमेऱ्यात चौकटीत अपेक्षित अशी रचना सेटवर कशी भासमान करायची याची आचरेकरांना नेमकी जाण होती. ‘श्री ४२०’ चित्रपटाच्या सेटवर दूरवर गेलेल्या रस्त्याचे परिप्रेक्ष्य दाखवताना रस्त्याच्या कडेला असलेल्या दिव्यांच्या खांबांची रचना आणि दिव्यांच्या प्रकाशाची तीव्रता यांचा मोठ्या खुबीने उपयोग केला होता. हे समीकरण एक यशस्वी चित्रकारच जुळवू शकतो.

राजकीय पुढारी, नामवंत व्यक्ती, गायक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक सिनेकलावंत, सिनेतारकांची व्यक्तिचित्रे आचरेकरांनी त्या-त्या व्यक्तींना समोर बसवून रंगवली. यांपैकी गुरुदत्त, नर्गीस, वहीदा रहमान, लता मंगेशकर, मीनाकुमारी यांची व्यक्तिचित्रे विशेष गाजली.

व्यक्तिचित्रांप्रमाणेच ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित अशी आचरेकरांनी रंगविलेली समूहचित्रे त्या-त्या प्रसंगांचे मूर्तिमंत चित्र उभे करतात. कारण, काही प्रसंगांची चित्रे त्यांनी प्रत्यक्ष समारंभात हजर राहून केलेल्या स्केचेसच्या आधारे रंगविलेली आहेत. बडोदा संस्थानच्या गायकवाड महाराजांच्या राज्याभिषेक समयीची चित्रे काढण्याकरिता आचरेकरांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या अशा समारंभचित्रात विशिष्ट व्यक्तींचे साधर्म्य, स्थान महत्त्व आणि चित्ररचनेतील परिप्रेक्ष्य  यांत कमालीची परिपक्वता आणि अचूकता दिसून येते.

अशा प्रकारच्या प्रसंगचित्रात मानवाकृतींबरोबर तत्कालीन वस्तूंची अचूक नोंद, पेहराव आणि अलंकरणयोजना अभ्यासपूर्ण असे. चित्रांतील असे तपशील त्या विषयांस अनुरूप असे अस्सल वातावरण निर्माण करीत. लंडनची गोलमेज परिषद, १९४७ मधील देश स्वतंत्र झाला तो सोहळा व १९६० मधील महाराष्ट्र राज्याची स्थापना ही त्यांची चित्रे याची साक्ष देतात. अशा व्यावसायिक चित्रांव्यतिरिक्त आचरेकरांनी स्वान्तसुखाय अनेक चित्रांची निर्मिती केल्याचे आढळते. यात निसर्गचित्रांपासून व्यक्तिचित्रांपर्यंत व अनेक मानवाकृती असलेल्या रचनाचित्रांपासून ते लोकजीवनातील सामान्य प्रसंगांवरील चित्रांपर्यंत समावेश आहे. अशी चित्रे विविध माध्यमांत असून त्यांतील जोम व जोश पेन्सिल, पेन किंवा ब्रशच्या स्ट्रोक्समधून जाणवतो. पेन्सिल रेखाटनात ते तिरप्या वेगवान स्ट्रोक्सचा वापर करीत. त्यांची जलरंगातील प्रात्यक्षिके पाहणे हा एक विलक्षण अनुभव असे.

आचरेकरांनी देश-विदेशांत भरपूर प्रवास केला. १९५२ मध्ये मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिका यांच्या निमंत्रणावरून त्यांनी इंडियन फिल्म डेलिगेशनचे सदस्य म्हणून अमेरिकेत प्रवास केला. त्यांना १९५७ व ५९ मध्ये कलादिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळाला. प्रवासात ते स्केचबुक सतत जवळ बाळगत. त्यात पेन्सिल, पेन किंवा जलरंगात दु्रतगतीने रेखांकन करणे हा त्यांचा नित्यनेम होता. समोरच्या व्यक्तींचे साधर्म्य साधून ते अचूक रेखांकन करीत. चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींबरोबर विदेश दौऱ्यावर गेले असता त्यांनी केलेली काही प्रत्यक्ष रेखाटने त्यांच्या ‘स्क्रेपर्स अ‍ॅण्ड फ्लाइंग गंधर्वाज’ या पुस्तकात छापली  आहेत. या पुस्तकास राष्ट्रपती ताम्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

व्ही.आर. आंबेरकर व दीनानाथ दलाल हे आचरेकरांचे समकालीन चित्रकार आणि जवळचे मित्र होते. आचरेकरांच्या पुस्तकातील लेखांसाठी आंबेरकरांनी भरपूर साहाय्य केले आणि बडोद्याच्या राजवाड्यातील अनेक चित्रे रंगविण्यात दलालांचाही सहभाग होता.

चित्रकलेइतकेच चित्रपट, कलादिग्दर्शन, पुस्तक प्रकाशन आणि कलाशिक्षण अशा विविध क्षेत्रांत आचरेकरांचे मौलिक योगदान आहे. या सर्व क्षेत्रांतील कामगिरीबद्दल त्यांना वेळोवेळी अनेक पुरस्कार आणि गौरव प्राप्त झाले. आचरेकरांना १९६८ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

आचरेकरांची स्वतःची ‘रेखा पब्लिकेशन’ ही प्रकाशनसंस्था होती. त्यांचे ‘रूपदर्शनी’ हे पुस्तक त्या वेळी विशेष गाजले. भारतीय शिल्पाकृतींची रेखाटने आणि वास्तववादी शैलीतील शरीरप्रमाणबद्धतेचा तौलनिक अभ्यास त्यांनी या पुस्तकांतून मांडला. प्राचीन भारतीय शिल्पकारांना शरीरशास्त्राचे ज्ञान होते आणि त्याची जाण ठेवून त्यांनी आदर्शवादी लय शिल्पांतून व्यक्त केली असल्याचे प्रमाण ‘रूपदर्शनी’ या पुस्तकातील रेखाचित्रांतून स्पष्ट होते.

आचरेकरांनी अनेक पुस्तकांसाठी व्यावसायिक रेखांकनेही केली. पु.ल. देशपांडे लिखित ‘गांधीजी’, ‘पंडित जवाहरलाल नेहरू’, ‘आपला महाराष्ट्र’, तसेच पाठ्यपुस्तकांतील इतिहासाच्या पानोपानी झळकणारी, तसेच राजकीय आणि सामाजिक नेत्यांची आचरेकरांची रेखाचित्रे हा चिरंतन ठेवा आहे.

आचरेकर स्वतः वास्तववादी चित्रकार असले तरी कलाक्षेत्रातील नवनिर्मिती आणि अमूर्तवादी कलेविषयी त्यांचे मतभेद नव्हते. कलाकाराने आपआपल्या आवडीचे काम करावे असे त्यांचे प्रांजळ मत होते. कलाक्षेत्रातील नवनवीन प्रयोग ते जाणून घेत. परंतु प्रत्यक्ष त्या धर्तीचे काम त्यांनी कधी केले नसावे.

राष्ट्रपती भवनाच्या प्रथेप्रमाणे १९७९ साली आचरेकरांना तत्कालीन राष्ट्रपती संजीव रेड्डी यांचे पूर्णाकृती तैलचित्र करण्यासाठी दिल्लीला आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, दिल्लीच्या फलाटावर उतरताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि या कलामहर्षी चित्रकाराचे जागीच निधन झाले.

-वासुदेव कामत

आचरेकर, मुरलीधर रामचंद्र