Skip to main content
x

अणे, माधव श्रीहरी

      भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील थोर नेते माधव श्रीहरी अणे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या अध्ययनात संस्कृत भाषेला खास प्राधान्य होते. वकिली व्यवसाय करीत असतानाच त्यांनी अनेक सार्वजनिक संस्थांमधून सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष या नात्यांनी कामे केली. त्यांनी लोकमतहे साप्ताहिक काही वर्षे चालवले. १९२८ साली ग्वाल्हेरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. लोकमान्य टिळकांचे ते कट्टर अनुयायी होते. त्यांनी १९४९मध्ये संस्कृत भाषेत तिलक यशोर्णवया शीर्षकाने टिळकांचे चरित्र लिहिले. लोकमान्य टिळकांच्या होमरूल लीगचे ते एक प्रमुख प्रचारक अनुयायी होते. टिळकांनी त्यांना होमरूल लीगचे उपाध्यक्षपद दिले होते. लोकमान्यांच्या मृत्यूनंतर ते महात्मा गांधींच्या असहकार चळवळीकडे आकृष्ट झाले. काँग्रेसच्या विविध अधिकारपदांवर त्यांची नियुक्ती झाली. यातूनच दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एक अभ्यासू सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली; परंतु महात्मा गांधींनी ऑगस्ट १९४२ रोजी छोडो भारत चळवळ सुरू करून पुढे उपोषण केले, तेव्हा त्यांनी महात्मा गांधींना सहानुभूती दर्शविण्याकरिता १९४३मध्ये कार्यकारी मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी वाचन-लेखन यांचा व्यासंग जोपासला. त्यांच्या बहुविध कार्यामुळे लोकांनी त्यांना लोकनायकही उपाधी दिली.

संपादित

अणे, माधव श्रीहरी