आपटे, शांता महादेव
ज्येष्ठ दिग्दर्शक आणि लेखक शांताराम आठवले यांनी आपल्या ‘प्रभातकाल’ या ग्रंथात शांता आपटे यांच्या नावाचा उल्लेख ‘प्रभातचे कुंकू’ असा केलेला आहे. शांता महादेव आपटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील दुधणी या गावी झाला. त्या गावच्या रेल्वे स्थानकावर त्यांचे वडील महादेव गोविंद आपटे स्टेशन मास्तर म्हणून काम करत असत. तसेच वेळप्रसंगी देवळात कथेकरी बनून कीर्तनकाराची भूमिकाही सांभाळत. घरातच संगीताची परंपरा असल्यामुळे शांता आपटे यांनाही संगीताची गोडी आपोआपच लागली. शालेय शिक्षण करताकरताच त्या मेळ्यातून कामे करू लागल्या. दिग्दर्शक नानासाहेब सरपोतदारांनी शांताबाईंची मेळ्यातली कामे आणि गायनकला पाहून सरस्वती सिनेटोनचे मालक दादासाहेब तोरणे यांच्याजवळ त्यांच्या नावाची शिफारस केली. तोरणे १९३० च्या सुमारास पुण्यात ‘श्यामसुंदर’ या हिंदी-मराठी बोलपटाचा डाव मांडून बसले होते. त्यांनी नानासाहेब सरपोतदारांच्या शिफारशीमुळे शांता आपटे यांना चित्रपटात राधेची भूमिका दिली. त्या सुमारास शांता आपटे यांचे वय १४ वर्षांचे होते. शांता आपटे यांची भूमिका असणारा ‘श्यामसुंदर’ बोलपट मुंबईच्या वेस्टएंड (आताचा नाझ) थिएटरमध्ये सर्वप्रथम झळकला. तेथे तो सतत पंचवीस आठवडे पडद्यावर तळ ठोकून होता. शांता आपटे यांनी त्या बोलपटात गायलेले ‘उदयाचलि सविता’ हे गाणे लोकप्रिय झाले.
प्रभात फिल्म कंपनी त्या वेळेस कोल्हापुरात आपले चित्रपट तयार करत असे. त्यांनी शांता आपटे यांना ‘अमृतमंथन’ (१९३४) बोलपटात काम करण्यासाठी बोलावून घेतले. दिग्दर्शक होते व्ही. शांताराम. त्यांनी शांता आपटे यांच्यावर विशेष मेहनत घेऊन त्यांच्याकडून कसदार अभिनय करून घेतला. ‘अमृतमंथन’च्या हिंदी आवृत्तीत शांताबाई यांनी गायलेले ‘कमसीन मे अब’ हे पंजाब प्रांतात खूपच गाजले. चित्रपटही भारतभर गाजला. शांता आपटे हे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. प्रभातमध्ये शांता आपटे यांनी ‘अमरज्योती’, ‘वहाँ’, ‘गोपालकृष्ण’, ‘कुंकू’ असे एकाहून एक बहारदार बोलपट केले.
‘कुंकू’ हा चित्रपट होता स्त्रीवरील अन्यायाचे चित्रण करणारा, त्यातील शांता आपटे यांची ‘नीरा’ या बंडखोर नायिकेची भूमिका खूपच गाजली. पडद्यावरची पहिली बंडखोर नायिका म्हणून आजही शांता आपटे यांचेच नाव घेतले जाते.
आपण प्रभातची मुख्य नटी असताना ‘माणूस’ चित्रपटासाठी बाहेरची नटी प्रमुख भूमिकेसाठी आणली व आपल्यावर अन्याय झाला, असा शांता आपटे यांचा समज झाला व त्यामुळे रागावून त्यांनी प्रभात चित्रपट कंपनीच्या बाहेर जाहीर उपोषणास सुरूवात केली. त्यांच्या मागण्या होत्या - आपल्या पगारात पाचशे रुपयांची वाढ अथवा प्रभातच्या करारातून मुक्तता. प्रभातने शांता आपटे यांचा करार रद्द करून आपली सुटका करून घेतली.
शांता आपटे यांची प्रभातच्या करारातून सुटका झाली ही बातमी कळताच त्यांना मद्रास (आता चेन्नई) येथून ‘सावित्री’ या तमिळ चित्रपटासाठी बोलावणे आले. त्याच बरोबर लाहोर येथून पांचोली या प्रख्यात फिल्म कंपनीच्या ‘जमिंदार’ या हिंदी भाषेतील बोलपटासाठी त्यांना आमंत्रण आले. शांता आपटे यांनी दोन्ही चित्रपटांच्या ऑफर्स स्वीकारल्या. त्याचबरोबर स्वतःचे ‘ब्रॅँडनेम’ तयार केले, तो ‘एस. ए. कर्न्सच्या सौजन्याने’. ही अक्षर त्यांच्या नावासमोर ठळकपणे चित्रपटाच्या श्रेय नामावलीत, जाहिरातीत व प्रसिद्धी पत्रकातून देण्यात यावीत, तसेच श्रेयनामावलीत शांता आपटे हे नाव पडद्यावर सर्वप्रथम दाखवण्यात यावे व त्यानंतर नायक आणि इतर कलावंतांची नावे देण्यात यावीत. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात स्वतःचे ‘ब्रॅँडनेम’ प्रस्थापित करणारी पहिली व्यक्ती म्हणून शांता आपटे यांचा उल्लेख केला पाहिजे.
‘सावित्री’ बोलपटासाठी मद्रासला जाऊन त्यांनी तमिळ भाषा आत्मसात केली. यात त्यांनी अभिनयासह गाणीही गायली. हा चित्रपट त्या काळी खूपच गाजला. त्यानंतर त्या लाहोरला गेल्या. ‘जमिंदार’ या चित्रपटात त्या पंजाबी पोशाखातील पहिली मराठी चित्रतारका म्हणून पडद्यावर झळकल्या. त्या चित्रपटातील ‘छोटासा संसार मेरा’ हे गाणे त्या वेळेस अखंड भारतात प्रचंड गाजले. त्या गाण्याच्या रॉयल्टीने पांचोली पिक्चर्सचा कोष धनराशींनी भरून गेला. ‘जमिंदार’ बोलपटही खूपच लोकप्रिय ठरला. लाहोरमध्ये असताना शांता आपटे पंजाबी भाषा शिकल्या आणि उर्दू लिपीतले लेखन वाचू लागल्या. ही शांताबाईंच्या जिद्दीची कमाल म्हणावी तितकी थोडीच आहे.
१९४२ सालातच सिर्को संस्थेतर्फे ‘अपना घर’-‘आपले घर’ हा चित्रपट हिंदी-मराठी भाषेत तयार करण्याची तयारी सुरू होती. दिग्दर्शनासाठी कलकत्त्याहून देवकी बोस यांना खास बोलावून घेण्यात आले. शांता आपटे आणि चंद्रमोहन ही प्रभातची नामवंत मंडळी त्यात होती. सोबत नायमपल्ली, विमल वशिष्ठ, डेव्हीड, गोप आणि महेश कौल यांसारखे ताकदीचे कलाकार होते. ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढ्याला जोर चढण्याचा तो काळ होता. स्वाभाविकच ब्रिटिश सरकारला चकवण्यासाठी चित्रपटात नवरा (चंद्रमोहन) म्हणजे ब्रिटिश राजवट, तर पत्नी (शांता आपटे) ही कैदी आणि घर म्हणजे भारत असे प्रतीकात्मक अर्थ देऊन देवकी बोस यांनी पटकथेची बांधणी केली होती. या चित्रपटात शांता आपटे आणि चंद्रमोहन यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहावयास मिळाली. हा चित्रपट मुंबईच्या कृष्ण सिनेमात १३ फेब्रुवारी १९४२ ला दाखवण्यात आला आणि पुढे ऑगस्टच्या महिन्यात ‘चले जाव’ ही चळवळ सुरू झाली. चित्रपटात शांता आपटे यांची तडफदार भूमिका पडद्यावर पाहून प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत असे. या चित्रपटातले शांताबाईंनी गायलेले ‘ते अपुले घर, ते नाही रे नाही, अपुले घर ते नाही’ हे गाणे खूपच गाजले. गाण्याचे बोल होते शांताराम आठवले यांचे.
‘फिल्म इंडिया’ या मासिकातून झालेली आपली निंदानालस्ती सहन न होऊन शांता आपटे यांनी फिल्म इंडियाच्या कार्यालयामध्ये जाऊन आपल्या बदनामीचा निषेध धाडसाने नोंदवला. शांता आपटे यांचे हे नवे रूप लोकांच्या नजरेसमोर आले. पडद्यावरची बेडर नायिका ही प्रत्यक्ष जीवनातही तशीच बेडर असते, हे आपल्या कृतीने शांता आपटे यांनी सिद्ध केले. ‘भाग्यरेखा’, ‘कुंकवाचा धनी’, आणि ‘मै अबला नही हूँ’ हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. पुढे शांता आपटे यांचे ‘भाग्यलक्ष्मी’ (दिग्दर्शक सर्वोत्तम बदामी), ‘कादंबरी’ (दिग्दर्शक नंदलाल जसवंतलाल) हे चित्रपट गाजले. ‘कादंबरी’ हा चित्रपट संस्कृत नाटकावर बेतला होता. चित्रपटात शांता आपटे यांच्यासमवेत वनमाला आणि पहाडी संन्यास यासारखे तगडे कलाकार होते. हा चित्रपट बऱ्यापैकी चालला. नंतर आलेला ‘सावन’ पडद्यावर सपशेल कोसळला. नायक होता मोतीलाल आणि संगीत सी.रामचंद्र यांचे होते. दादा गुंजाळ दिग्दर्शित चित्रपट ‘पनीहारी’ चांगला झाला होता. सुरेंद्र आणि शांता आपटे यांच्या गाण्यांनी कानसेनांवर गारूड केले आणि तिकिटाच्या बारीवर पैशाचा पाऊस पडला.
‘सुभद्रा’ हा मा. विनायक यांचा बहुचर्चित चित्रपट. यात शांता आपटे यांनी रंगवलेली सुभद्रा अप्रतिम वठली होती. हा चित्रपट मुंबईच्या कारदार स्टुडिओत सुरू झाला. मा.विनायक यांच्या कामाची पद्धत म्हणजे शॉट मनासारखा होईपर्यंत शॉटचे अनेक रिटेक होत असत. चित्रीकरणाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत असे. त्या वेळेत शॉट पूर्ण होत नसे. साहजिकच ओव्हर टाईम करावा लागत असे. शांता आपटे या वेळेच्या बाबतीत फारच काटेकोर असत. पाच वाजल्यानंतर त्या आपला मेकअप उतरवून स्टुडिओ बाहेर पडत. मा. विनायक त्यांना हा चित्रपट शक्यतो लवकर संपवायचा होता. त्यामुळे शांता आपटे यांना मोबदला वाढवून देण्यात आला. चित्रीकरण लांबल्यामुळे कारदार स्टुडिओचा फायदा झाला. चित्रपट पूर्ण होऊन मुंबईच्या रॉक्सी सिनेमागृहात मोठ्या थाटामाटात प्रदर्शित झाला आणि दुसऱ्याच आठवड्यात बॅरिस्टर जीना यांनी डायरेक्ट अॅक्शनचा नारा दिला. देशात जातीय दंगली उसळल्या आणि त्यात सुभद्रा चित्रपटाची आहुती पडली.
शांता आपटे यांनी त्यानंतर ‘उत्तरा अभिमन्यू’, ‘वाल्मिकी’ , ‘मंदिर’, ‘स्वयंसिद्धा’ आणि ‘मै अबला नहीं हूँ’ सारखे हिंदी चित्रपट केले. त्यांनी ‘स्वयंसिद्धा’ चित्रपट हा कलकत्त्याला जाऊन केला आणि ‘मै अबला नहीं हूँ’मध्ये अभिनयाबरोबर चित्रपटाला संगीत दिले.
हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलेल्या शांता आपटे यांनी नंतरच्या काळातही मराठी बोलपटातून अभिनय केला. ‘भाग्योदय’, ‘जागा भाड्याने देणे आहे’, ‘शिलांगणाचं सोनं’ यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांना त्यांचे दर्शन झाले, पण त्यात पूर्वीची चमक नव्हती. गुजराती चित्रपटातून आणि मराठी रंगभूमीवर त्यांनी भूमिका केल्या.
शांता आपटे यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्या प्रसंगी आचार्य अत्रे यांनी मराठा दैनिकांतून अग्रलेख लिहून शांता आपटे यांना आदरांजली वाहिली. यावरून शांता आपटे यांची अभिनय आणि संगीत या क्षेत्रातली थोरवी ध्यानात यावी. शांता आपटे यांनी ‘जाऊ मी सिनेमात’ हे पुस्तक लिहिले. त्याचा प्रकाशन सोहळा रत्नागिरीत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात संपन्न झाला होता.
- द.भा. सामंत