Skip to main content
x

बाबर,सरोजिनी कृष्णराव

     डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर ह्यांचा जन्म बांगणी (जिल्हा सांगली) येथे झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इस्लामपूर येथे झाले. वडील शिक्षक असल्याने बालवयातील संवेदनक्षम मनावर शैक्षणिक वातावरणाचा, अभ्यासाचा परिणाम होत होता. विविध क्षेत्रांतील नामवंत मंडळींची उठबस घरात असल्यामुळे बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडण्याची बीजे त्याच काळात रुजली. १९४०साली शालान्त परीक्षा (मॅट्रिक) उत्तीर्ण. सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले व मुंबई विद्यापीठाची बी.ए.ही पदवी प्राप्त केली. प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकाची धनी होऊनही ते मिळाले मात्र नाही. पुढे एम.ए.आणि ‘मराठी साहित्यात लेखिकांचे योगदान’ हा प्रबंध लिहिला. समाजकार्याची आवड असल्यामुळे एकीकडे साहित्यात घोडदौड चालू असताना दुसरीकडे स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेतली.

     महाविद्यालयीन शिक्षणात प्रा.श्री.म.माटे, प्रा.वाळिंबे, प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांचे मौलिक मार्गदर्शन व संस्कार झाले. ‘लई’ या शब्दावरून महाविद्यालयात अवहेलना झाली, पण अपमान गिळून स्वाभिमानाने ध्येयवेडे मन साहित्यात रमत राहिले. लोकसाहित्याची आवड असल्याने वडील चालवीत असलेल्या ‘समाजशिक्षणमाला’ या पुस्तकाचे संपादन कार्य १९५०पासून केले व जवळजवळ साडे-पाचशे पुस्तके प्रकाशित केली. लोकसाहित्य हे कालप्रवाहात लुप्त होण्यापूर्वी जतन करून ठेवण्याची गरज आहे, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी शासनाचे दरवाजे ठोठावले. सानेगुरुजींपासून प्रेरणा घेऊन १९५५मध्ये ‘महाराष्ट्र लोकसाहित्य समिती’ची स्थापना केली या समितीतर्फे १४ पुस्तके प्रकाशित केली.

     १९५२मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर शिराळे मतदार संघातून निवडून येऊन विधानसभेत प्रवेश झाला. १९५७पर्यंत विधानसभेच्या सदस्या होत्या. पुढे १९६४ ते १९६६ विधानपरिषदेच्या सदस्या म्हणून काम केले.

     १९६८ ते १९७४ या काळात राज्यसभेच्या सभासद झाल्या. अशी अनेक राजकीय पदे मिळाली, पण मूळ पिंड साहित्यिकाचा, समाजकारणाचा आणि लोकशिक्षकाचा होता.   सरोजिनीबाईंना छत्तीस कथा, सात कादंबर्‍या, दोन प्रदीर्घ प्रबंध ह्यांचे लेखन केले व ललित लेख आणि सहाशे ग्रंथांचे संपादन केले. लोकसाहित्याचे सर्व संस्कार घेऊन त्यांच्या कथा प्रकट होतात. त्यांच्या कथांतून ग्रामीण स्त्रियांचे जीवन, त्यांच्या व्यथा, चालीरिती यांचे मनोज्ञ दर्शन घडते. ‘कमळाचं जाळं’, ‘अजिता’, ‘अठवतंय तेवढे सांगते’, ‘स्वयंवर’ इत्यादी लक्षणीय कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या ‘झोळणा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध. ‘अशानं असं झालं’, ‘अशीच एक आठवण’, ‘असू दे मी खुळी’, ‘काळी मखमल’, ‘भारतीय स्त्री-रत्ने’, ‘वडीलधारी माणसं’, ‘देवदर्शन’, ‘बांधिलकी’ इत्यादी साहित्य लोकप्रिय झाले. त्याशिवाय ‘एक होता राजा’, ‘साजशिंगार’, ‘जनलोकांचा सामवेद’ आदी लोकसाहित्यविषयक ग्रंथांचे संपादन केले.

     लोकसाहित्याच्या प्रसारकार्याबरोबरच काव्य, कथा, कहाण्या, म्हणी, उखाणे इत्यादींचे जतन ध्वनिमुद्रणाद्वारे करणे, लोकसंगीत, लोकनृत्य ह्याांचे कार्यक्रम सादर करणे, लोकसाहित्याचे प्रदर्शन भरवणे, विधानसभेत आणि राज्यसभेत आपल्या भाषणांतून स्त्रियांचे प्रश्‍न तसेच गोंधळी, कडकलक्ष्मी, बहुरूपी, तमासगीर, शाहीर यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे याची दखल त्यांनी घेतली. ‘माझ्या खुणा माझ्या मला’ हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले. त्यांची ‘रानजाई’ ही मराठी अस्मितेची ओळख सांगणारी सांस्कृतिक मालिका दूरदर्शनवर अतिशय लोकप्रिय झाली. संगीतकार गोंविदराव टेंबे ह्यांच्या आग्रहामुळे आकाशवाणीवरील कार्यक्रमात त्यांनी म्हटलेले भोंडल्याचे गाणे त्यांना लोकसंगीत गायकांच्या यादीत मानाने बसवून गेले.

     “डॉ.सरोजिनी बाबर यांनी लोकजीवनात जाऊन लोकधन वेचले व त्यांच्या आविष्कारातून मौखिक लोकवेध उभा केला.” असे उद्गार लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक रामचंद्र देखणे यांनी काढले आहेत. लोकसाहित्याची विलक्षण आवड असणार्‍या सरोजिनी बाबरांच्या साहित्यातून त्याचा प्रत्यय आपणास येतो.

     पुणे विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांनी डी.लिट.ही पदवी देऊन आणि पुणे विद्यापीठाने ‘जीवन साधना गौरव’ हा पुरस्कार देऊन त्यांसा सन्मान केला.

     - निशा रानडे

बाबर,सरोजिनी कृष्णराव