बदलानी, लालचंद खुशीराम
डॉ. लालचंद खुशीराम बदलानी हे मूळचे पाकिस्तानचे रहिवासी. सिंधमधील सुलतानकोट जिल्ह्यात सक्कर गावी त्यांचा जन्म झाला. बदलानींचे शालेय शिक्षण तिथेच झाले. फाळणीनंतर त्यांचे सर्व कुटुंब भारतात आले. पंजाब विद्यापीठातून एम.ए.एम.एस. (मास्टर ऑफ आयुर्वेदिक मेडिसीन् अॅण्ड सर्जरी) ही पदवी त्यांनी संपादन केली. नाशिकला येऊन लालचंदजींनी वैद्यकीय व्यवसायास प्रारंभ केला.
अल्पावधीतच ते आणि त्यांचे सहकारी यांच्या असे लक्षात आले की नाशिकमधील सिंधी समाजातील मुलांसाठी त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देणारी शिक्षणसंस्था असणे गरजेचे आहे. डॉ. देवळालकर, शोभराज इसरानी अशा शिक्षणप्रेमी सहकाऱ्यांच्या सहकार्याने १९४८ मध्ये डॉक्टरांनी नाशिक सिंधी शिक्षण मंडळाची स्थापना केली व या संस्थेच्या वतीने सिंध मॉडर्न विद्यालय सुरू केले.
तीनशे मुले, मुली सिंधी माध्यमात शिकू लागली. पण त्यासाठी ‘आपण व्यापारउद्दीमच पाहावा’ ही सिंधी समाजाची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागले. पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून द्यावे लागले. घरोघर हिंडावे लागले. या प्रयत्नांना यश आले. पाचवी ते अकरावी (एस.एस.सी) पर्यंतचे वर्ग सुरू झाले. शाळेला स्वत:ची इमारत असावी म्हणून डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होतेच. १९५७ मध्ये नाशिकच्या जुन्या पंडित कॉलनीत जागा विकत घेतली. १९६१ मध्ये, आज जी इमारत आहे तिचा काही भाग बांधून झाला. याच वेळी शिक्षणाविषयी आस्था असलेले श्रीमान आत्मसिंग बजाज पुढे आले. त्यांनी श्रीमती हरदेवींच्या स्मरणार्थ मोठी देणगी दिली व शाळेचे ‘हरदेवी आत्मसिंग बजाज विद्यालय’ असे नामकरण झाले.
आज अकराशे मुले, मुली शाळेत शिकत आहेत. बालवाडीपासून दहावीपर्यंत वर्ग आहेत. मात्र आता काळाची गरज ओळखून शाळेचे माध्यम इंग्रजी केले आहे. त्यामुळे सर्वभाषक मुलांना शाळेत प्रवेश मिळतो. सिंधी भाषेची, मातृभाषेची ओळख राहावी म्हणून सिंधी भाषा हा ऐच्छिक विषय ठेवलेला आहे. डॉ. बदलानींच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रांत शाळा आघाडीवर आहे. शाळेचे अनेक नामवंत माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वीपणे वावरत आहेत.
नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून दहा वर्षे त्यांनी काम केले. नगरपालिकेच्या शिक्षणसभेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. आज वयाच्या ८२ व्या वर्षी ते रोज स्वत:चा काही वेळ संस्थेसाठी, शाळेसाठी देतात.