Skip to main content
x

बल्लाळ, अंबादास लक्ष्मण

      मराठवाड्यामध्ये ‘केशर’ या आंब्याच्या लागवडीची व प्रसाराची मुहूर्तमेढ १९८४ ते १९८५च्या दरम्यान प्रा.अंबादास लक्ष्मण बल्लाळ यांनी रोवली. त्यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नागपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण औरंगाबाद येथे झाले. त्यांनी १९५६मध्ये हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातील  बी.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली आणि १९६२मध्ये पुणे विद्यापीठामधून उद्यानविद्या या विषयात एम.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यांनी १९५७मध्ये शासकीय कृषी खात्यामध्ये पुण्यातील फळ संशोधन केंद्र-गणेशखिंड येथे सेवेची सुरुवात केली. तेथील संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन कृषी खात्याने आंबा व नारळ फळ संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे १९६२मध्ये त्यांची नेमणूक केली. त्यांनी १९६३-७१ या काळात नागपूर कृषी महाविद्यालयाच्या अंतर्गत नागपूर व अकोला या दोन महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापक या पदावरून विद्यादान व संशोधनात्मक कार्य केले. त्यांनी १९७२ ते १९८२ (निवृत्तीपर्यंत) या काळात उद्यानविद्या विभागप्रमुख या पदावर मराठवाडा कृषी विद्यापीठ-औरंगाबाद येथे काम केले. मराठवाड्यातील स्थानिक आंब्याच्या जातींचा अभ्यास केला आणि ‘हूर’, ‘नाकाड्या’ व ‘मारुत्या’ या जातींची काळजीपूर्वक लागवड करून शास्त्रशुद्ध पद्धतीने संगोपन केल्यास उत्पादन क्षमता आणि फळाची गुणवत्ता वाढते हे सिद्ध करून दाखवले. त्याचप्रमाणे त्यांनी थॉमसन सीडलेस या द्राक्षाच्या छाटणीच्या वेळी ‘लाँगकेन प्रुनिंग’ तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास अधिक उत्पादन मिळते हे सिद्ध केल्यामुळे द्राक्ष बागायतदारांनाही दिलासा मिळाला. निवृत्तीनंतर प्रा.बल्लाळ यांनी सलग १० वर्षे कोरडवाहू शेतीत कमी पाण्याच्या उपलब्धतेमध्ये होणारी फळझाडे व केशर आंबा लागवडीचा प्रसार व प्रचार केला. प्रा.बल्लाळ यांनी संशोधनात्मक १७ लेख, माहितीपर २७ लेख व आकाशवाणीवरील भाषणांचे शतक पूर्ण केले. त्यांनी अखिल भारतीय आंबा प्रदर्शन, राज्यस्तरीय आंबा प्रदर्शन, उद्यानपंडित स्पर्धा (केंद्र सरकार आयोजित), राज्यस्तरीय गुलाबपुष्प प्रदर्शन अशा महत्त्वाच्या समित्यांवर ‘निवड समीक्षक’ म्हणून काम केले.

- मिलिंद कृष्णाजी देवल

 

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].